उपनिरीक्षकावरील हल्लाप्रकरणी संशयितास जामीन

0
107

वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने चलन दिल्याने संतापलेल्या स्कुटर चालक, त्याचा भाऊ व मित्राने उपनिरीक्षक झेवियर फर्नांडिस याच्या नाकावर ठोसा लगावून जखमी केले होते. या प्रकरणी माजोर्डा येथील रेंझिल काझ्मीरो डिकांश्ता (२०) याला पोलिसांनी अटक केली होती. काल न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
उपनिरीक्षक झेवियर हे कोलवा बेतालभाटी मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी तैनात होते. एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून जात असता, त्याला थांबवून परवाना मागितला असता तो नसल्याने चलन देण्यात आले. पण चलन स्वीकारण्यास नकार देऊन त्याने भाऊ व मित्राला बोलावले. काही वेळानंतर ते आले व पोलिसांशी हुज्जत घालू लागले व रागाने त्याने झेवियरच्या नाकावर ठोसा लगावला. त्यामुळे झेवियर यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. कोलवा पोलीस स्थानकावर यासंबंधी तक्रार नोंदवताच पोलिसांनी रेंझिलला अटक केली व झेवियर यांना इस्पितळात दाखल केले होते.
आल्तिनोत युवकावर तलवार हल्ला
आल्तिनो येथील उतरणीवर काल दुपारी एका युवकावर तलवारीने हल्ला करण्याची घटना घडली. गोविंद कुडतगी (२४) हा युवक काल दुपारी १.३० च्या दरम्यान, चालत जात असताना दुचाकीच्या मागे बसलेल्या आतिश कलंगुटकर या युवकाने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. आतिश याने आपल्या पाठीवर व उजव्या हातावर वार केल्याचे गोविंद याने पणजी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महाविद्यालयाच्या निवडणुकीच्यावेळी निर्माण झालेल्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. गोविंद याला इस्पितळात दाखल केले व त्याच्या जखमांवर टाके घालून त्याला घरी पाठवण्यात आले. हल्लेखोर फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दाबोळी विमानतळावर चोघांना अटक
दाबोळी विमानतळावर बेकायदा भाडे मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या व प्रवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांत समेश कवठणकर (दाबोळी), रुपेश पवार (पिळगाव-डडिचोली), चंद्रप्पा हरीजन (वाडे) व राजू नाईक (नवेवाडे) यांचा समावेश आहे.
मारहाणप्रकरणी गुन्हा नोंद
न्हयबाग पोरस्कडे येथील माजी सरपंच तनुजा तळावणेकर, विद्यमान पंच बाबी तळावणेकर यांना घरात शिगरून मारहाण केल्याप्रकरणी दिवाकर नागवेकर, काशीनाथ नागवेकर व विनायक नाईक यांच्याविरोधात पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तनुजा तळावणेकर यांनी याप्रकरणी पेडणे पोलिसांत वरील तिघांविरोधात तक्रार दिली होती. हा प्रकार बुधवार दि. २० रोझजी घडला होता. या उभयतांसोबतच कामगार मारुती पवार यालाही यावेळी मारहाण केली होती. तसेच बाबी यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याचेही सौ. तळावणेकर यांनी म्हटले आहे.
कोक पावडर घेऊन जाणारा ट्रक गायब झाल्याची तक्रार
मुरगाव येथून मुंबईकडे सुमारे ३५ लाख रुपयांची कोक पावडर घेऊन जाणारा ट्रक मुंबईला नियोजित स्थळी पोहोचला नसल्याने सदर कंत्राटदार कंपनीने मुरगाव पोलीस स्थानकात सदर ट्रक गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी मुरगाव बंदराकडून एकूण चार ट्रक कोक पावडर घेऊन भिवंडी येथे निघाले. त्यातील तीन ट्रक तेथे पोहोचले पण एक ट्रक (एमपी ०४ एचई ०८८७) पोहोचला नाही. शोध घेऊनही ट्रक न सापडल्याने तो गायब झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.
मोबाईल घेऊन पळताना रंगेहाथ पकडले
कुडचडे येथील महादेव मंदिराजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कुडचडे येथील शैलेश बांदेकर यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढत असताना त्यांना लोकांनी तेथे अडवून चोप दिला व त्यांना कुडचडे पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना बुधवारी रात्री घडली. रशीद महम्मद नसीस अहमद (२१) व अल्पवयीन मुलगा हे दोघे दुचाकीवरून (जीए ०८ पी ३२२५) आले व त्यांनी मोबाईल चोरला. सदर अल्पवयीनाला अपना घरमध्ये पाठवले आहे.
चौदा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार
ओगाव-लोटली येथून एक चौदा वर्षाचा मुलगा बेपत्ता झालेला होता. त्याचा तपास आजपर्यंत लागला नाही. मायणा कुडतरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. दहावी इयत्तेत शिकत असलेला हा विद्यार्थी हॉलीबॉल खेळाडू असून मडगाव येथे हॉलीबॉल संघात निवड केल्याचे सांगून सरवासाटी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. रात्रौ उशीरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियानी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविली.
दुकानातून सोन्याची चेन पळवली
काल गुरूवारी दुपारी गुरू ज्वेलर्स या सराफी दुकानात ग३ाहक म्हणून आलेल्या एका इसमाने ४५ हजार रुपयांची चेन पळवल्याची तक्रार दुकानदाराने केली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरट्याने टोपी घातल्याने चेहरा दिसत नाही.
विनयभंगप्रकरणी एकास अटक
फोंड्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी सापळा रचून महेश पांडुरंग पाटील (२८, खांडेपार) या तरुणाला अटक केली. सदर विनयभंगाचा प्रकार बुधवारी घडला होता. पोपलिसांनी काल गुरूवारी सदर मुलीला तसेच तिच्याकडे पाठवले असता त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडून अटक केली.