उद्योगांना अखंडित वीजपुरवठा करा

0
22

>> सीआयआय गोवाची वीजमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील उद्योगांसाठी अखंडित वीजपुरवठा करण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाच्या गोवा शाखेने (सीआयआय) वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे केली आहे.

सीआयआय गोवाने राज्यातील उद्योगांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारला यापूर्वी अनेक शिफारशी केल्या आहेत. त्यात अखंडित वीजपुरवठा समाविष्ट आहे; परंतु आजपर्यंत त्या संदर्भात कोणतीही प्रगती झालेली नाही. विजेच्या व्होल्टेजमधील चढ-उतार, तफावत आणि अनियोजित पॉवर शटडाऊनमुळे उद्योगाला वेळ आणि पैशाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. विद्युत प्रवाहातील वाढीमुळे खूप महागड्या यंत्रसामग्रीचे आणि प्रक्रियेवर आधारित उद्योगातील कच्च्या मालाचे नुकसान होते, असे सीआयआयने म्हटले आहे.

अखंडित विजेच्या अभावामुळे उद्योगांना वीजपुरवठ्यासाठी जनरेटरवर अवलंबून राहावे लागत आहे. जनरेटरचा वापर हा पर्याय नाही; कारण ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही आणि उत्पादन खर्चात वाढ होते. वीज देखभालीचे काम पद्धतशीर, टप्प्याटप्प्याने आणि नियोजित पद्धतीने केले जाऊ शकते, उद्योजकांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आगाऊ सूचना दिली जाऊ शकते, असेही सीआयआयने म्हटले आहे. नवनियुक्त वीजमंत्री ढवळीकर यांनी या वीज प्रश्‍नाकडे लक्ष देऊन उद्योगाला भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी सीआयआय गोवाने केली आहे.