ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन निष्फळ

0
15

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखला

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी पणजीतील आझाद मैदानावर काल सकाळच्या सत्रात धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सरकारी यंत्रणेने या आंदोलनाची दखल न घेतल्याबद्दल ऊस उत्पादकांनी संताप व्यक्त केला. आणि संध्याकाळी आंदोलकांनी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने कूच केली; मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यातील ऊस उत्पादकांनी संजीवनी साखर कारखाना सुरू करावा आणि सरकारने इथेनॉल प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी 2 जानेवारीपासून दयानंदनगर-धारबांदोडा येथे धरणे आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने या धरणे आंदोलनाची दखल न घेतल्याने ऊस उत्पादकांनी पणजीत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
काल येथील आझाद मैदानावर ऊस उत्पादकांनी धरणे आंदोलन करून संजीवनी साखर कारखाना आणि इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली. सरकारी पातळीवर या धरणे आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने आंदोलकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. ऊस उत्पादक आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाण्यासाठी आझाद मैदानाच्या बाहेर येताच पोलिसांनी ऊस उत्पादकांना अडविले आणि त्यांना ताब्यात घेतले.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संजीवनी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र गेले अनेक महिने सरकारी पातळीवर याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही, अशी खंत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केली.
संजीवनी कारखान्यासमोर आंदोलन केल्यानंतर आम्ही पणजी येथे आंदोलन करत आहोत. या पणजीतील आंदोलनामुळे मुख्यमंत्री आम्हाला भेटतील अशी आमची अपेक्षा होती. आम्ही दुपारपर्यंत त्यांची वाट पाहिली; मात्र ते आलेच नाहीत. त्यामुळे आम्हीच त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला, असे संतप्त ऊस उत्पादकांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून आंदोलकांवर जहरी टीका
राज्य सरकार संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यास कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही. त्यांना ऊस लागवडीसाठी पैसे दिले जातात. पणजीत ते केवळ देखावा करण्यासाठी आले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल केली.