ऍलेक्सी नवाल्नी यांचे पुतीन यांना आव्हान

0
223
  • दत्ता भि. नाईक

रशियाचे विरोधी पक्षनेते व राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक असलेले ऍलेक्सी नवाल्नी यांचे १७ जानेवारी रोजी जर्मनीमधून रशियामध्ये आगमन होताच त्यांची सरकारकडून तुरुंगात रवानगी करण्याच्या कृत्यामुळे रशियात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जगतात व विशेषकरून युरोपीय समुदायाच्या सदस्य देशांत खळबळ माजली आहे.

रशियाचे विरोधी पक्षनेते व राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक असलेले ऍलेक्सी नवाल्नी यांचे १७ जानेवारी रोजी जर्मनीमधून रशियामध्ये आगमन होताच त्यांची सरकारकडून तुरुंगात रवानगी करण्याच्या कृत्यामुळे रशियात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जगतात व विशेषकरून युरोपीय समुदायाच्या सदस्य देशांत खळबळ माजली आहे.

डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघराज्याचे रीतसरपणे विसर्जन झाले. रशियाव्यतिरिक्त इतर चौदा राष्ट्रांनी स्वातंत्र्योत्सव साजरा केला. झारशाही काय, कम्युनिस्ट पक्षाची मक्तेदारी काय- जनतेने मुस्कटदाबी सहन केली होती. ही मुस्कटदाबी संपुष्टात आल्यामुळे या सर्व राष्ट्रांतील नागरिकांनी कित्येक वर्षांनंतर मुक्त हवेत श्‍वास घेतला होता. सोव्हिएत संघराज्याचे विसर्जन झाल्यानंतर संघराज्याची संपत्ती व देयता या दोन्हींचे दायित्व केंद्रस्थानी असलेल्या रशियाने अंगावर घेतले. नवीन रशिया म्हणजे तेजहीन तारा ठरू नये म्हणून तेथील राज्यकर्त्यांनी प्रयत्नही केले. बोरीस येल्त्सीन हे नूतन रशियाचे नूतन राष्ट्राध्यक्ष होते. परंतु त्यांचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय राजकारणावर छाप पाडणारे नव्हते. त्यामुळे ते फारकाळ देशाचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा नव्हती. तरीही लोकशाही वातावरणात निवडून आलेले प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले जाणार आहे.

भारताचे मित्रराष्ट्र
येल्त्सीन यांच्यानंतर देशाच्या प्रधानमंत्रिपदी असलेले व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टीच्या इशार्‍यावर चालणार्‍या के.जी.बी. या गुप्तहेर संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना रशियामधील जनतेच्या स्वभावाचा बर्‍यापैकी परिचय आहे. सत्तेवर आल्यापासून त्यांनी स्वतःचे अधिकार हळूहळू वाढवून घेतले आहेत. लोकशाही मार्गाने निवडून आलेले असले तरी त्यांची हुकूमशाही वृत्ती लपून राहिलेली नाही. रशियाने पंचाहत्तर वर्षे संघराज्यातील देशांवर वर्चस्व गाजवले याचा राग पूर्वीच्या घटक राष्ट्रांमध्ये आहे. तरीही हे राज्यकर्ते रशियाशी जुळवून घेताना दिसतात. परंतु स्वदेशात ते किती लोकप्रिय आहेत याबद्दल शंकाच आहे. युक्रेन हा रशियाशी सीमा भिडणारा देश आहे. सोव्हिएत युगात क्रिमिया हा रशियन प्रदेश युक्रेनला जोडला होता. तो प्रदेश २०१४ साली सेना घुसवून परत मिळवण्याचा पराक्रम पुतीन यांनी केला. यावेळी युरोपीय राष्ट्रांनी निषेध करण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही.

रशिया हे भारताचे मित्रराष्ट्र आहे. सोव्हिएत संघराज्याच्या काळापासून भारताच्या बाजूने नकाराधिकार वापरणारे एकमेव राष्ट्र म्हणून त्याची ओळख. भारतीय कम्युनिस्ट चळवळीत लुडबूड केल्यामुळे देशातील कॉंग्रेस व कम्युनिस्ट पक्ष सोडून इतर पक्षांच्या मनात रशियाबद्दल काहीशी भीती, काहीसा आकस दिसून येत होता. आता तीही भीती राहिली नाही. रशियाचा ख्रिश्‍चन धर्मही रशियापुरताच आहे. त्यामुळे भारतात मिशनरी पाठवून लोकसंख्येचा समतोल बिघडवण्याचा उद्योगही त्यांच्या चर्चकडून केला जाण्याची शक्यता नाही. याशिवाय संरक्षणविषयक उत्पादनांमध्ये भारत-रशिया भागादारी कोणत्याही दोन देशांमध्ये असू शकते त्याहून अधिक आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकार सध्याच्या घटनाक्रमांकडे रशियाचा अंतर्गत प्रश्‍न म्हणून दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे.

देशभर निदर्शने
ऍलेक्सी नवाल्नी यांचे मॉस्कोत पुनरागमन व त्यांची झालेली ताबडतोब तुरुंगात रवानगी ही घटना पाहता पुतीन यांच्या हेतूबद्दल शंका घेण्यास वाव आहे. नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यातून नीट उपचार झाल्यामुळे ते बचावले. सुरुवातीला ते ब्रिटनमध्ये होते. नंतर ते जर्मनीत गेले. या विषप्रयोगामागे पुतीन सरकारचा हात आहे असे नवाल्नी यांचे म्हणणे आहे. पुतीन यांनी हा आरोप फेटाळून लावलेला असला तरी संशय तर सोडाच, खात्रीने विश्‍वास ठेवावा अशी ही बाब आहे. जर्मनीमध्ये पाच महिने उपचार घेऊन तब्येत सुधारल्यावर त्यांनी स्वदेशात परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना घेऊन येणारे विमान मॉस्को शहरातील ज्या मुख्य विमानतळावर उतरणार होते तिथे विमानाला उतरण्याची परवानगी नाकारून दुसर्‍या दुय्यम विमानतळावर उतरवण्यास भाग पाडले. मुख्य विमानतळावर नवाल्नी यांची मुलाखत घेण्यासाठी जमलेल्या पत्रकारांना चकवण्यासाठी सरकारकडून खेळला गेलेला हा डाव होता. २०१३ साली नवाल्नी यांनी मॉस्कोच्या महापौरपदाची निवडणूक लढवून देशाच्या राजकारणात प्रवेश केला. त्यावेळेस सत्तावीस टक्के मते मिळवून दुसर्‍या स्थानावर राहिले. पुतीन यांनी भावी शत्रूला ओळखले व त्यांच्यावर निरनिराळे आरोप ठेवून त्यांना २०१८ ची अध्यक्षीय निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. त्यांच्या चहामध्ये नोव्हीचोक नावाचे विष मिसळून त्यांना मारण्याचा प्रयत्नही झाला. ज्या विमानात ते होते ते विमान वैमानिकाने जवळच्या म्हणजे जर्मनीतल्या ओक विमानतळावर उतवले, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले. त्यांच्याविरुद्ध खटले चालू असताना देश सोडल्याबद्दल वॉरंटही बजावण्यात आले.
जर्मनीमधून निघताना नवाल्नी यांनी पत्रकारांना उद्देशून बोलताना सांगितले की, मी माझ्या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून परत जात आहे. माझ्यामुळे देशात कोणतीही समस्या उभी राहणार नसून मला सरकार अटक करेल असे वाटत नाही. परंतु प्रत्यक्षात घडले भलतेच. त्यांना अटक केल्याची वार्ता पसरताच त्यांच्या समर्थकांनी देशभर निदर्शने केली.

व्लादिबोस्तोक येथे सुमारे पाचशेहून अधिक, तर खाबारोव्स्क येथे अडीचशेहून जास्त लोकांनी निदर्शनात भाग घेतला असे ‘स्फुटनिक’ वार्ताहराचे म्हणणे होते. रशियातील थंडीचा विचार करता ही संख्या मोठी आहे. काहींनी पोलिसांवर बर्फाचे गोळे फेकले, तर एका व्हिडिओमध्ये एक निदर्शक पोलिसाच्या थोबाडीत मारताना दाखवला आहे. कोरोनामुळे सध्या असलेल्या बंधनांना झुगारून जनता रस्त्यावर येत आहे. निदर्शनांचे लोण पूर्वेकडील नोव्होसिबिर्स्क, इर्कुत्स्क, याकुत्स्क व इतर शहरांत पोहोचलेले आहे.
युरोपीयन युनियनची प्रतिक्रिया
सध्या तरी नवाल्नी यांना तीस दिवसांसाठी कोठडीत ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही या काळात त्यांच्या जिवाला धोका आहे असे त्यांच्या समर्थकांना वाटते. सरकारी अधिकार्‍यांनी संपर्कमाध्यमांवर नियंत्रणे लादून निदर्शकांची वाढ होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जोरदार प्रयत्न चालवले आहेत. अनेक निदर्शकांची धरपकड करून त्यांना पोलीस कोठडीत डांबले आहे.

ऍलेक्सी नवाल्नी यांच्या म्हणण्याप्रमाणे, पुतीन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात बरीच माया जमवलेली आहे. त्यांच्या संपत्तीची किंमत चौदा अब्ज डॉलर्स इतकी आहे. यात ब्लॅकची या समुद्रकिनार्‍यावरील बर्फाळ मैदान, कॅसिनो व आरामदायी निवासस्थान यांचा अंतर्भाव आहे. अर्थातच पुतीन यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
घटनाक्रमावर चर्चा करून निर्णय देण्यासाठी युरोपियन युनियनच्या सत्तावीस सदस्य राष्ट्रांनी युनियनचे केंद्रीय कार्यालय असलेल्या ब्रसेल्स येथे बैठक घेऊन रशियावर यासंबंधाने कोणते निर्बंध घालता येतील यावर चर्चा केली. रशियाची पश्‍चिमोत्तर सीमा बाल्टिक समुद्राशी मिळते. या समुद्रकिनार्‍यावर लिथ्वेनिया, लाटविया व इस्टोनिया असे तीन देश आहेत. त्यांना बाल्किक राष्ट्रे म्हणून ओळखतात. द्वितीय महायुद्धाच्या भर मध्यास सोव्हिएत संघराज्याने त्या देशांवर आक्रमण करून त्यांना आपल्यात सामावून घेतले होते. त्यामुळे सामान्य जनतेवर रणगाडे चालवणार्‍या रशियाच्या स्वभावाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. लिथ्वेनियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री गँब्रीएलियुस लँहस्‌बर्गीस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशियात लोकशाहीचे वारे खेळत असून सध्या चालू असलेल्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे. लिथ्वेनियाच्या या भूमिकेशी लाटविया व इस्टोनिया या दोन्ही बाल्टिक राष्ट्रांनी सहमती व्यक्त केली आहे.

सत्तेचा मोह
इटलीचे परराष्ट्र व्यवहारमंत्री लुईजी डी मेयो यांनी रशियन अधिकार्‍यांच्या जागतिक प्रवासावर निर्बंध घालून सरकारची आंतरराष्ट्रीय संपत्ती गोठवण्याचीही मागणी केली आहे. फिनलँडचे परराष्ट्र व्यवहारमंत्री पेक्का हाविस्तो यांनी नवाल्नी यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाची निःपक्ष यंत्रणेद्वारे चौकशी करावी असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे. कडाक्याच्या थंडीतही रस्त्यावर येऊन निदर्शने करणार्‍या लोकशाहीप्रेमींची ताबडतोब सुटका करावी असे जर्मनीचे परराष्ट्र व्यवहारमंत्री हैको मास यांनी म्हटले आहे. २०१४ साली क्रिमिया प्रकरणानंतर युरोपने रशियावर बरेच निर्बंध टाकले होते हेही लक्षात ठेवले पाहिजे.

आमरण सत्तेला चिकटून राहावे यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करणारे राजकीय नेते इतिहासाच्या निरनिराळ्या कालखंडात दिसून येतात. हिटलर-मुसोलिनीचे काय झाले हे समोर असतानाही त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणारे सत्ताधारी वेळोवेळी व देशोदेशी दिसून येतात. रोमेनियन कम्युनिस्ट सत्ताधारी चावचेस्कू याने आपल्या प्रासादातील नळांना सोन्याच्या तोट्या बसवल्या होत्या व जनतेला रेशनवर तुटपुंजा शिधा व घरोघर एकच विजेचा दिवा व एकच प्लग यासारखी जनक्षोभाला आमंत्रण देणारी राजवट चालवली होती. त्याचेही काय झाले हे सांगण्याची आवश्यकता नाही. शी जिन पिंग यांनीही मरेपर्यंत सत्तेवर राहता यावे अशी चीनच्या घटनेत व्यवस्था करून ठेवली आहे. पुतीनही याच मार्गाने जाणार असे आज तरी दिसते. लोकशाहीसारखी दुसरी राज्यव्यवस्था नाही हे जाणण्याची सद्बुद्धी पुतीन यांना लाभो अशी इच्छा व्यक्त करणेच सध्यातरी आपल्या हाती आहे.