उपेक्षिताचा अंत

0
305


अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्तापर्वाचा एक जवळचा साक्षीदार काल राजधानी दिल्लीत असूनही एकाकी निजधामाला गेला. जसवंतसिंह गेले. राजस्थानच्या बारमेरसारख्या ओसाड, वाळवंटी जिल्ह्यातल्या जसोलचा हा खडबडीत, राकट, सैनिकी शिस्तीतला माणूस या देशाची परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि अर्थक्षेत्राची धुरा एका आव्हानात्मक कालखंडामध्ये समर्थपणे सांभाळून राहिला होता. अमेरिकेने पोखरण अणुचाचण्यांनंतर भारतावर घातलेल्या निर्बंधांविरुद्ध लढला होता, अतिरेक्यांनी आयसी ८१४ अफगाणिस्तानात कंदाहारला पळवून नेले, तेव्हा त्या सैतानांशी वाटाघाटी करण्यासाठी सर्वशक्तीनिशी पुढे सरसावला होता.
भारतीय जनता पक्षाचे पहिलेवहिले सरकार देशात सत्तेवर आले, तेव्हा त्याचा कणा म्हणून जसवंतसिंह वावरले. ज्या पक्षासाठी हयात वेचली, त्याच पक्षाने केवळ जिनांवर पुस्तक लिहिले म्हणून शिमल्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये परस्पर निर्णय घेऊन हकालपट्टी केली, पुढे नीतिन गडकरींच्या मध्यस्थीने पुन्हा पक्षात बोलावून देखील लोकसभेची उमेदवारी अपमानास्पदरीत्या नाकारली, ते सगळे जिव्हारी लागलेले व्रण सोबत घेऊन हा एकांडा शिलेदार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
जसवंतसिंहांचे जिनांवरील पुस्तक हे कुठेही पाकिस्तानचे समर्थन करीत नाही. केवळ एका अभ्यासकाच्या नजरेतून, एकेकाळी हिंदू – मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाणारे महंमदअली जिना पुढे पाकिस्तानचे कैद ए आझम कसे बनले या स्थित्यंतराचा शोध घेण्याचा तटस्थ प्रयत्न करते, परंतु त्यांच्या पक्षासाठी त्यांचे हे कृत्य राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे ठरले आणि २००९ च्या निवडणुकीतील पानिपताची कारणे शोधा असे ताठ मानेने सांगणार्‍या जसवंतसिंहांना या पुस्तकाचे निमित्त करून पक्षाबाहेर काढले गेले. वास्तविक, वाजपेयींसोबत लाहोर बस यात्रेवर आपण गेलो तेव्हाच आपल्याला या पुस्तकाची कल्पना स्फुरली आणि पुढे २००४ साली जेव्हा आपण मंत्री नव्हतो, तेव्हा मिळालेल्या फावल्या वेळामध्ये हे पुस्तक लिहिले, ते का लिहिले आहे हे त्यांनी स्वतःच त्यात विस्ताराने लिहिले आहे. या देशाची फाळणी का झाली त्याची कारणे खोलवर जाऊन शोधण्याच्या उद्देशाने त्यांनी हे पुस्तक लिहिले. परंतु जिनांवर पुस्तक लिहिणे हे जसवंतसिंहांचे घोर पाप ठरले. त्याला आणखी एक कारण होते ते म्हणजे त्यांना रा. स्व. संघाची पार्श्वभूमी नव्हती. राजमाता विजयाराजे शिंदेंमुळे ते वाजपेयींच्या जवळ आले आणि त्यांचे एक खंदे शिलेदार बनले. लालकृष्ण अडवाणींनी आपल्या ‘माय कंट्री, माय लाइफ’ मध्ये म्हटले आहे की, संघाची पार्श्वभूमी नसली तरीही पक्षाचे एक महत्त्वाचे नेते ठरलेली एकमेव व्यक्ती आमच्यासोबत होती ती म्हणजे जसवंतसिंह. कदाचित त्यांचे हे उपरे असणे हेच त्यांच्यासाठी पुढे मारक ठरले असावे. विशेष म्हणजे जिना प्रकरणात ज्या अडवाणींनी जसवंतसिंहांचे समर्थन करणे टाळले, त्या अडवाणींचीही पुढील काळात पक्षात तीच गत झाली जी जसवंतसिंहांची झाली होती. कालाय तस्मै नमः म्हणतात ते असे.
जसवंतसिंहांनी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात देशाला दिलेले योगदान न विसरता येण्यासारखे आहे. वाजपेयींसाठी नेहमी ते संकटमोचक म्हणून वावरले. महासत्ता अमेरिकेपासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वांशी मुत्सद्देगिरीने वाटाघाटी करण्यासाठी त्यांनाच पुढे केले गेले. मसूद अजहर आणि अन्य दोघा दहशतवाद्यांना घेऊन स्वतः कंदाहारला जाऊन अपह्रत प्रवाशांची सुटका करणार्‍या जसवंतसिंहांवर कमकुवतपणाचा शिक्का लागल्याखेरीज राहिला नाही, परंतु मुळातच लष्करी बाणा अंगी बाणवलेला असल्याने हे सगळे घाव हसत हसत त्यांनी सहन केले. राजकारण हे शेवटी फार निर्दयी असते. ते कधी कोणाला वर उचलेल आणि कधी कोणाला उपेक्षेच्या खोल खाईत फेकून देईल सांगता येत नाही. काळाची चक्रे उलटत गेली, तसा जसवंतसिंह नावाचा हा मोहरा त्याच्या ताठ कण्यामुळे काहींना खुपू लागला. वाजपेयी पर्वाचा हा संध्याकाल होता. नवे वारे पक्षामध्ये वाहू लागले होते. ज्यांनी उगवत्या सूर्याला दंडवत घातले ते टिकले, नव्या वातावरणात सामावले गेले. जे गतकाळाचे उसासे सोडत राहिले ते बाजूला फेकले गेले. जसवंतसिंहांनी तर दंडच थोपटले होते. २००९ मधील पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्याचे आव्हानच त्यांनी पक्षनेतृत्वास दिलेले होते. तो सत्यशोधन अहवाल कधी उजेडात आला नाही. जसवंतसिंह मात्र काळोखात फेकले गेेले. आज हा माणूस काळाआड होत असताना अनेकांना त्यांच्याविषयीचे उमाळे येत आहेत, परंतु त्यातले खरे किती आणि खोटे किती हा प्रश्नच आहे. वाळवंटात वाढलेला हा रांगडा गडी आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये राजकीय वाळवंटाच्या ओसाडीतच अस्ताला गेला आहे.