>> परप्रांतीय कामगार परतले नसल्याने बोट मालक चिंतेत
उद्या दि. १ ऑगस्टपासून राज्यात नव्या मच्छिमारी मोसमास प्रारंभ होणार असून त्यासाठी मच्छिमार सज्ज झाले आहेत. सर्वत्र मच्छिमारी जेटी परीसर गजबजून गेल्या आहेत.
१ जून ते ३१ जुलैपर्यंतचा काळ हा मासेमारीसाठी बंदी काळ असून या काळात मासेमारीसाठी खोल समुद्रात उतरण्यास मच्छिमार्यांना बंदी घालण्यात येत असते. परंतु या काळात पारंपारिक होड्यातून जास्त खोल समुद्रात न जाता मासेमारी केली जात होती. मासेमारी बंदी काळात यांत्रिक मच्छिमारीवर कडक निर्बंध घालून त्यांना मासेमारीपासून रोखले जाते. याची अंमलबजावणी न करणार्यांवर संबंधीत खात्याकडून कडक कारवाई करण्यात येते. त्याच अनुषंगाने मच्छिमारी व्यावसायिक आपले ट्रॉलर जेटीवर नांगरून ठेवतात. या दोन महिन्याच्या बंदी काळात ट्रॉलर मालकांनी आपले मच्छिमारी साहित्य तसेच आपल्या ट्रॉलरची दुरुस्ती काम करवून घेतले.
उद्यापासून मच्छिमारी सुरू होणार असल्याने खारीवाडा वास्को येथील मच्छिमारी जेटी गजबजून गेली आहे. दुरुस्ती कामासाठी ठेवलेले ट्रॉलर, मालकांनी जेटीवर नांगरून ठेवले आहेत.
ट्रॉलरवर काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे ट्रॉलर मालकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रॉलरवर सद्या बर्फ साठविण्याच्या कामाबरोबर जाळी चढवण्याचे कामही सुरू आहे.
दरम्यान, काही ट्रॉलरवरील कामगारांचा अजून थांगपत्ता न लागल्याने ट्रॉलर मालक चितेंत आहेत. कारण मच्छिमारी बंदी काळात गावी जाण्यापूर्वी या कामगारांना ट्रॉलर मालकांकडून गावाहून परतावे यासाठी त्याना आगाऊ रक्कम दिली जाते. परंतु थोडे कामगार मालकांचे फोन उचलत नसल्याने ट्रॉलर मालक चिंतातूर झाले आहेत.