उसगावात अल्पवयीन मुलीचा अपहरणानंतर खून

0
3

>> मूळ कर्नाटकातील संशयित दाम्पत्यास अटक

उसगाव पंचायत क्षेत्रात बुधवारी दुपारी घरासमोर खेळणाऱ्या एका 5 वर्षीय मुलीचे अपहरण करून नंतर तिचा निर्घृण खून केल्याचा प्रकार काल गुरुवारी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी पप्पू अल्लाड व त्याची पत्नी पूजा अल्लाड या दोन संशयितांना अटक केली आहे. फोंडा पोलीस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर व अन्य पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा 12 तासांच्या आत लावला.

संशयित सदर मुलीच्या घरापासून 50 मीटर अंतरावर रहात असून अंधश्रद्धेच्या नादात अल्पवयीन मुलीचा बळी दिला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर मुलीचा मृतदेह संशयित अल्लाड दाम्पत्याने आपल्या घराच्या मागे जमिनीत गाढल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घरासमोरील रस्त्यावर खेळणारी मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीची आई पिळये इस्पितळात तर आजी घरात होती. खूप वेळानंतर मुलगी न सापडल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनीही मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुलगी न सापडल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. गुरुवारी सकाळी पुन्हा पोलिसांनी शोध घेण्यात सुरुवात केली. बुधवारी रात्री सदर मुलीच्या घराच्या 50 मीटर अंतरावर असलेल्या अल्लाड या संशयित दाम्पत्याने आपल्या घराची झडती घेण्यास पोलिसांना नकार दिला होता. मात्र गुरूवारी पोलिसांनी त्याच्या घरी शोध घेतला असता अल्लाड यांच्या घरामागे जमिनीत पुरलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्वरित संशयित अल्लाड दाम्पत्याला ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला. रात्री उशिरा फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह बाहेर काढला.

फोंडा पोलिसांनी अटक केलेला पप्पू अल्लाड हा गुरुवारी सकाळपासून आपल्या घरासमोर बसून पोलिसांची तसेच शोध घेणाऱ्या अन्य जणांची तो दिशाभूल करत होता. मुलीचा खून केल्यानंतर ती दोघेही कर्नाटकात आपल्या मूळ गावी गुरुवारी संध्याकाळी जाणार होती.