चापोली धरणावर दिवसाढवळ्या अश्लील व्हिडिओेचे चित्रीकरण करून तो व्हायरल करून सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या एका तथाकथित अभिनेत्रीच्या प्रतापांच्या विरोधात काणकोणवासीयांनी संघटितरीत्या जो लढा दिला तो कौतुकास्पद आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन त्यांनी काणकोणच्या प्रखर अस्मितेचे दर्शन या निमित्ताने जगाला घडवले आहे. चापोली धरणासारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना कोणीही यावे आणि भलते थेर करून जावे हा प्रकार मुळात घडू कसा दिला गेला हा या प्रकरणातील पहिला प्रश्न आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हाच प्रश्न सरकारला विचारला तो यथार्थ आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस तेथे तैनात होते की अशा गैरकृत्याला संरक्षण पुरवण्यासाठी?
तेथे कसले चित्रीकरण झाले हा त्यापुढचा भाग, परंतु मुळात प्रथम विनापरवानगी अशा प्रकारचे चित्रीकरण धरणासारख्या संवेदनशील ठिकाणी – तेही पोलिसांच्या समक्ष – त्यांच्या उपस्थितीत होते हीच मुळात गंभीर बाब आहे. दहशतवादाचा धोका सर्वत्र असताना अशा प्रकारची बेफिकिरी एखाद्या दिवशी फार घातक ठरू शकते. पोलिसांनी तेथे केवळ बघ्याची भूमिका घेणे म्हणूनच आश्चर्यकारक आहे.
सध्या काणकोणचे नाव या अभिनेत्रीमुळे पुन्हा पुन्हा चुकीच्या कारणांमुळे बातम्यांत झळकू लागले आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या पतीच्या विरोधात लग्नानंतर काही दिवसांतच विनयभंगाची तक्रार नोंदवून या अभिनेत्रीने खळबळ माजवली होती. लग्न झाले एक सप्टेंबरला आणि २० सप्टेंबरला पतीने म्हणे विनयभंग केला! काणकोण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन २३ तारखेला पतीला अटक केल्यानंतर सदर अभिनेत्रीने आपली तक्रार मागेही घेतली.
केवळ प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अशा प्रकारची नौटंकी करण्याची सदर महिलेची सवय फार जुनी आहे. २०११ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळी भारत जिंकला तर आपण विवस्त्र होऊ अशी जाहीर घोषणा करून या बाईंनी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीचा सारा झोत स्वतःकडे वळविला होता. कोणालाही माहीत नसलेले तिचे नाव एकाएकी सर्वांच्या तोंडी झाले होते! तेव्हा खरोखरच भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्यानंतर आपले वचन खरे करण्याच्या तिच्या प्रयत्नात शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून आडकाठी आणली होती. तरीही वानखेडे स्टेडियमवर रात्री जाऊन आपला ‘नवस’ तिने फेडला होता! पाचव्या आयपीएल स्पर्धेच्या वेळी देखील पुन्हा हाच ‘नवस’ तिने केला होता. सातत्याने स्वतःची विवस्त्र छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकून त्याद्वारे लोकप्रियता मिळवण्याचा हा प्रकार अजबच म्हणायला हवा. परंतु या उपद्व्यापांद्वारे प्रसिद्धीच नव्हे, तर भरपूर पैसाही मिळत असावा. आपल्याजवळ दुसरे काही नसले की शरीराचे असले थेर मांडले जात असतात. अशा सवंग प्रसिद्धीने तिला काही चित्रपटही मिळवून दिले. विद्यार्थ्याशीच शारीरिक संबंध ठेवणार्या शिक्षिकेची भूमिका रंगवण्याचे महत्कार्य सदर अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी एका चित्रपटात बजावले होते. धन्य तो पटकथालेखक आणि धन्य तो निर्माता!
सध्या या अभिनेत्रीचे काणकोण तालुक्यात वास्तव्य आहे. गोवा म्हणजे आज आव जाव घर तुम्हारा बनलेला आहे, त्याची ही अशी माणसे ही परिणती आहे. कोणी कुठे राहावे याला भारतीय संविधानानुसार कोणी आडकाठी करू शकत नाही हे जरी खरे असले, तरी आपल्या दुष्कृत्यांमुळे स्थानिक नागरिकांना जर उपद्रव होत असेल, तर असले पाहुणे हवेत कशाला? काणकोणची ही कीड स्थानिकांना उपद्रवकारक ठरते आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करणे हा भारतीय दंडविधानाच्या कलम २९४ खाली गुन्हा आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे काही जागृत नागरिकांनी सदर अभिनेत्रीविरुद्ध पोलीस तक्रारींचा सपाटा लावल्यानंतर कुठे जागे झालेल्या पोलिसांनी काल तिला आणि तिच्या मित्राला कळंगुटमधून ताब्यात घेतले. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणी काणकोणवासीयांचा तीव्र रोष लक्षात घेऊन संंबंधित पोलिसांना निलंबित करायला लावले आणि या राज्यात कायद्याप्रतीचा विश्वास पुनःप्रस्थापित केला हे ठीक झाले. असे प्रकार पुन्हा घडता कामा नयेत. अशा घटनांतून होणारी गोव्याची नाहक बदनामी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहणे जरूरी आहे. अशा सतर्कतेऐवजी पोलीस निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन राहणार असतील अथवा स्वतःच अशा बेकायदेशीर गोष्टींना उत्तेजन देण्यासाठी संरक्षण पुरवणार असतील तर मग त्याविरुद्ध जनता उभी राहिली तर तिला दोष का द्यायचा? काणकोणवासीयांवर ही पाळी पुन्हा आणली जाणार नाही अशी अपेक्षा आहे.