>> सीआरपीएफच्या सुरक्षेचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश
उन्नाव (उत्तर प्रदेश) बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला अंतरीम भरपाई म्हणून २५ लाख रु.ची रक्कम देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल उत्तर प्रदेश सरकारला दिले. तसेच उत्तर प्रदेशचा भाजप आमदार कुलदिप सेनगर या आरोपीसह उत्तर प्रदेशमधील न्यायालयातील संबंधित सर्व पाच प्रकरणे दिल्लीतील न्यायालयात पाठवण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
बलात्कार पीडित तरुणीच्या कारवर ट्रक घालून तिला ठार करण्याचे कारस्थान तुरुंगात असलेल्या भाजप आमदार सेनगर याने केल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. सदर हल्ल्यात पीडीता व तिचे वकील गंभीर झाले असून कुटुंबातील दोन महिला ठार झाल्या. गेल्या आठवड्यातील या अपघातप्रकरणाचे तपासकाम सात दिवसांच्या आत पूर्ण करावे असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला असेही बजावले आहे की अपघात प्रकरणाच्या तपासकामाबाबतीत अपवादात्मक गोष्ट असल्यासच त्यांना तपासकामासाठी अतिरिक्त सात दिवसांचा अवधी मागता येईल.
बलात्काराचे जे मूळ प्रकरण आहे त्याचे तपासकाम दिल्लीतील न्यायालयात सुनावणीपासून ४५ दिवसांत पूर्ण करावे असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशाच्या नियुक्तीचा निर्णय याविषयीच्या बैठकीनंतर घेतला जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. या आदेशांमध्ये बदल करण्याची मागणी करणारी कोणतीही याचिका विचारात घेतली जाणार नाही असेही न्यायालयाने सुनावले.
बलात्कार पीडितेसह तिची आई व अन्य कुटुंबीय यांना केंद्रीय राखीव पोलिसांची (सीआरपीएफ) सुरक्षा देण्यात यावी व कमांडंट दर्जाच्या अधिकार्याने त्याबाबतचा अहवाल न्यायालयात त्वरीत सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. पीडिता व तिचे वकील हे त्यांना विमानाने दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचारांसाठी आणण्याच्या स्थितीत आहेत या सीबीआयच्या अहवालाची नोंदही न्यायालयाने घेतली आहे.
बलात्कारप्रकरणातील भाजप
आमदाराच्या बडतर्फीवर अस्पष्टता
उत्तर प्रदेशमधील बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेला भाजप आमदार कुलदिप सेनगर याला भाजपमधून काढून टाकण्यात आल्याचे भाजप नेत्यांनी काल जाहीर केले. बलात्कारासह खुनाचा आरोपही सेनगर याच्यावर नोंद झाला आहे. देशभरातून चौफेर टीका झाल्यानंतर त्याला भाजपने बडतर्फ केले आहे. बडतर्फीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळावा नसला तरी खासदार हेमा मालिनी यांनी सेनगर याला बडतर्फ केले हे योग्य झाले असे म्हटले आहे.