उद्याच्या ‘भारत बंद’ला विरोधकांचा पाठिंबा

0
141

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी उद्या मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ हा भारत बंद पुकारला आहे. शेतकर्‍यांच्या या भारत बंदला देशभरातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ११ विरोधी पक्षांनी एक निवेदन जारी केले आहे. कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, पीएजीडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), आरएसपी, आरजेडी, द्रमुक आणि एआयएफबी यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि कृषी कायदा २०२० मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहोत, असे या निवेदनात विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

नवीन कृषी कायदे हे संसदेत लोकशाहीची पायमल्ली करून बनवण्यात आले आहे. या कायद्यांवेळी मतदान आणि चर्चाही झाली नाही. यामुळे आपला शेतकरी आणि कृषी व्यवस्था नष्ट होईल. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ९ डिसेंबरला रात्री ९ वाजता राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळही मागितला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

समाजवादी पक्ष यात्रा काढणार
शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे उद्यापासून किसान यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात सपा किसान यात्रा काढली जाईल अशी घोषणा समाजवादी पक्षाने केली आहे.

आम आदमी पक्षाचा पाठिंबा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील जनतेने शेतकर्‍यांचे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

कॉंग्रेसचा पाठिंबा
मंगळवार दि. ८ डिसेंबरच्या भारत बंदला कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. याआधीही कॉंग्रेस पक्षाने संसदेपासून ते रस्त्यापर्यंत शेतकरीविरोधी तिन्ही कायद्यांविरोधात जोरदार लढा दिला आहे, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

आंदोलकांसोबत शिवसेना
शिवसेनेने काल शेतकर्‍यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा देणार असल्याचे आश्‍वासन काल शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांना दिले. शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने काल रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे आश्‍वासन दिले.

शांततेने करणार निदर्शने
शेतकरी नेत्यांनी काल रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्याच्या भारत बंदची माहिती दिली. ८ डिसेंबरला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भारत बंद पुकारण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम असेल. रुग्णवाहिका आणि लग्न समारंभासाठी रस्ते खुले असतील. सर्वच ठिकाणी शांततेत निदर्शने करण्यात येतील. चंदिगडमध्ये सेक्टर १७ च्या मैदानावर शेतकरी ७ तारखेला मोठे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी दिली.

विरोधक चिथावताहेत
कृषी कायद्यांविरोधात विरोधक शेतकर्‍यांना चिथावत असल्याचा आरोप केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी केला आहे. राजकीय लाभासाठी काम करणार्‍यांसाठी शेतकर्‍यांनी बळी पडू नये, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे. देशातील शेतकरी या कायद्यांच्या बाजूने असल्याचा दावाही यावेळी चौधरी यांनी केला.