उद्योग उभारणीसाठी तात्काळ परवाने देणार

0
26

>> द्योगमंत्री गुदिन्हो; अधिक रोजगार निर्मिती करणार्‍या उद्योगांना प्राधान्य

गोव्याबाहेरील जे उद्योजक गोव्यात उद्योग स्थापन करण्यास इच्छुक असतील, त्यांना यापुढे येथे उद्योग उभारण्यास एका वर्ष कालावधीची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना विनाविलंब आवश्यक ते सर्व परवाने मिळतील, याकडे उद्योग खाते लक्ष देणार असल्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. पर्यावरणाचे नुकसान न करणार्‍या व मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती करणार्‍या उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योजकांना राज्यात विनाविलंब उद्योग उभारता यावेत व त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल व दुरुस्त्या करण्यात येणार असल्याची माहिती माविन गुदिन्हो यांनी दिली. पर्यावरण संरक्षण व रोजगार निर्मिती याबाबत उद्योजकांना स्वयंघोषणापत्र द्यावे लागेल. आपण जो उद्योग सुरू करू इच्छित आहे, तो पर्यावरणाचे नुकसान करणारा नसेल, तसेच तो मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा असेल, असे स्वयंघोषणापत्रक या उद्योजकांना सादर करावे लागेल. तशी अट उद्योजकांना घालण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी विनाविलंब भूखंड उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक ते परवाने विनाविलंब मिळतील, याकडे लक्ष देणे ही जबाबदारी उद्योग खाते घेणार असल्याचे गुदिन्हो म्हणाले.

दरम्यान, उद्योग खात्याचे संचालक व सचिवांना परराज्यांत पाठवले असून, हा त्यांचा अभ्यास दौरा असल्याचे ते म्हणाले.