हवामान खात्याने देशात उष्णतेच्या लाटेसह पावसाचाही काही राज्यांत अंदाज व्यक्त केला आहे. आज देशातील चार राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. रविवारी बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील तापमानाने 42 अंशांचा टप्पा ओलांडला. याशिवाय छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, गुजरात आणि महाराष्ट्रातही 42 अंशांच्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर 26 राज्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीतही वाढत्या तापमानाचा काळ सुरू झाला आहे. येथील तापमान 38 अंशांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता असून ताशी 30 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मात्र, आज उष्णतेच्या लाटेचा इशारा नाही.
देशात उष्णतेच्या लाटेसोबतच 26 राज्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये गोवा, महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा. या राज्यांचा समावेश आहे.
आजपासून काही राज्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उद्या दि. 23 रोजी मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. तर 24 एप्रिल रोजी ईशान्येकडील राज्य आसाम, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.