उपयुक्त टाकळा, तांदुळजा भाजी

0
1299
  •  डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज-पणजी)

टाकळ्याच्या बिया उत्तम कृमीनाशक आहेत तर तांदुळजाची भाजी थंड असते. त्यामुळे हातापायांची जळजळ, लघवीला दाह, डोळे लाल होणे वगैरे तक्रारींवर तांदुळजाचा दोन-तीन चमचे रस, खडीसाखर व तूप मिसळून घेण्याचा उपयोग होतो.

पालेभाज्या म्हटल्यावर नजरेसमोर येतात मेथी, पालक, मुळा, लालमाठ इत्यादि. पण पावसाळ्यातही काही उगवणार्‍या पालेभाज्या आहेत. ज्या भाज्या म्हणून तर उपयुक्त आहेतच, पण त्यांना औषधीय महत्त्वसुद्धा आहे.

-ः टाकळा ः-

ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. हवी तेवढी म्हणजे मोठ्या प्रमाणावर उगवते. रस्त्याच्या कडेला, लागवड न करताही ही भाजी येते. साधारण दोन-तीन फूट उंच वाढते. याला पिवळी फुले येतात. लांबसडक बारीक शेंगा येतात. शेंगेमधील बी हुबेहूब मेथीच्या बीप्रमाणे दिसते. कोवळ्या पानांची भाजी केली जाते.
आयुर्वेदात टाकळा हा त्वचारोगांवरचे उत्तम औषध समजले जाते. याची भाजीसुद्धा त्वचारोगांमध्ये उपयुक्त ठरते.
चक्रमर्वो लघुः स्वादु रुक्षः पित्तानिलापहः|
हृद्यो हिमः कफश्‍वासकुष्ठदद्रुकृमी न्हरेत॥

टाकळा पचायला हलका, चवीला गोड, गुणाने रुक्ष असतो. पित्तदोष तसेच वातदोषाला कमी करतो, हृदयासाठी हितकर, वीर्याने शीत, कफनाशक, दमा, त्वचारोग, खाज, जंत यांचा नाश करणारा असतो. अंगाला खाज येत असल्यास टाकळ्याची भाजी उत्कृष्ट पथ्यकर समजावी. विशेषतः गजकर्ण या विकारावर टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाणे व पानांचा रस खाज येणार्‍या जागेवर लावणे हे उपयोगी पडते.

* खरुज ः खरुज हासुद्धा खाज येऊन बेजार करणारा त्वचाविकार आहे. खरुज ओली असो वा कोरडी, त्यावर टाकळ्याची पाने वाटून तयार केलेल्या चटणीची चकती लावून ठेवल्याने आराम मिळतो. बरोबरीने टाकळ्याची भाजी आहारात समाविष्ट करावी.
– शरीरावर चरबीच्या गाठी आल्या असल्यास त्यावर टाकळ्याची पाने वाफवून सोसवतील इतकी गरम करून बांधून ठेवावी. गाठीमुळे होणार्‍या वेदनासुद्धा कमी होतात.
– अंगावर पांढरे डाग पडणे, विशेषतः चेहर्‍यावर फिकट पांढरे डाग येणे, अंगाला खाज येणे, पोटात जंत होणे वगैरे तक्रारींवर टाकळ्याची भाजी लाभदायक ठरते.
– अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी टाकळ्याच्या पानांचा रस, विशेषतः पोट, नितंब याठिकाणी चोळावा.
– त्वचा सतेज व उजळण्यासाठी टाकळ्याच्या पानांच्या रसात मसुरीचे पीठ भिजवून ते उटण्याप्रमाणे लावावे.
– मुका मार लागल्याने सूज आली असेल, त्याठिकाणी वेदना होत असतील तर त्यावर टाकळ्याची पाने वाफवून शेकण्याचा उपयोग होतो.
– टाकळ्याच्या बिया उत्तम कृमीनाशक आहेत. जंत पडण्यासाठी अर्धा चमचा प्रमाणात या बियांचे चूर्ण तीन दिवस घेऊन नंतर एरंडेल तेलाने जुलाब करावे.

-ः तांदुळजा – चवळी ः-

औषधात ही तांदुळजा भाजी बर्‍याच प्रमाणात वापरली जाते. याला काहीजण चवळीची भाजी असेही म्हणतात. मात्र चवळी या कडधान्याची ही भाजी नव्हे. ही भाजी बाराही महिने उगवते. हिची पाने लहान असतात व उंचीने दोन-तीन वीत इतकीच वाढते.

तण्डुलीयो लघु शीतो रुक्षः पित्तकफास्रजित्‌|
सृष्टमूत्रमलो रुच्यो दीपनो विपहारकः॥

– तांजुळजा पचायला हलका, वीर्याने थंड व रुचकर असतो. पित्तदोष, कफदोष व रक्तदोषात हितकर असतो, मलमूत्रस प्रवर्तनास मदत करतो, अग्नी प्रदीप्त करतो व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषाचा नाश करतो.
– तांदुळजा ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारा आहे. तसेच अग्नी प्रदीप्त करणाराही आहे. त्यामुळे ताप आलेला असताना तांदुळजाची भाजी खाण्याने ताप कमी होतो, भूक सुधारते, तोंडाला चव येण्यास मदत मिळते.
– तांदुळजा सारक म्हणजे पोट साफ होण्यास मदत करणारा आणि अतिसारनाशक म्हणजे जुलाब होत असल्यास थांबवणाराही आहे. पोट साफ होण्यासाठी ही भाजी उत्तम होय.
– तांदुळजाचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ती विषाचा नाश करण्यात श्रेष्ठ आहे. कोणतेही विष पोटात गेले तर तांदुळजाची भाजी खाणे हितावह असते किंवा तांदुळजाच्या पानांचा रस काढून ती तुपासह घेणे चांगले असते.
– तांदुळजा लघवी साफ होण्यास मदत करणारी आहे. लघवी कमी होत असली तरी किंवा अडखळत होत असली तर तांदुळजा भाजी-भाकरी खाण्याचा किंवा तांदुळजा भाजीचा सूप करून त्यात धण्याची पूड मिसळून घेण्याचा फायदा होतो.
– भाजल्यामुळे जखम झाली असेल तर त्यावर तांदुळजाचा रस नुसता लावल्यावर उपयोग होतो. यामुळे दाह शांत होतो, तसेच जखम लवकर भरून येते.
– तांदुळजाचे मूळ गर्भाशयावर औषधाप्रमाणे उपयोगी असते. विशेषतः गर्भाशयातील उष्णता कमी होण्यासाठी तांदुळजाचे मूळ तांदळाच्या धुवणात उगाळून तयार केलेली पेस्ट रोज एक चमचा या प्रमाणात घेण्याचा उत्तम फायदा होतो. मासिक पाळी अलिकडे येणे, अंगावरून जास्त प्रमाणात व जास्त दिवस जाणे, अधून-मधून काळपट जाणे या सर्व तक्रारींवरही ही पेस्ट घेणे हितावह असते.
गर्भारपणात रस्तस्त्राव होतो त्यावरही तांदुळजाचे मूळ तांदळाच्या धुवणात वाटून तयार केलेली चटणी एक-एक चमचा या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावी. विषारी प्राणी चावला असता त्याचे विष शरीराबाहेर निघून जावे यासाठी तांदुळजा उपयोगी असतो. म्हणून विंचू, उंदीर, गांधीलमाशी, मधमाशी वगैरेंच्या दंशावर तांदुळजाच्या मुळाचा रस काढून तो तूप, साखरेसह काही दिवस घेणे चांगले असते. या दरम्यान अधून मधून तांदुळजाची भाजी आहारात घेणे हे सुद्धा चांगले.

तांदुळजाची भाजी थंड असते. त्यामुळे हातापायांची जळजळ, लघवीला दाह, डोळे लाल होणे वगैरे तक्रारींवर तांदुळजाचा दोन-तीन चमचे रस, खडीसाखर व तूप मिसळून घेण्याचा उपयोग होतो.
अंगावर पित्ताच्या गाठी उठत असल्यास, पित्तामुळे पुळ्या येत असल्यास, खाज येत असली तर त्यावर मसुरीचे पीठ, ज्येष्ठमध, अनंतमूळ, वाळा यापैकी मिळतील ती द्रव्ये समभाग घेऊन तांदुळजाच्या रसात मिसळावे व साबणाच्या ऐवजी वापरावे.
तांदुळजाची भाजी तेलाने करू नये. तूपामध्ये जिर्‍याची फोडणी देऊन त्यात कापलेली भाजी परतून वरून सैंधव, मिरे, आले, खोबरे टाकून भाजी बनवावी.