उलट्या

0
827

– वैदू भरत म. नाईक (कोलगाव)

‘उलटी होणे’ ही निसर्गाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. अजीर्ण पित्त होणे किंवा एखादा पदार्थ पोटाला न मानवणे यामुळे शरीर दोष वा अन्न बाहेर टाकू पाहते. शख्यतो उलटी थांबवू नये. उलटीचा फारच त्रास होऊ लागल्यास उलटीवर औषध घ्यावे. गर्भिणीच्या उलट्या वेगळ्या प्रकारात मोडतात. कॉलरा विकारात मात्र उलटीवर तात्काळ उपचार करावा. नुसती उलटी थांबविणारी इंग्रजी औषधे पचनाचे प्रश्‍न निर्माण करू शकतात. त्यापेक्षा उलट्यांच्या कारणावर उपाय हवा. कफ व पित्त आपल्या प्रमाणापेक्षा वाढले व त्यांचे शरीरा धारणाचे योग्य काम करता आले नाही की उलटीची तयारी होते. त्यात वाताच्या प्रकोपाची संधी आली की उलट्या होण्यास सुरुवात होते.

कारणे ः
१) खूप उष्ण, तिखट, खारट, मसालेदार पदार्थ खाणे.
२) अति उन्हात हिंडणे, कमी पाणी पिणे, जागरण करणे.
३) मेवामिठाई, तेलकट, जडपदार्थ भूक नसताना खाणे.
४) गर्भिणीच्या सुरुवातीच्या दिवसात कडक डोहाळे लागणे.
५) कॉलरा किंवा तत्सम साथीत पाणी व अन्न यात बिघाड झाल्यामुळे.
६) दारू पिण्याचा अतिरेक, दारूचे वेगवेगळे प्रकार एकत्र करून पिणे
७) जंत, सतत मलावरोध, गॅस याकरिता दीर्घकाळ औषधे घेत राहणे.

लक्षणे ः
१) उलटीवाटे अन्न पडणे, २) तोंडाला पाणी सुटणे, ३) डोके दुखी ४) थकवा, ५) उलटीत क्वचित रक्त पडणे, ६) कोरडे उम्हांसे येणे, उलटीची भावना होणे, ७) उलटीबरोबर पोट खूप दुखणे, ८) छातीत जळजळ.

पथ्यापथ्य ः
१) पित्तप्रधान उलटी असल्यास उष्ण, तिखट, मसालेदार पदार्थ उशीरा जेवणे, उन्हात फिरणे टाळावे. सकाळी लवकर उठून मोरावळा खावा.
२) अजीर्णामुळे उलटी होत असल्यास आल्याचा तुकडा चघळावा व थोडे थोडे गरम पाणी प्यावे. जड, तेलकट, थंड पदार्थ, डालडा इत्यादी पूर्ण वर्ज्य करावे, रात्री कमी जेवावे.
३) गर्भिणीच्या उलट्यांकरिता जेव्हा उलट्या होत नाहीत तेव्हा व्यवस्थित जेवणे आवश्यक आहे. पहाटे लवकर काहीतरी खावे.
४) फक्त पाणी पिऊ नये. पातळ पदार्थ कमी खाऊन उलटी थांबते का ते पहावे.

शरीर परीक्षण ः
जीभ किटण, ठिपके याकरिता बघावी. दातांच्या वरच्या कड्यांना कंगोरे आहेत का ते पाहावे. आमाशय, बेंबीस पक्वाशय यातील कोणत्या अवयवांना जाडसरपणा आहे हे बघावे. उलटून पडणारे अन्न, पाणी वा द्रव्य याचा रंग, वास, स्वरूप समजून घ्यावे. उलटीनंतर बरे वाटते का याची माहिती हवी.

उपचारांची दिशा ः
विश्रांती घेण्याने, सावलीत बसल्याने, वेळेवर जेवल्याने बरे वाटते का यावर वायू वा पित्ताचा संबंध ठरविता येतो. लंघन केल्याने बरे वाटल्यास कफाचा संबंध लावता येतो. साळीच्या लाह्या खावून बरे वाटल्यास पित्ताचा स्तर, द्रव गुण वाढला आहे असे कळते. पित्त पातळ आहे असा निष्कर्ष काढता येतो. आंबा, जांभूळ यांची पाने चघळून उलटी थांबली असता पित्त संबंध ठरविता येतो. गर्भिणीच्या उलट्यांकरिता जेवणाची वेळ बदलून उपयोग होतो का पहावे.

अनुभविक उपचार ः
१) उष्ण पदार्थामुळे, उन्हातान्हात हिंडल्यामुळे उलट्या होत असल्यास लघुसुतशेखर व कामदुधा प्रत्येकी ३ गोळ्या सकाळी व सायंकाळी घ्याव्यात.
२) अजीर्ण किंवा कमी-अधिक खाण्यामुळे उलटी होत असल्यास लंघन करावे, आल्याचा तुकडा चघळावा.
३) उकळलेले पाणी प्यावे.
४) अजीर्णामुळे होणार्‍या उलट्या न थांबल्यास ओवा असलेले हिंगाष्टक पाचक अशी चूर्णे, शंखवटी गोळ्या जेवणानंतर घ्याव्यात.
५) कॉलरात दूषित पाणी, अन्न अशा कारणांनी उलट्या, जुलाब व पोटदुखी असल्यास अमृतधारा या औषधांचे चार-पाच थेंब कोर्‍या कॉफीबरोबर वा गरम पाण्याबरोबर घ्यावे.
६) गर्भिणीच्या उलट्यांकरिता खूप सकाळी लवकर काहीतरी खावे, हा एक खात्रीचा उपाय आहे. लाह्या, राजगिरा लाडू, शतावरी कल्प, बदाम कल्प असे काहीतरी पौष्टीक पदार्थ वेळ बदलून खावेत.
७) लघुसुतशेखर, प्रवाळ, कामदुधा, मौक्तिक भस्म यातील औषधे आलटून पालटून गर्भिणीच्या उलट्यांकरीता घ्यावीत.
८) आंबा, जांभूळ यांची कोवळी पाने चघळून खाल्ल्यास उन्हातान्हात हिंडल्यामुळे होणारी उलटीची भावना कमी होते.
९) बस वा विमान प्रवासात उलटी होणे थांबण्याकरीता लघुसुतशेखर् हे उत्तम औषध आहे.