उस्ताद रशिद खान यांचे निधन

0
25

>> कर्करोगाशी झुंज अपयशी; कोलकात्यात अखेरचा श्वास

संगीत क्षेत्रात विख्यात असलेले उस्ताद रशिद खान यांचे काल निधन झाले. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सम्राट अशी ओळख असलेले उस्ताद रशिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली. कोलकाता येथील खासगी रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांना 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी उस्ताद रशिद खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उस्ताद रशिद खान यांच्यावर उपचार सुरू होते. आम्ही त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले; पण त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी 3.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असेही डॉक्टरांनी सांगितले. उस्ताद रशिद खान यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे.

उस्ताद रशिद खान यांचे निधन ही देशाची हानी आहे. तसेच संगीतविश्वातही त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे. मला अद्यापही विश्वास बसत नाही की उस्ताद रशिद खान आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतातील ते एक मोठे नाव होते. उस्ताद रशिद खान यांच्यावर उस्ताद आमिर खाँ आणि भीमसेन जोशी यांच्या गायकीचा प्रभाव होता. दोन्ही गायकांचा प्रभाव त्यांच्या गाणे म्हणण्याच्या शैलीत जाणवत असे. रामपूर सासवान घराण्याचे प्रसिद्ध गायक म्हणून उस्ताद रशिद खान यांची ख्याती होती. मागच्या तीन दशकांहून अधिक काळ शास्त्रीय संगीताची सेवा करत आपल्या गायकीतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. 2004 मध्ये सुभाष घई यांच्या किसना या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी तोरे बिन मोहे चैन नहीं आणि कहें उजाडी मोरी नींद ही गीते गायली. ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘आओगे जब तुम साजना’ ही बंदिश आजही संगीतप्रेमींच्या स्मरणात आहे.