क्षणचित्रं… प्राणचित्रं…
- प्रा. रमेश सप्रे
असं ऋण फेडायचं ते तसंच नवं ऋण निर्माण करून. म्हणजे माता-पित्याचं ऋण फेडायचं ते चांगले मातापिता बनून. गुरू-शिक्षक यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं ते आपणही शिक्षक बनून. आपल्याकडे जे काही ज्ञान, कौशल्य इ. आहे ते इतरांना शिकवून ऋणविमोचन करायचं.
संस्कृतच्या शिक्षकांनी वर्गात सांगितलं, ‘संस्कृतमध्ये ‘ऋ’पासून होणाऱ्या बहुतांश शब्दांचा अर्थ सकारात्मक, विधायक असा आहे.’ राजनला या गोष्टीचं नवल वाटलं. बापट गुरुजींबद्दल त्याला कमालीचा आदर. घरी आल्यावर पहिली गोष्ट जर त्यानं कोणती केली असेल तर ‘संस्कृत-हिंदी’ शब्दकोश काढून त्यात ‘ऋ’नं सुरू होणारे शब्द पाहिले-
ऋक्, ऋग्वेद, ऋचा, ऋत, ऋतू, ऋषी, ऋद्धि इ. इ. ‘खरंच की!’ राजन उद्गारला. पण एका शब्दाबद्दल मात्र त्यानं गुरुजींना विचारायचं ठरवलं. ‘ऋण म्हणजे कर्ज, हा शब्द नकारात्मक नाही का-?’ असं विचारल्यावर गुरुजींनी ऋण हा शब्द, त्याचा अर्थ नि व्यवहार याबद्दल खूप काही सांगितलं.
‘ऋण’ हा शब्द विज्ञानाच्या पुस्तकात ‘विद्युत’ प्रकरणात ‘निगेटिव्ह’ या अर्थी वापरला जातो, आणि धन म्हणजे ‘पॉझिटिव्ह.’ पण दोन्ही इतके परस्परपूरक आहेत की दोन्ही एकत्र आल्याशिवाय विद्युतमंडल (सर्किट) पुरं होऊ शकत नाही. म्हणजे कार्याच्या दृष्टीनं ‘ऋण’ शब्द नकारात्मक नाही.
खरंच आपल्या भारतीय संस्कृतीचा एक विशेष म्हणजे ‘ऋणसिद्धांत’- या सिद्धांतानुसार ऋण (कर्ज) हे नेहमी नवं ‘ऋण’ निर्माण करूनच फेडता येतं. यासंबंधात एक सत्यघटना पाहूया. खेडं आणि शहर यांच्यामधलं एक गाव (नगर). त्यात एक बँक. अनेकांच्या संकटात उपयोगी पडल्याबद्दल त्या बँकेला लोकसंस्थांकडून अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झालेले. सर्व कर्मचारी हल्लीच्या भाषेत ‘कस्टमर-फ्रेंडली’ म्हणजे ग्राहकांच्या मित्रासारखे होते.
नवीनच रुजू झालेला बँकेचा मॅनेजर. त्याच्यासमोर एक युवक उभा राहतो. आपली अडचण सांगतो. आतापर्यंत घरातील कुणाचं शिक्षण, कुणाचा व्यवसाय, कोर्टकचेरी, वैद्यकीय समस्या (सर्जरी इ.) यासाठी वेळोवेळी कर्ज काढावं लागलं. त्या प्रत्येकवेळी काहीतरी तारण (सिक्युरिटी) ठेवावं लागलं. आता बहिणीचं लग्न पंचवीस हजार रुपयांसाठी अडून राहिलं होतं. सगळ्या ठिकाणी प्रयत्न करूनही अपयशच हाती आलं. शेवटी आपली सगळी कैफियत (कहाणी) त्यानं न अडखळता मॅनेजरना सांगितली. मॅनेजर दयाळू होते. त्यांनी त्या तरुणाला आपल्या डोळ्यात पाहून (नजरेला नजर भिडवून) पुन्हा एकदा आपली अडचण सांगायला सांगितली. त्याच्या डोळ्यात मॅनेजरला सच्चाई दिसून आली. त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याला कर्ज मिळवून दिलं. बहिणीचं लग्न व्यवस्थित पार पडलं. तो युवक बँकेचं कर्ज व्याजासह नियमितपणे फेडत राहिला.
शेवटचा हप्ता भरण्यासाठी आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तेच मॅनेजर बदली होऊन पुन्हा त्या शाखेत आले होते. यानं केबिनमध्ये जाऊन त्यांचे पाय धरले. मॅनेजर काळाच्या ओघात या युवकाला विसरूनही गेले होते. युवकाने सारा प्रकार त्यांच्या स्मरणात आणून दिला. त्यावर मॅनेजर म्हणाले, ‘तो एक बँकेचा व्यवहार होता. तू व्याजासह कर्ज भरूनही टाकलंस. कर्जापेक्षा अधिक रक्कम तू बँकेत जमा केलीयस. मला नमस्कार का करतोस?’
यावर त्या युवकानं दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. ‘साहेब, त्यावेळी कोणीही जवळचे दूरचे माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. अशावेळी कोणतीही ओळखदेख नसताना तुम्ही मदतीला धावून आलात. आज माझ्या बहिणीचा संसार फुललाय-फळलाय तो केवळ तुमच्यामुळे. एरव्ही आम्ही आशाच सोडली होती. आई या साऱ्या प्रकारासाठी एकच शब्द नेहमी वापरते- ‘ऋणानुबंध!’ तुमचे नि आमचे काहीतरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असले पाहिजेत. कुणीतरी कुणावर ऋण केलं होतं. त्याचा अनुबंध या जन्मात प्रकट झाला नि साऱ्या गोष्टी सुरळीत घडून आल्या.’ यावर त्या केबिनमध्ये एक प्रसन्न शांतता पसरली. जी शब्दांपेक्षा अधिक बोलकी होती. असो.
काही वर्षांपूर्वी कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचं एक युगुलगीत (ड्यूएट) खूप प्रसिद्ध झालं होतं. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी। भेटीत तुष्टता मोठी॥’ जीवनातील सर्व संबंधांवर, नात्यांवर या ऋणानुबंधांचा प्रभाव दिसून येतो. हा प्रभाव जसा मदत, प्रेम, सहजीवन या स्वरूपात तसाच नागवणारा, सूड-द्वेषाचादेखील असतो. राजा आणि प्रजा यांच्यातील ऋणानुबंध रावण असताना, विभीषण असताना वेगळे असतात. ऋणानुबंधामुळे जसं रामायण घडलं तसंच महाभारतही घडलं. सीतात्यागानंतर लक्ष्मणानं तिला जिथं वनात सोडलं त्याच्या जवळच वाल्मीकी मुनींचा आश्रम असणं हा निव्वळ योगायोग नव्हता तर तो ऋणानुबंधाचाच परिणाम होता. ‘लवांकुशांचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी। दैव जाणिले कुणी?’ हा योगायोग नव्हता तर कर्मधर्मसंयोग होता. ऋणानुबंदामुळे जुळून आलेला. वाल्मीकींच्या आश्रमात वाढलेले कुश-लव हे एका अज्ञात, अलिखित ऋणानुबंधाचे प्रतिबिंब होते. तसाच सूर्यपुत्र ते सूतपुत्र हा कर्णाचा जीवनप्रवासही कुंती-राधा-अधिरथ (ज्यांनी कुंतीनं पाण्यात सोडलेल्या आणि यांना सापडलेल्या मुलाचा सांभाळ केला) या साऱ्यांच्या ऋणानुबंधांचा अनुभव होता.
जीवनातील विविध ज्ञात-अज्ञात प्रसंग समजून घ्यायचे असतील तर प्रारब्धाच्या जोडीला ऋणानुबंधांचाही विचार करायला हवा.
सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे आपली ऋणविमोचनाची परंपरा. आपल्या जीवनाच्या वाटचालीत नि विकासात आईवडील, गुरू- आप्त (नातलग), शेजारी- नगरवासी अशा साऱ्यांचा सहयोग असतो.
‘न ऋण जन्मदेचे फिटे’ असं म्हणतात ते अगदी खरं आहे. माता- मातृभाषा- मातृभूमी यांच्या ऋणाची भरपाई कशी होणार? कारण कितीही नि काहीही केलं तरी जन्मदात्री मातेचं ऋण सर्वांवर अखंड असतं नि असणारही आहे! हे फेडण्यासाठी एक सूत्र आहे, एक मंत्र आहे. असं ऋण फेडायचं ते तसंच नवं ऋण निर्माण करून. म्हणजे माता-पित्याचं ऋण फेडायचं ते चांगले मातापिता बनून. गुरू-शिक्षक यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं ते आपणही शिक्षक बनून. आपल्याकडे जे काही ज्ञान, कौशल्य इ. आहे ते इतरांना शिकवून ऋणविमोचन करायचं. यामुळे समाजात नि आपल्या जीवनात सदैव ऋणचक्र फिरत राहतं. आणि ऋण म्हणजे केवळ व्यवहारातलं कर्ज नव्हे तर एक भावना- कृतज्ञतेची, आपुलकीची, बांधिलकीची नि सामिलकीची (पार्टिसिपेशन). म्हणून ऋण नकारात्मक, अभावात्मक शब्द नाही तर सकारात्मक, भावात्मक, प्रभावात्मक आहे.