सोमवारी रात्री गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अंकोल्याजवळ झालेल्या अपघातात श्री. नाईक यांच्या पत्नी सौ. विजया नाईक या अचानकपणे हे जग सोडून जातील याची स्वप्नातही कुणी कल्पना केली नव्हती. आता उरल्या आहेत केवळ त्यांच्या आठवणी अनेक सुहृदांच्या मनात… तेव्हा
- श्री. राजेंद्र आर्लेकर काल विजयावहिनींच्या अपघाताची बातमी ऐकून धक्काच बसला. त्या अचानकपणे अशा निघून जातील याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आता उरल्या आहेत त्यांच्या केवळ आठवणी.
विजयावहिनींचा स्वभावच असा होता की त्यांच्या घरातलं वातावरण सगळ्याना आपलंसं करणारं होतं. आल्या-गेल्याची विचारपूस, सरबराई त्या इतक्या आस्थेने आणि जातीने लक्ष घालून करायच्या की त्यांच्याकडे परकं कुणाला वाटायचं नाही. त्यामुळे सगळ्यांना जोडून ठेवण्यात वहिनींचा खूप मोठा वाटा होता. एक प्रसंग आठवतो- एकदा मी, माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी आमच्या स्कूटरवरून जात असताना त्यांच्या घराजवळच आमच्या स्कूटरचा टायर फाटला नि मोठ्ठा आवाज झाला. आवाज ऐकल्याबरोबरच त्या धावतच बाहेर आल्या आणि आम्हाला सगळ्यांना घरात बोलावलं. माझी मुलं त्यावेळी खूप लहान होती. त्यामुळे ती आणि माझी पत्नीही खूप घाबरलेली होती. तेव्हा विजयावहिनींनी पाणी. चहा-कॉफी दिली आणि आम्हाला धीर दिला. शिवाय आमची स्कूटरही पोचवून देण्याची व्यवस्था केली. अशाप्रकारे वहिनींनी त्यावेळी केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकत नाही.
केवळ बाहेरच्याच नाही तर स्वतःच्या नात्यातल्या लोकांनासुद्धा त्यांनी जवळ ठेवलेलं आहे. विजयावहिनी मूळच्या कुंडईच्या. श्री संतोष महानंदू नाईक हे त्यांचे बंधू. त्यांमुळे त्यांचा तपोभूमीशी, पू. श्रीब्रह्मानंद स्वामींशी आणि पू. श्रीब्रह्मेशानंद स्वामींशी संबंध होता. एकूणच त्यांच्या माहेरचा गोतावळा, सासरचा गोतावळा या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणे एवढं काही सोप्पं नाहीये. पण वहिनींच्या स्वभावातच असल्यामुळे त्यांना हे सगळं शक्य झालं. श्रीपाद भाऊंचं संघाचं काम, बीजेपीचं काम इतका मोठा व्याप सांभाळण्याच्या त्यांच्या कामात वहिनींचा खूप मोठा वाटा आहे. एकूणच श्रीपादभाऊंचं व्यक्तिगत आयुष्य असो अथवा सार्वजनिक आयुष्य, विजयावहिनींची भूमिका खूप महत्त्वाची होती, असं मला वाटतं.
………………………… - श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर
विजयावहिनींच्या आता केवळ आठवणीच तर उरल्या आहेत. काय सांगावं त्यांच्याबद्दल, त्या अतिशय सुस्वभावी, भाविक, श्रद्धाळू. देवावर त्यांचा प्रचंड विश्वास. त्यामुळे देवदर्शनातून त्यांना खूप आनंद मिळायचा. देवदर्शनातून पुण्य मिळावे आणि ते मिळते यावर त्यांची पूर्ण श्रद्धा! पण हे पुण्य स्वतःपुरतं सीमित न ठेवता ते आपल्या मित्रमंडळींना, जवळच्या आप्तमंडळींना मिळावं आणि त्यासाठी त्यांना आग्रह करणं असायचं.
मला नक्की वर्ष आठवत नाही पण एक दिवस त्यांचा फोन आला आणि स्मिता आहे कां म्हणून विचारलं. मी फोन स्मिताला दिला. तर त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं- आपल्याला मातेचं बोलावणं आलं आहे. सर्वांना वैष्णोदेवीला जायचंय. तुमची तिकिटं काढली आहेत. आपण मडगावला भेटू.
येणार का किंवा नाही याबद्दल कधीच विचारणा केली नाही. त्यावेळी श्रीपादभाऊ दिल्लीला असायचे. त्यामुळे राजधानीची तिकिटे होती. आणि ठरल्याप्रमाणे आम्हीही तयारी केली नि निघालो दिल्लीला. तिथे गेल्यानंतर कळलं की फक्त आम्हीच लोक नाही तर आणखीही काही लोकं होती, थोडी-थोडकी नाहीत तर जवळपास २०-२५ लोकं होती. गाडीमध्ये जेवणाचा डबाही आणला होता. त्यांची ओळखही झाली. तर आम्ही दिल्लीला श्रीपादभाऊंच्या बंगल्यावर उतरलो. त्याच दिवशी दुपारची जम्मुतावी एक्सप्रेस होती. तिथे आमच्यासोबत श्रीपादभाऊपण आले होते. तिसर्या दिवशी आम्ही कटर्याला पोहोचलो. हॉटेलमध्ये सर्वांची व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती.
सकाळी ६ वाजताच विजयावहिनी आणि काही लोकांनी चालायला सुरुवात केली. वैष्णोदेवीचं दर्शन पायीच केलं पाहिजे ही त्यांची भावना होती. आम्ही मात्र काही ना काही वाहनांची व्यवस्था करून मंदिरापर्यंत गेलो. वहिनी तिथे सगळ्यात आधी पोचल्या होत्या आणि त्याच उत्साहाने, आनंदाने त्यांनी आमचे स्वागत केले. दर्शन चांगले झाले.
तिथे भयंकर थंडी होती. तेव्हा हॉटेलमध्ये वहिनी सगळ्यांच्या खोलीमध्ये जातीने जाऊन, सगळ्यांची चौकशी करीत होत्या की कुणाला पांघरुण वगैरे पाहिजे का? गरम पाणी मिळाले का? वगैरे वगैरे.
तर असा त्यावेळी मला त्यांचा २-३ दिवसांचा सहवास लाभला आणि एक वेगळा अनुभव आला. त्यांची हीच गोष्ट मला कौतुकास्पद वाटली की बरेच जण देवदर्शनाला जातात. पण ते स्वतःपुरताच विचार करतात. पण विजयावहिनींना वाटायचं की आपल्याबरोबर इतरांनाही पुण्य मिळावं. दर्शन व्हावं. हा फार मोठा हेतू त्यांचा होता.
पुढे आणखी एकदा आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा हरिद्वार, ऋषीकेषला दिल्लीहून गेलेलो. त्या स्वतः बरोबर नसल्या तरी त्या गाडी द्यायच्या. साधूसंतांचे आशीर्वाद इतरांनाही मिळावे असा वहिनींचा आग्रह असायचा. असा हा त्यांच्या स्वभावातला वेगळेपणा त्यांनी शेवटपर्यंत जपला होता.
त्यांच्या घरी गेलेल्या माणसाचे उत्साहाने आणि आनंदाने आगत-स्वागत व्हायचेच. त्यांना न कळवता वेळेवर कुणी जेवणासाठीही आलेत तरी त्यांच्या कपाळावर आठी नसायची. सर्वांना वाटून देण्यातच त्यांना आनंद मिळायचा.
त्यांचं दिल्लीचं घर म्हणजे गोवेकरांसाठी धर्मशाळाच होती असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. अक्षरशः रीघ राहायची त्यांच्या बंगल्यावर. फक्त त्यांच्याच मतदारसंघातले लोक नाही तर दक्षिण गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीपासून सगळे लोक तिथे पोचायचे. दोघांच्याही स्वभावामध्ये जो आपलेपणा होता, त्यामुळे सगळ्यांना त्यांच्या घरी मोकळे वाटायचे.
आज त्यांचं स्मरण झालं की …. भरून येतं!!