उन्हाळ्यातील आहार-विहार

0
473

डॉ. मनाली महेश पवार
(गणेशपुरी, म्हापसा-गोवा)

सर्वत्र वातावरणात उष्मा वाढलेला आहे. अंगाची नुसती लाही लाही होत आहे. खावसं काहीच वाटत नाही, पण थंडगार प्यावसं मात्र वाटतं. घरातील फ्रीज थंड पाण्याच्या बाटल्यांनी, सॉफ्ट ड्रींक्स, रसना सारखे ड्रींक्स, फ्लॅवरल्ड – ज्यूस सारख्या बाटल्यांनी तुडुंब भरलेले आहे. बाहेर गेलात तरी थंडपेय, घरात ए. सी., गाडीत ए. सी., ऑफिसात ए. सी. तरीही उष्णतेचा त्रास हा आहेच. असच काहींस चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.

फ्रीजमधले खाण्यापेक्षा किंवा सतत ए. सी.चा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक दृष्ट्या आपला आहार विहार कसा असावा, हे आपण पाहू. उन्हाळ्यातील उष्ण, गरम हवामानामुळे वातावरणातील एकूणच उष्ण, रूक्ष गुण वाढून शरीरातील पित्त गुण वाढवतो. त्याप्रमाणे शरीर शोष उत्पन्न होतो. तहान फार लागते. तसेच घाम फार येत असल्याने घामावाटे शरीरातील उपयुक्त क्षार व द्रव पदार्थ जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकले जाऊन आपणास अशक्तपणा वाटतो व लघवीलाही फार कमी होते. त्यामुळे पित्ताचे मन करणार्‍या पदार्थांवर जास्त भर द्यावा व त्यातही द्रव पदार्थांचे सेवन वाढवावे.
– उन्हाळ्यात शक्यतो जास्त थंड, पातळ द्रव पदार्थ दिवसभर घेतले पाहिजेत. त्यामुळे शरीरात गारवा राहून शरीरातील उष्णतेचे मन होते.
– प्रमाणात जास्त पातळ पदार्थांचे सेवन केल्याने लघवीलाही साफ होते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. परिणामतः मूतखडा किंवा लघवीच्या इतर तक्रारी होत नाहीत.

कोणते पान करावे?
– थंड पाणी – थंड पाणी म्हणजे फ्रीजमधील किंवा बर्फ घातलेले पाणी मुळीच नाही. ‘अक्षयतृतीया’ दिवशी मातीचा माठ बाहेर काढावा व त्या दिवसापासून मातीच्या माठामध्ये पाणी भरावे व हे निसर्गतः थंड झालेले पाणी प्यावे. शक्य असल्यास या पाण्यात स्वच्छ धुऊन वाळा घालावा, म्हणजे पाण्याला सुगंधही छान येतो व वाळा हा उत्तम पित्तशामक होय. याच पाण्यात थोडेसे मीठ, साखर व लिंबू पिळून टाकल्यास उत्तम ओ. आर. एस. ड्रींक तयार होते, ज्याचे सेवन केल्याने घामावाटे शरीरातून बाहेर जाणार्‍या मिठाची भरपाई होते.
– फ्रीजमधील थंड पाणी पिल्याने सर्दी, पडसे, घसा दुखणे आवाज बसणे असा त्रास होतो.
– बाहेरून कडक उन्हातून आल्यावर लगेच घटाघटा गार पाणी मुळीच पिऊ नये. किंचित विश्रांती घेऊन एखादा गुळाचा खडा खाऊन वर थोडे पाणी सावकाशपणे प्यावे. म्हणूनच पूर्वी बाहेरून उन्हातून काम करून आल्यावर किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना गूळ-पाणी द्यायची पद्धत होती.
– त्याचबरोबर उन्हातून येऊन लगेच घटाघटा थंड पाणी पित्ताने उलट्याही होऊ शकतात.
– धण्याचे पाणी – धणेपूड रात्रभर थंड पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी ते पाणी गाळून साखर घालून प्यावे. किंवा सकाळी उठल्यावर साधारण एक लीटर धण्याचा काढा बनवून ठेवावा व दिवसभर थोडा थोडा पीत रहावा. यामुळे उत्तम पित्तशमन होऊन अन्नपचन चांगले होते, मूत्रविकार दूर होतात. हे पाणी किंवा काढा फक्त मूत्रविकार असलेल्यांना नसून याचे सेवन निरोगी मनुष्यसुद्धा करू शकतो.
नारळाचे पाणी – उन्हाळ्यात फिरायला गेल्यावर सॉफ्ट ड्रींक्स ऐवजी शहाळ्याचे पाणी प्यावे. याने पित्तशमन होऊन थकवा दूर होतो व त्याचबरोबर भरपूर लघवी होऊन मूत्रविकार टाळता येतात. तसेच गर्भिणीसाठीतर या दिवसात हे शहाळ्याचे पाणी म्हणजे अमृतच आहे. गर्भिणीला उन्हाळ्यात उष्णतेचा भरपूर त्रास होत असतो, तसेच गर्भजाच प्राकृत रहाण्यासाठी गर्भिणीने रोज शहाळ्याचे पाणी प्यावे.
ताक – आयुर्वेद शास्त्रामध्ये ताकाला फार महत्त्व आहे. अनेक पचन संस्थेतील रोगांवर ताक कार्य करते. ग्रहणी सारख्या रोगात तर रुग्णाला फक्त ताकावर राहण्यास सांगितले आहे. ताक पौष्टिक आहे, उत्तम पित्तशामक, अन्नपाचक असल्याने भूक चांगली लागते. आधुनिक शास्त्राप्रमाणे ताकामध्ये आपल्या अन्नपचनाला उपयोगी असणारे लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफायलस, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस इत्यादी असंख्य जंतू असतात. त्यामुळे ताक हे जुलाब, संग्रहणी इत्यादी पचनसंस्थेच्या विकारांवर उपयुक्त आहे. उन्हाळ्यात थंडगार ताजे ताक चवीला थोडे मीठ व मिरपूड लावून भरपूर प्यावे. उन्हाळ्यात ताक लवकर आंबट होते म्हणून ताजे, गोड ताक पिणेच चांगले.
उसाचा रस – उन्हाळ्यात प्रायः सर्वत्र मिळणारा व सर्वांना परवडणारा म्हणजे उसाचा रस. या रसात नैसर्गिक भरपूर शर्करा असल्याने हे पेय अत्यंत पौष्टिक असून ताबडतोब शीण दूर करणारे आहे. पित्तशामक, मूत्रल आहे, मात्र हा रस नेहमीच ताजा प्यावा. शिळ्या, काढून ठेवलेल्या रसाच्या सेवनाने उलट्या, जुलाब होऊ शकतात.

सरबते – उन्हाळ्यात थंडगार पाण्यात मीठ, साखर घालून लिंबाचे सरबत पिण्याने तहान भागते, पित्तशमन, दाहशमन होऊन हुशारी वाढते. त्याचप्रमाणे चंदन, वाळा, केवडा, गुलाब यांची सरबते उन्हाळ्यात पिणे हितकारक असतात. त्याचप्रमाणे कोकम सरबत, कैरीचे पन्हे ही सरबते पित्तशामक, दाहशामक, मूत्रजनक आहे. कैरीचे पन्हे उन्हाळ्यात दररोज प्याल्यास उन्हाळा बाधत नाही.
थंडगार दूध – उन्हाळ्यात येणारा अशक्तपणा दूर करण्यासाठी दूध हे एक उत्तम टॉनिक आहे. थंडगार दुधामध्ये साखर घालून पिण्याने पित्तशमन होते व शरीराची ताकद वाढते.
तुळस, सब्जाचे बी – तुळस वा सब्जा बी उत्तम बलवर्धक व पित्तशामक आहे. उन्हाळा सुसह्य होण्यासाठी थंड पाण्यात भिजवलेल्या तुळशी वा सब्जाच्या बियाची दुधात खीर करून प्यावी.

कुळीथ सूप – कुळिथाचे सूप किंवा काढा हे उत्तम मूत्रव्य असल्याने मूतखड्याचा त्रास असणार्‍यांनी उन्हाळ्यात रोज सेवन करावे.
विविध फळांचा रस – उन्हाळ्यात आंबा, द्राक्षे, संत्रे, अननस इत्यादी उन्हाळ्यात मिळणार्‍या फळांचा रस शक्यतो रोज अवश्य प्यावा. या फळांच्या रसामुळे पित्तशमन होऊन उन्हाळ्यातील अनेक विकार टळतात व अशक्तपणा दूर होऊन तरतरी, हुशारी वाढते. जेव्हा जेवण किंवा खायला नकोसे वाटत असेल तेव्हा फळांचा रस सेवन करावा.
आहारामध्ये काय खावे?
थंड, पित्तशामक गुणांचे गोड, कडू व तुरट रसाच्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.
– आपल्या आहारात भात, पोळी, भाकरी, मुगाची डाळ, सहज पचणारे पदार्थ घ्यावेत.
– उन्हाळ्यात उपलब्ध असणार्‍या कांदा, काकडी, तोंडले, वांगे, टोमॅटो, बटाटे, भोपळा इत्यादी फळभाज्या व पालक, मेथी, पुदिना, लालमाठ, कोथिंबीर या पालेभाज्या यांचा रोजच्या आहारात समावेश करावा.
रोजच्या आहारात कांदा, काकडी, टोमॅटो, कैरी, कोकम यांचा समावेश केल्यास व जोडीला रोज कैरी, पुदिन्याच्या चटणीचा वापर केल्यास उन्हाळा अजिबात बाधणार नाही.

उन्हाळ्यातील विहार
उन्हाळ्यात शक्यतो दररोज सकाळी व संध्याकाळी थंड पाण्याने आंघोळ करावी, थंड पाणी सोसवत नसल्यास कोमट पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ केल्याने गारवा वाटतो, उत्साह, तरतरीतपणा येतो. लहान मुलांचे पाणी शक्यतो सूर्याच्या उष्णतेने उन्हात तापवून स्नानासाठी वापरावे. पाण्यात कडुनिंबाचा पाला टाकल्यास पित्तशमन होते व त्वचाविकार होत नाही. रक्तशोधन होऊन घामोळे येत नाही.
– उन्हाळ्यात आधीच नैसर्गिक शक्ती कमी होत असल्याने अशक्तपणा जाणवतो म्हणून श्रमाचे व्यायाम टाळावे. त्याऐवजी सकाळी व सायंकाळी मोकळ्या हवेत पायी फिरणे, पोहणे, मैदानी खेळ खेळण्यासारखे व्यायाम प्रकार करावेत.
– पांढर्‍या रंगाचे शक्यतो कपडे वापरावेत. पांढर्‍या रंगामुळे सूर्याचा प्रकाश व उष्णतेचे परावर्तन होऊन शरीचेच तापमान वाढत नाही. साधे सुती व रेशमी कपडे वापरावेत. सुती कपड्यांमुळे अंगावरील घाम शोषला जाऊन त्वचेवरील हवा खेळती राहते.
– दिवसा कडक उन्हात बाहेर जाणे आवश्यक असल्यास अंगभर सुती व रेशमी सैलसर कपडे वापरावेत. कडक उन्हापासून डोके, मान व कान यांचे संरक्षण करण्यासाठी पातळ, सुती, पांढर्‍या रंगाचाच रुमाल वापरावा.
उन्हाळ्यातील वर्ज्य आहार-विहार
– मद्य अगदी बिअर सुद्धा पित्तवर्धक असल्याने वर्ज्य आहे.
– उन्हाळ्यात उष्ण, तीक्ष्ण गुणाचे तिखट, तेलकट पदार्थ शक्यतो कमी खावेत.
– चहा, कॉफीसारखे गरम, उष्ण पेये उन्हाळ्यात शक्यतो कमी करावी.
– फ्रीज मधील पाणी, बर्फाचे पाणी, आइस्क्रीम इत्यादी थंड पदार्थ टाळावेत.
अशाप्रकारे उन्हाळ्यात आहार विहाराचे नियोजन केल्यास उन्हाळा बाधत नाही.