उष्णतेची लाट येतेय… सावधान!

0
26
  • प्रमोद ठाकूर

गोव्यासह देशाच्या सर्वच भागातील नागरिक सध्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. पाण्याचीही मोठी समस्या निर्माण होत आहे. निसर्गाचे संतुलन राखण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याचा हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. वाढती लोकसंख्या, जंगलतोड, दळणवळणाच्या वाढत्या साधन-सुविधा आदींमुळे उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. उष्णतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी नागरिकांनी वेळीच सावध व्हावे!

गोव्यासह देशाच्या सर्वच भागातील नागरिक सध्या उष्णतेमुळे हैराण झाले असून अनेक ठिकाणी पाण्यासाठीही भटकंती सुरू झाली आहे. पावसाळ्यापूर्वी मार्च ते जून या काळात दरवर्षी उष्णतेचा लोकांना त्रास होतो. पण आता तर दरवर्षी उष्णतेच्या प्रमाणात वाढच होताना दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे तापमानामध्ये होणारी वाढ नागरिक सहन करू शकत नाहीत. गोव्यासारख्या किनारी राज्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना असह्य उकाड्याचा त्रास सुरू झाला आहे. या वाढत्या उष्णतेचा लोकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे. नागरिकांना आरोग्याचीही समस्या भेडसावू लागली आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. जास्त ऊन, जास्त तापमान असलेली जागा, घट्ट कपड्यांचा वापर आदी कारणांमुळे उष्माघातही होऊ शकतो. थकवा, ताप, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघाताचा त्रास होणाऱ्याला हवेशीर खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. त्याने थंड पाण्याने आंघोळ करावी. वाढत्या उष्णतेमध्ये तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके पातळ सुती कपडे वापरावेत, असा सल्ला दिला जात आहे.

उष्णतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळेच सरकारी यंत्रणेकडून उष्णतेच्या काळात नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. या काळात उन्हात न जाणे, जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या देशातील नागरिकांना मागील काही वर्षांपासून उष्णतेच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. या काळात पाण्याचीही मोठी समस्या निर्माण होते. साधारणपणे मार्च ते जून दरम्यान तापमान वाढलेले असते. वाढणाऱ्या तापमानाबरोबर आद्रतेमध्ये वाढ होते. देशातील काही भागांत वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे बळीसुद्धा जातात.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक पातळीवरसुद्धा तापमानात वाढ होत आहे. आजच्या काळात निसर्गाचे संतुलन राखण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा हवामानावर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. वाढती लोकसंख्या, जंगलतोड, दळणवळणाच्या वाढत्या साधन-सुविधा आदींमुळे आपल्या आसपासच्या हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. हवामानाच्या बदलामुळे वर्षभर पावसाची नोंद होते. जागतिक पातळीवर उष्णतेचे प्रमाण अधिक तीव्र होत असल्याचे संशोधनात आढळून येत आहे.

आज झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. गोव्यातसुद्धा परिस्थिती वेगळी नाही. आपल्या आसपासचे निसर्गसौंदर्य नष्ट होऊन काँक्रीटची जंगले वाढताना दिसून येत आहेत. रस्तेही काँक्रीटचे केले जात आहेत. हे काँक्रीटचे जंगल उष्णता शोषून घेत नाही. त्यामुळे वातावरण गरम राहते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून वातानुकूलित यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. या वातानुकूलित यंत्रणेचा वापर करणाऱ्याला उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी बाहेरील उष्णतेचे प्रमाण वाढते याचा विचार केला जात नाही.
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कधीही कमी दाबाचे पट्टे तयार होतात. कार्बन उत्सर्जनाचा परिणाम म्हणून समुद्रातील तापमान बदलत असते. त्यामुळे कधीही पाऊस, उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

तापमानाबरोबर आद्रतेमध्ये वाढ झाल्यानंतर भरपूर त्रास सहन करावा लागतो. गोव्यात एप्रिल महिन्यात कमाल तापमान 33-35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तापमानात वाढ होऊन तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्यास प्रारंभ झाला होता. अखेर 20 एप्रिल रोजी गोव्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडल्यानंतर वातावरणात काही दिवस गारवा निर्माण झाला. तापमानात घट दिसून आली. आता पुन्हा एकदा तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून वातावरण ढगाळ बनले आहे. गोव्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गोव्यातील तापमान कमाल 32 ते 33 अंश सेल्सिअस असेपर्यंत नागरिकांना त्याचा जास्त त्रास सहन करावा लागत नाही. कमाल तापमानात वाढ झाल्यानंतर किमान तापमानातसुद्धा वाढ होते. तापमानात वाढ झाल्यानंतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअस वाढ नोंद झाल्यास उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मैदानी प्रदेशात 40 अंश, किनारी भागात 37 अंश, डोंगराळ भागात 30 अंश अशी तापमानाची नोंद झाल्यानंतर उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. गोव्यासारख्या किनारी राज्यात तापमान 37 अंश सेल्सिअसवर आल्यानंतर उष्णतेच्या लाटेची घोषणा केली जाऊ शकते.

भारतीय हवामान विभागाच्या गोवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी 2024 रोजी या वर्षातील सर्वाधिक कमाल तापमान 35.7 अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. गोव्यात मागील मार्च महिन्यात तापमानात चढ-उतार सुरू होता. गोव्यात एप्रिल महिन्यातसुद्धा कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आतमध्येच होते.

हवामान विभागाकडून वाढत्या तापमानामुळे वेळीच सूचना दिल्या जात असल्याने नागरिक वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय-योजना हाती घेऊ शकतात. केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना वाढत्या उष्णतेबाबत सतर्क करण्यात येते. राज्य सरकार आरोग्य विभाग व राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाकडून नागरिकांसाठी उष्णतेला तोंड देण्याकरिता सावधगिरी बाळगण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात. राज्यात उष्णतेची लाट येत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी रेडिओवरील सूचना ऐका, टीव्हीवरील सूचना पाहा, तसेच हवामान खात्याकडून व्यक्त केलेले अंदाज जाणून घेण्यासाठी वृत्तपत्रे वाचा अशी विनंती केली जात आहे. उन्हात बाहेर पडताना गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा. प्रवासात पाणी सोबत ठेवा. तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा आणि तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातापायांवर ओलसर कापड ठेवा. ओआरएस, नारळ पाणी, घरगुती पेय म्हणजे लस्सी, तोरणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक इत्यादींचा वापर करा. ज्याच्यातून शरीर पुन्हा हायड्रेट करण्यास मदत होते. स्वयंपाकाचा भाग पुरेसा हवेशीर करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांची भेट घेऊन तपासणी करून घ्या.

जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या. छतावर, बाल्कनीमध्ये लहान कुंड्यांमध्ये पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवा. तुमचे घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या खुल्या ठेवा. पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा. कामाच्या ठिकाणी पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे. थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी कामगारांना सावध करा. दिवसाच्या थंड वेळी कामाची वेळ ठरवा. बाह्यकामासाठी विश्रांतीची गरज वाढवा. गर्भवती कामगारांना आणि आजारी असलेल्या इतरांना अतिरिक्त विश्रांती घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
उभ्या (पार्क) केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी ठेवू नका. उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळा. गदड, जड किंवा घट्ट कपडे घालणे टाळा. जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा जड कामे टाळा. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा. जर तुम्हाला शरीराचे उच्च तापमान असलेले आणि बेशुद्ध पडलेले, गोंधळलेले किंवा घाम येणे थांबलेले असे कोणी सापडले तर लगेच 108 किंवा 102 वर कॉल करण्याची सूचना करण्यात आली आहे.

गोवा राज्याला मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. उन्हाळी सुट्टीमुळे गोव्यात देश-विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होते. या काळात पर्यटक मोठ्या संख्येने समुद्रकिनाऱ्यावर उपस्थिती लावतात. वाढत्या उष्णतेमुळे समुद्रसुद्धा खवळलेला असतो. त्यामुळे नागरिक, पर्यटकांना सावध करण्यासाठी किनारपट्टीवर जीवनरक्षक सेवा देणाऱ्या ‘दृष्टी मरीन’ने पर्यटकांना उष्णतेच्या लाटेपासून सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर जाताना टोप्या, छत्र्या, सनस्क्रिन आणि पाण्याची बाटली घेऊन जावी. कडक उन्हात दुपारी ते 3 वाजेपर्यंत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा, असे ‘दृष्टी मरीन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांनी म्हटले आहे.

‘दृष्टी मरीन’कडून समुद्रातील एकंदर स्थिती निश्चित करून नागरिकांना पोहण्याचा सल्ला दिला जात आहे. समुद्रकिनाऱ्याचा काही भाग लाल आणि पिवळ्या रंगाने चिन्हांकित करण्यात येतो. पिवळ्या रंगात चिन्हांकित केलेल्या भागात आपण पोहू शकतो. त्याठिकाणी मध्यम प्रवाह असतो, तर लाल ध्वज लावलेल्या क्षेत्रात पोहणे टाळावे. सदर क्षेत्र नॉन स्विम झोन म्हणून निश्चित केलेले असते.

नागरिकांनी थेट उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर छत्रीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. सनबर्न टाळण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करावा. निळा समुद्र कडक्याच्या उन्हाळ्यात आपल्याला आराम देतो. समुद्रकिनारी जाणाऱ्यांनी रिप करंट्स, फ्लॅश करंट्स आणि पाणी खाली जाण्यापासून सावध राहावे. समुद्रात उतरण्यापूर्वी प्रवाह जाणून घ्यावा. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर 35 लाईफसेव्हर टॉवर उभारण्यात आले आहेत. कोणत्याही दुखापतीवर त्या ठिकाणी प्रथमोपचार केले जातात. दररोज सकाळी जीवरक्षक समुद्रातील प्रवाह, वाऱ्याच्या नमुन्यांमधील बदल पाहून नकाशा तयार करतात, असेही ‘दृष्टी’चे सीईओ नवीन अवस्थी यांनी म्हटले आहे.
‘दृष्टी मरीन’ जीवरक्षकांनी चिन्हांकित केल्यानुसार नेहमी सुरक्षित पोहण्याच्या क्षेत्रामध्ये पोहण्याचा आनंद घ्या. समुद्रकिनाऱ्यावर लाल आणि पिवळे ध्वज शोधून योग्य ठिकाणीच स्नानाचा आनंद लुटा. लाल ध्वजांसह चिन्हांकित नो स्विम झोनमध्ये जाऊ नका. शक्यतो नेहमी लाईफसेव्हर टॉवर्सच्या जवळपास पोहा. पोहताना तुम्हाला रिप करंटचा सामना करावा लागल्यास तरंगत राहणे सर्वांत सुरक्षित आहे. काही विपरीत घडत असल्याचे निदर्शनास आल्यास ड्युटीवरील जीवरक्षकाला सतर्क करा. कधीही एकटे पोहू नका. अडचणीत आल्यास हात हवेत उंचावून मदतीसाठी आरडाओरड करा. जर तुम्ही प्रशिक्षित नसाल तर तुम्हाला कोणीही अडचणीत दिसल्यास बचाव करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी जवळच्या जीवरक्षकाशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

उष्णतेच्या कालावधीत घ्यावयाची काळजी

  • कडक उन्हाळ्यात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करू नका.
  • जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे टाळा.
  • घट्ट कपड्याचा वापर करू नका.

उष्माघात झाल्यास घ्यावयाची काळजी

  • उष्माघात झाल्यास रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकूलित खोलीत ठेवावे.
  • रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
  • रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत.

काय करावे

  • तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे.
  • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा.
  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.
  • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
  • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
  • सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे.
  • पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.
  • बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.
  • गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
  • रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
  • जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी.

काय करू नये

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.
  • दुपारी 12.00 ते 3.30 कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळा.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळा.
  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
  • मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्या.