फोंडा (न. वा.)
म्हारवा सडा, उसगाव येथील धोकादायक वळणावर शुक्रवारी सकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास मारूती कार व मातीवाहू ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले. जखमीत ऑस्कर डिकॉस्ता (५९, कुडतरी), आंतोनिओ डायस (५७, राशोल) व पावलो सिक्वेरा (५७, कुडतरी) यांचा समावेश असून जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०८ के ०९३० क्रमांकाची कार खांडेपारहून उसगावच्या दिशेने जात होती. म्हारवासडो येथील धोकादायक वळणावर पोहोचताच विरुध्द दिशेने येणार्या जीए ०२ यू ९६४२ क्रमांकांच्या ट्रकला कारची धडक बसली. यात कारमधील तिघेही जखमी झाले. जखमींना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले. जखमी झालेले तिघेही जण गोवा मांस प्रकल्पाचे कर्मचारी आहेत. फोंडा पोलीस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक जोकीम फर्नांडिस यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी त्याठिकाणी असलेले धोकादायक वळण कापण्याची मागणी केली आहे.