>> उत्पल पर्रीकर यांचा भाजपला इशारा
>> पणजीतून तिकीट मिळण्याचा विश्वास
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून उमेदवारी न मिळाल्यास कठोर निर्णय घेणार असल्याचा इशारा दिला आहे. आपल्याला पणजीतूनच उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आपले वडील मनोहर पर्रीकर यांनी गेली २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व केले असल्याचे उत्पल यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी पुढे बोलताना उत्पल यांनी, आपण पक्षाला आधीच सांगितले आहे. मला पणजीतून निवडणूक लढवायची आहे. पक्ष मला विधानसभेची उमेदवारी देणार याची मला खात्री आहे. सध्या येथील बाबूश मोन्सेरात हे पणजीचे आमदार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले आणि नंतर भाजपमध्ये दाखल झाले होते.
यावेळी भाजडपची उमेदवारी न मिळाल्यास आपण काय करणार असे विचारले असता उत्पल यांनी, मला सध्या या विषयावर बोलण्याची गरज नाही. मनोहर पर्रीकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. त्याचप्रमाणे मलाही हव्या असलेल्या गोष्टींसाठी खूप मेहनत करावी लागेल याची जाणीव आहे. कठोर निर्णय घेण्यास आपल्याला भाग पाडले जाऊ शकते याचीही आपल्याला कल्पना आहे. मात्र असा निर्णय घेण्याचे बळ मिळावे हीच देवाकडे प्रार्थना करतो असे सांगून उत्पल यांनी, जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा मी जनतेचे ऐकेन. मी पक्षाला सांगितले आहे. पक्ष मला उमेदवारी देईल, याची मला खात्री आहे, असे पुढे सांगितले.
भाजपची उमेदवारी मिळणारच
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पणजी मतदारसंघातील उमेदवारी आपणाला मिळेल, असा विश्वास यावेळी उत्पल यांनी व्यक्त केला.
उत्पल पर्रीकर यांनी वाढदिवसानिमित्त येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद घेतला. यावेळी उत्पल पर्रीकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी माझी भूमिका भाजपच्या नेत्यांसमोर मांडली आहे. भाजपच्या पणजी मतदारसंघातील उमेदवारीवर दावा केला असून ही उमेदवारी मला निश्चित मिळेल. आम्हांला विजय मिळविण्यासाठी परिश्रम, कष्ट करावे लागतील. मी कुणालाही मंदिराच्या ठिकाणी बोलावलेले नाही. मला वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे आले आहेत, असेही उत्पल यांनी सांगितले.