>> आमदार बाबूश मोन्सेरात यांची भूमिका
विधानसभा निवडणुकीसाठी काही पक्षांनी उमेदवारांच्या एक-दोन याद्या जाहीर केल्या आहेत; मात्र सत्ताधारी भाजपने अद्याप एकही यादी जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे पणजी मतदारसंघाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पक्ष जोपर्यंत आपल्याला उमेदवारी जाहीर करत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार नसल्याचे काल स्पष्ट केले.
मोन्सेरात हे रविवारपासून पणजीतून प्रचाराला प्रारंभ करणार होते; पण नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला होता. याविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पक्षाला प्रथम आपल्याला उमेदवारी जाहीर करू द्या. पक्षाने आपणास उमेदवारी जाहीर केली की, मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे, असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. मतदारांपर्यंत पोहोचायला आपणाला वेळ लागणार नसल्याचेही ते म्हणाले.
…म्हणून उमेदवारी जाहीर
झाल्यानंतर प्रचार : मोन्सेरात
आपण जर भाजपचा उमेदवार म्हणून पणजीत प्रचार करू लागलो आणि त्याचवेळी जर आपणाला मतदारांकडून आणखी दोघे-तिघेजण भाजपचे उमेदवार म्हणून पणजीत प्रचार करीत असल्याचे सांगण्यात आले, तर आपणाला ते आवडणार नाही. त्यामुळे आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतरच आपण पणजीतून प्रचार सुरू करणार असल्याचे बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.