उष्णतेच्या लाटेत राज्यातील नागरिक होरपळले

0
41

>> पारा पोहोचला ३७.८ अंश सेल्सिअसवर; उन्हाच्या झळा तीव्र

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून, काल वाढलेल्या उकाड्याने राज्यातील नागरिकांची अक्षरश: लाही लाही केली. राज्यात काल ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा नोंदवलेले हे सर्वाधिक तापमान होते. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा ५.५ अंश सेल्सिअसने अधिक होते. परिणामी सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्री देखील उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. रविवारी राज्यात ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खात्याने काल सकाळीच राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्यानुसार पणजीतील केंद्रावर ३७.८ अंश सेल्सिअस, तर मुरगावातील केंद्रावर ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कुठल्याही किनारपट्टी भागात जर तापमान ३७ अंश सेल्सिअसवर गेले आणि ते सामान्य तापमानापेक्षा ४.५ ते ६.५ अंश सेल्सिअस एवढे जास्त असले व ही स्थिती दोन दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस राहिली, तर सदर प्रदेशात उष्णतेच्या लाटेच्या इशारा दिला जातो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्यातर्फे पणजी व मुरगाव ही दोन हवामान केंद्रे व पावसाचे मोजमाप करणारी म्हापसा, पेडणे, केपे, फोंडा, मडगाव, काणकोण, केपे व सांगे ही ८ आउट पोस्ट्‌स तापमान व त्याच्याशी संलग्न गोष्टींचे मोजमाप करण्याचे काम करीत असतात, असे खात्याने म्हटले आहे. ठरलेल्या निकषांनुसार तापमान जाणवत असेल, तर उष्णतेची लाट असल्याचा इशारा खात्याकडून दिला जातो.
जर एखाद्या केंद्रातील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी अथवा तेवढे असेल व तापमानात झालेली वाढ ही तेथील सामान्य तापमानापेक्षा ५ किंवा ६ अंश सेल्सिअस एवढी असेल, तर त्या प्रदेशात उष्णतेची लाट आली आहे, असा त्याचा अर्थ होतो, असे खात्याने स्पष्ट केले आहे.

‘हे’ धोके संभवतात…
उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात, शरीराचे तापमान वाढणे, भरपूर घाम येणे, वर्तणुकीत अथवा मानसिक स्थितीत बदल होणे, अशक्तपणा येणे, उलटी होणे, श्वासोच्छवास जलद गतीने होणे, डोकेदुखी होणे, हृदयाची धडधड वाढणे आदी विविध समस्या निर्माण होऊ शकतात.

काय करू नये?
नवजात बालके, मुले व ज्येष्ठ नागरिकांना उष्णतेच्या लाटेमुळे धोका संभवतो. उन्हात खूप वेळ ठेवलेल्या चारचाकी गाडीत नवजात अर्भक, बालके व मुले यांना बसवू नये. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे.

काय करावे?
उष्णतेच्या लाटेच्या दिवसांत वातानुकुलित यंत्रणेचा वापर करावा, पाणी जास्त प्रमाणात प्यावे, सैल कपडे परिधान करावेत, डोक्यावर टोपी घालावी, काळ्या चष्म्यांचा वापर करावा.