– सौ. पौर्णिमा केरकर
प्रवासाची आवड एकदा का मनीमानसी भिनली की पावले आपोआपच वाट चालू लागतात. प्रवासाचे असे एक व्यसनच मनाला जडते आणि मग ओढ लागते वेगळ्या प्रदेशाची, तिथल्या संस्कृतीची आणि माणसामाणसांमधील वैविध्य अनुभवण्याचीसुद्धा. या भटकंतीत फक्त स्थळांचे, निसर्गाचेच सौंदर्य प्राशून घ्यायचे अशी चौकट काही घालून घेतलेली नाही. त्यामुळे इतिहास, संस्कृती, परंपरा समजून घेण्यासाठी केलेला प्रवास माणसाविषयी जाणून घेण्याच्या कुतूहलाने तर अधिकाधिक समृद्ध होत जातो. अशा प्रवासाने आपले ज्ञान वाढून आपण समृद्ध तर होतोच, त्याशिवाय त्या माणसांप्रतीचे अनुबंध अधिक गडद होत जातात. वेगळेपणाच्या अनुभवातील आनंद आतून रुजतो व मन आतून तरारून येते. आपण वाचलेले, पाहिलेले, ऐकलेले सगळेच अगदी हृदयकुपीत स्थिरावते. मग अशाच एखाद्या नीरव शांततेत ते क्षण आठवत राहतात…
सोलापूरमधील ‘वाळुंज’ हा छोटासा गाव. या गावाची ओढ निर्माण झाली ती अशाच नात्यांच्या अनुभवातून, माणसे जोडण्याच्या हव्यासातून. ही भूमी माणसांबरोबरीनेच संस्कृती-परंपरांचे जतनही करणारी आहे. म्हणूनच येथील माणसांविषयी जाणून घ्यायचे होते. भौगोलिक, सांस्कृतिकदृष्ट्या असलेले वेगळेपण समजून घ्यायचे होते. त्यासाठी पत्रकार अरविंद मोटेंचे ‘वाळुंज’ला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारले होते.
नागझरी आणि भोगावती नदीच्या काठावर वसलेला वाळुंज गाव कृषिसंपन्न. सोलापूरसारख्या कोरड्या, काहीशा रुक्ष प्रदेशात पाऊस तसा बेताचाच. ग्रामदेव खंडोबाचा व महादेवाचा वरदहस्त लाभलेला हा गाव कधीकाळी संपन्नता आणि समृद्धी अनुभवत होता. माणूस आणि पर्यावरण यांच्यातील पूर्वापार असलेले अनुबंध विस्कळीत झाले तेव्हा सोलापूर आणि परिसराला लहरी पर्जन्यवृष्टीला सामोरे जावे लागले. भोगावती आणि नागझरी या नद्यांच्या संगमाने वाळुंजला खूप काही दिले. पंढरपूरसारखे भूवैकुंठाच्या लौकिकास पोचलेले तीर्थक्षेत्र ज्या सोलापूर जिल्ह्यात आहे, त्या परिसराला निसर्गाच्या लहरीपणाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. मोहोळ, नरखेडेमार्गे वाळुंजला जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा धुळीने माखलेल्या या गावाच्या गतवैभवाच्या खुणा प्रथमदर्शनी दृष्टीस पडत नाहीत. परंतु जेव्हा दाटीवाटीने वसलेल्या लोकवस्तीत आपण प्रवेश करतो तेव्हा या गावाला इतिहासाचा आणि संस्कृतीचा वारसा लाभला होता याची कल्पना येते.
गणपती मंदिर असो, महादेव अथवा लोकपरंपरेतून उद्गम पावलेला ‘खंडोबा’ असो- वाळुंज गावातल्या या देवदेवतांना इथल्या कष्टकरी समाज जीवनात आदराचे आणि आत्मीयतेचे स्थान आहे. खंडोबा हे बहुजन समाजाचे लोकप्रिय कुलदैवत. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे हा देव म्हणजे एक प्रकट प्रतीकच आहे. हे ग्रामदैवत शिवाचा, भैरवरूपाचा अवतार आहे असे मानले जाते. खंडोबा हा ऐतिहासिक वीरपुरुष असावा, जो रक्षणकर्ता आहे. कालांतराने त्याच्या शौर्याला दिव्यत्व प्राप्त झाले असावे आणि मग दैवीवलय त्याच्याभोवती निर्माण झाले असावे असे अभ्यासकांना वाटते.
खंडोबाचे दर्शन घेऊन जरा वळसा घालून पुढे गेलो की वाळुंज गावची दाटीवाटीने उभी असलेली कणखर दगडी भिंतीची घरे दृष्टीस पडतात. फेब्रुवारी महिन्यातील रखरखीत उन्हाळा, बाहेर सर्वत्र वार्याबरोबर गिरर्या घेत घेत आपल्या सर्वांगाला माखणारा धुरळा सहन करीत जेव्हा आम्ही घरात प्रवेश केला तेव्हा सुखद गारवा अनुभवता आला. घराची बेताची उंची. टणक, जणू काही काळे कातळ कातीव करून त्याच्या जाडसर भिंती केलेल्या. बेताची उंची असलेले प्रवेशद्वार. त्यामुळे बाहेरील उन्हापासून हे संरक्षण कवच आपोआपच प्राप्त होते. मोटे परिवाराच्या अंतःकरणातील ओलावा आणि भिंतीचा आश्वासक गारवा यांनी प्रवासाचा शीण कोठल्या कोठे नाहीसा झाला.
वाळुंजच्या प्रवासात अवतीभोवती सातत्याने दिसले ते शेतात राबणारे कष्टकरी हात. तांबड्यागुंज डाळिंबांनी लगडलेली डाळिंबाची झाडे आणि त्यांची लांबच लांब पठारे नजर आकर्षून घेत होती. टपोर्या रसदार द्राक्षांनी परिपूर्ण असलेल्या द्राक्षांच्या मळ्यांनी तर येताना-जाताना मनापासून सोबत केली. नजरही पोहोचणार नाही असे दूरदूरपर्यंत पसरलेले गुलाबी रंगाचे चौकोन मनात आकर्षण निर्माण करत होते. नंतर लक्षात आले की कांदे पिकाचा हंगाम सुरू आहे. तयार झालेले कांदे तिथेच सुकत घातलेले होते. त्यामुळे दुरून शेतात जणू काही गुलाबी रंगाची चादरच अंथरली आहे असा भास होत होता. वर उन्हाचा रखरखाट, सावलीचा मागमूसही नाही अशा परिस्थितीत कांदा पिकाची काळजी घेण्यासाठी तत्पर असलेले कष्टकरी जीव बघताना ‘कांदा आता सर्वांना रडवू लागला’, ‘कांद्याने केला वांदा’ ही वाक्ये सतत कानावर आदळू लागली. कांदे दिसल्यावर इथे कांदे स्वस्त मिळतील- विचारूया आणि घेऊया- गाडी आहेच नेण्यासाठी असे व्यावहारिक शहाणपण मनात आलेच. विचारावे लागलेच नाही. आपणहून माहिती पुढे आली. जर त्यांना विचारले की ‘कांदे कोणत्या भावाने देत आहात- आम्हाला द्या’ तर ते म्हणतील ‘फुकटच घेऊन जा.’ या त्यांच्या उद्गारामागे वेदना दडलेली आपल्याला जाणवते. कांदे पिकासाठी जणू काही येथील सगळं जीवनच रखरखाट सहन करतं. त्याचा मोबदला या भूमिपुत्राला मिळतच नाही. त्यांनी कष्ट करायचे व फायदा मात्र मधल्या दलालाला, हा अजब न्याय! विदर्भ, सोलापूरसारख्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या का करीत आहेत हा प्रश्न हे सारे चित्र पाहताना मनात आल्याशिवाय राहिला नाही. सारे व्याप-ताप सहन करून या भूमीचे संचित आणि सृजनत्व जतन करणार्या या भूमिपुत्रांची अवस्था दयनीयच दिसली.
वाळुंजसारखा परिसर आमच्यासाठी नवखाच होता. साध्यासुध्या गावातील साधीसुधी माणसे; पण नात्याच्या निरागस ओलाव्याची दखल घेणारी! त्यांची घरे, बाजार, शाळा, गायीगुरांच्या जागा, घराचे आतील देखणेपण, तिथला देव, सण-उत्सवांची परंपरा, माणसांचा पेहराव, एकमेकांवरती प्रेम करण्याची मनोवृत्ती या सार्यांतून त्या गावचे अंतरंग उलगडत जातात.
‘वाळुंजला यायचे, हुरड्याचा खास बेत आखला आहे’ हा आग्रह मोटेंचा होताच. हुरड्याविषयी मराठी साहित्यात वाचले होते. कित्येक कवी-लेखकांनी हुरड्याचे रसभरीत वर्णन केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शेतावरच ‘हुरडा’ खाण्याच्या कल्पनेने मन मोहोरले. डोक्यावर उन्हे घेऊनच शेताच्या कडेकुशीने, बांधावरून वाटचाल करीत आम्ही मोटेंच्या मालकीच्या शेतात पोहोचलो. दिलीप क्षीरसागर, सुशीलकुमार मोटे, हणमंत क्षीरसागर, सचिन मोटे ही मंडळी अगोदरपासूनच आमच्या येण्याची वाट पाहत बसली होती. ‘हुरडा’ म्हणजे कोवळी जोंधळ्याची कणसे काढून ती भाजायची. भाजण्यासाठी शेतातील जमिनीतच खड्डा खणून, त्यात गोवर्या घालून आग करायची व त्यात ती कणसे भाजायची. रसरशीत आगीवरती जोंधळ्याचे कोवळे दाणे भाजले जातात. गरम गरम असतानाच आगीतून कणसे बाहेर काढून, दोन्ही हातांनी मळून त्यांचे दाणे काढून सोबतीला शेंगदाणे, शेंगदाण्याची, लसणीची, जवसाची चटणी व गूळ घेऊन खायचे. समोर विस्तीर्ण पसरलेले जोंधळ्याचे शेत. उन्हात ताठपणाने उभी असलेली कणसे. चिंचेच्या, बोरी-बाभळीच्या सावलीत चटण्यांसोबतीने खाल्लेले कोवळे, चविष्ट कणसाचे दाणे… जिभेवरची ती चव आजही अवीट म्हणूनच अविस्मरणीय अशी आहे. वाढणार्यांचे हात मायेने ओथंबलेले असतील तर खाणार्यालाही तृप्तीची सार्थकता अनुभवता येते याची प्रचिती हुरडा खाण्याच्या या खास क्षणांनी आम्हाला दिली.
दूर चिंचेच्या डेरेदार वृक्षांच्या सावलीत गायीवासरे संथपणे रवंथ करीत निवांत पहुडली होती. मोकळा वारा वाहत होता. त्यामुळे उन्हाची दाहकता बरीच कमी झाली होती. निसर्गसहवासातील परंपरेने चालत आलेली मानवी जीवनशैली प्रतिष्ठेची सारी जळमटे दूर सारून आम्ही जगण्याला भिडणारी, सहजपणाने प्रत्येक प्रसंगाला सामोरी जाणारी हीच भावना रूजवते. ज्वारी, बाजरी, मका, कांदा या पिकांची पैदासी इथल्या परिसराची खास ओळख आहे. प्रवासात प्रत्येक वेळी एखादे प्रसिद्ध पर्यटनस्थळच पाहायचे हा मनाचा कधीच अट्टहास नव्हता आणि नाहीही. म्हणूनच वाळुंजला आम्ही माणसांच्या शोधात निघालो होतो. मोटे परिवाराशी ऋणानुबंध जुळवण्यासाठीच हा प्रवास होता. त्यातून आम्हालाच समृद्ध होता आले. जोंधळ्याची मशागत, त्यांची साठवणूक कशी केली जाते याचे वेगळेपण त्यामुळेच जाणून घेतले.
जमिनीत खड्डा खणायचा, त्याला ‘पेव’ व घरात साठवून ठेवतात त्याला ‘अंबारी’ म्हटले जायचे. खड्डा खणण्याचेसुद्धा एक खास वेगळेपण. तोंडाच्या बाजूने बारीक व खाली तळाला रुंद. आतून खालून वरपर्यंत पांढर्या विटांचे बांधकाम. जोंधळे साठवले की वरून फरशीने पेवाचे तोंड बंद करायचे. साधारण या पेवाची खोली पंचवीस ते तीस फुटापर्यंत असते. धान्य साठवताना, ते बाहेर काढताना कंदील पेटवून आत सोडला जातो. विझला तर ऑक्सिजन कमी आहे हे लक्षात येते. पेवाचे तोंड मग काहीवेळ उघडे ठेवले जाते व नंतर आतील धान्य काढले जाते. लोकमानसाचे उपजत बुद्धिकौशल्य हे नैसर्गिक जीवनशैलीचेच प्रतीक आहे. बोरी-बाभूळ, चिंच यांसारखी झाडेच येथे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे नांगरणी, पेरणी, खुरपणीसाठी जी अवजारे लागतात ती याच झाडांच्या लाकडापासून बनवलेली. मग तो ‘कुळव’ असो, नाहीतर ‘तिफण’, ‘कोळपो!’
वाळुंजचा आमचा प्रवास हा कार्तिक मासातील होता. त्यामुळे कार्तिकी एकादशीचे लावण्य दिंडीच्या माध्यमातून शेवटपर्यंत सोबतीला होते. गेली कित्येक शतके भक्तजनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सावळे परब्रह्म ज्या भूमीत विसावलेले आहे त्याच भूमीचा स्पर्श वाळुंजच्या वाटांनाही झालेला आहे. सर्वसामान्य माणसे एका असीम ओढीने चालत दिंड्या-पताका घेऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. ठिकठिकाणी एकोप्याने स्थिरावतात. एकमेकांच्या सहवासात वारीत सहभागी होतात. शिस्तबद्ध रिंगणसोहळ्याचा साक्षात्कार घडवतात. हे सारेच अभूतपूर्व असेच होते. अठ्ठावीस युगे कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला हा विठ्ठल म्हणजे भाविकांना एक उखाणाच आहे. लोकमानसात प्रेमाचे अधिराज्य गाजवणारा हा कानडा मानवाच्या भक्तीतत्त्वातील महासमन्वयाचा उद्गाताच आहे. वाळुंज गावानेच ही महापर्वणी अनुभवण्याची संधी आम्हाला दिली. या गावच्या मातीला, पाण्याला, मंदिरांना, घरांना आणि घरातील माणसांनाही प्राचीन संस्कृतीचा सुगंध आहे. वार्यावर आव्याहतपणे सळसळणार्या ज्वारीच्या कणसांतील चैतन्य इथे मी अनुभवले. साधेपणाच्या सौजन्याने मातीतील सृजनत्व अधोरेखित केले. एरव्ही कशासाठी नाही तर मानवी नात्यांची वीण अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठीचा हा प्रवास होता. ‘पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे’ ही बोरकरांच्या कवितेतील ओळ प्रवासभर आमचा पाठपुरावा करीत होती. रस्त्याच्या कडेकुशीला असलेली, माळरानावर ठिकठिकाणी एकेकटीच वाढलेली ही बाभळीची काटक, टणक झाडे अनुभवली. या प्रदेशातली व्यक्तिमनेही अशीच कणखर… तळपणारे ऊन डोक्यावर घेऊन जीवनप्रवास करणारी. त्या उन्हाने ती करपत नाहीत की कोमेजून जात नाहीत. उलट त्या उष्ण दाहातही आपले सतेज बाभळीच्या झाडासारखेच हिरवेपण सदैव राखून ठेवणारी आहेत. हा ओलावा व सृजनत्व उत्साहाने जगण्याची ऊर्मी वाढवते. सहवासात येणारा प्रत्येक जण मग या क्षणांच्या अनुभवानेच वाढत जातो. माणसांविषयीची ओढ अधिकाधिक तीव्र होण्यासाठीच मग प्रवास हवा असतो.