उद्यापर्यंत खाण अवलंबितांना एक लाख द्या; अन्यथा आंदोलन

0
152

>> पिळये येथे खाण मंचच्या सभेत सरकारला इशारा

राज्यातील खाणी बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांची रोजीरोटी बंद झाली आहे. गणेश चतुर्थी कशी साजरी करायची हा प्रश्‍न निर्माण झाला असून सरकारने खाण अवलंबितांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक लाख रुपये २९ ऑगस्टपूर्वी घालावेत, अन्यथा शुक्रवारी ३० रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर खाण अवलंबित धरणे आंदोलन छेडतील असा इशारा गोवा खाण मंचच्या सभेत देण्यात आला. कामगार नेते पुती गावकर यांनी यासंबंधी माहिती दिली. या सभेला ट्रक, मशिनरी, बार्ज संघटनांचे प्रतिनिधी तसेच खाणींवर काम करणारे कामगार आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खाणींवर अवलंबून असलेले नागरिक उपस्थित होते.

तिस्क – पिळये येथील गोमंतक विद्यालय सभागृहात काल (मंगळवारी) गोवा खाण मंचच्या बॅनरखाली खाण अवलंबितांची सभा झाली. या सभेत कामगार नेते पुती गावकर तसेच मंचच्या अन्य पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

लोकांना झुलवत ठेवू नका
राज्यातील खाणी दुसर्‍यांदा बंद झाल्यानंतर सरकारकडून आतापर्यंत फक्त आश्‍वासनेच मिळाली आहेत. खाणी सुरू होणार की नाही हे स्पष्टपणे सांगा, लोकांना झुलवत ठेवू नका. ज्या खाण कंपन्यातील कामगारांना काढून टाकण्यात आले, काही कामगारांना अर्ध्या पगारावर ठेवण्यात आले आहे. तर काहीजणांना पगारच देण्यात आलेला नाही. त्यांना तसेच बार्ज कामगार, मशिनरी कामगार व खाणींवर अवलंबून असलेल्या प्रत्येक खाण अवलंबिताला महिना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये घरखर्च म्हणून द्यावे. तसेच कर्जफेडीसाठी चतुर्थीपूर्वी त्वरित एक लाख रुपये खाण अवलंबितांना अदा करावेत, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर खाण अवलंबित धरणे आंदोलन छेडतील, असा इशारा पुती गावकर यांनी दिला.

भाजप सरकार असूनही
कार्यवाही नसल्याने नाराजी
राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असूनही योग्य कार्यवाही होत नसल्याने उपस्थित खाण मंचच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खाण अवलंबितांना केवळ आश्‍वासनेच देण्यात येत आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसत नाही. मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले होते, पण आता चतुर्थी जवळ आली तरी अजून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे खाण बंदीच्या समस्येचा पाठपुरावा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी भेट घेण्याबाबत मागणी केली असली तरी अजून भेट झाली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.