आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी परत अमेरिकेला जाण्यासाठी आज दुपारी गोव्यातून निघतील. १८ ऑगस्टपर्यंत उपचार घेऊन ते तेथून गोव्यात परततील. सुमारे आठवडाभर त्यांना उपचारासाठी अमेरिकेला थांबावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातील सूत्रांनी काल सांगितले.
ह्या आठवडाभराच्या काळात ते अमेरिकेतूनच प्रशासन सांभाळणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यादिनी पर्रीकर हे गोव्यात नसतील. राज्याचे मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी गोव्यात नाहीत अशी स्थिती पहिल्यांदाच उद्भवणार आहे, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
यापूर्वी अमेरिकेत तीन महिने आजारावर उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर गेल्या १४ जूनला गोव्यात परतले होते. त्यानंतर त्यांनी जोमाने कामाला सुरूवात करून अनेक महत्त्वाच्या फाईल्स हातावेगळ्या केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी विरोधकांना समर्पक उत्तरे देत छाप पाडली होती.