उद्याच्या आयुष्याची पहाट उगवूया…!

0
256

– रश्मिता राजेंद्र सातोडकर

स्त्री तुझी अनोखी कथा

सांगू कशी जगास या
पंख नसलेल्या पाखरासारखी
हरवलीस तू जगात या…
आज आपण २१ व्या शतकात जरी वाटचाल करीत असलो तरी चुल, मुल आणि घर याच्यापलीकडे आजची स्त्री पोहोचलेली दिसत नाही. जी काही बंधने असतील ती फक्त स्त्रीवरच लादली जात आहेत. एखाद्या घरात जर मुलगी जन्माला आली तर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर भलतीच नाराजी दिसते. अनेक कुटुंबात लहान मुलींना सापत्नभावाची वागणूक दिली जाते. ‘आई-बाबा मला मारू नका, मी तुमचीच मुलगी आहे’, असे उद्गार हृदयाला पाझर फोडणारे स्त्रीपिंडाचेच असतात. विज्ञान-तंत्रज्ञानात आज आपण उत्तुंग प्रगती साधलेली आहे, पण विचार शैलीत मात्र बदल झालेला दिसत नाही. तेच बुरसटलेले निच दर्जाचे विचार आणि स्त्रीजीवन असह्य करणारी तीच संस्कृती मुळे घट्ट रोवून आहेत. देवाधितांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत स्त्रीला जरी महत्त्व असले तरी तिला मुक्तता मात्र मिळालेली नाही. ‘ज्याच्या पदरी पाप, त्याला मुली आपोआप’ हीच विकृती लोकांच्या मनात आजतागायत आहे.
स्त्रीभृणहत्या, बलात्कारासारखी निंदनीय कृत्ये भारतासारख्या प्रगतिशील देशात दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या वार्ता कानावर येतात तेव्हा आपल्या माता-भगिनी किती सुरक्षित आहेत याची कल्पना येते. आमच्या देशासारखा कडक कायदे असणारा देश जगात दुसरा नसेल; पण या कायद्यांचे पालन न होता त्यांची पायमल्ली जास्त होत आहे. बालमनावर वेगळी विचारसरणी लादली जाते. त्यांना दिलेल्या खेळण्यातूनच न्यूनगंडाची भावना निर्माण होते. मुलगा असला तर त्याला विमान, गाडी दिली जाते आणि मुलीला मात्र बाहुली! स्त्री ही व्यक्ती नव्हे ती एक खेळणी आहे याची जणू ही पहिली शिकवणच असते. अशा प्रकारच्या विचारसरणीत कुठे तरी बदल व्हायला हवा.
लहानपणी घरात सती-सावित्री, पार्वती, सीता यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. पार्वती ही पतिव्रता होती हे मनावर नेहमी बिंबवले जाते. पण तिचा कणखरपणा, तिची जिद्द आणि चिकाटी याची जाणीव मात्र कोणी करून देत नाही. खरं तर या जगाच्या रथाची स्त्री आणि पुरुष अशी दोन चाकं आहेत. ती व्यवस्थितपणे चालली पाहिजेत. ती जर कोलमडली तर काय होईल?? त्याची नुसती कल्पनाच न करता तशी परिस्थिती उद्भवण्याची आता वेळ आलेली आहे. जोपर्यंत १८ वर्षांची प्रत्येक तरुणी संध्याकाळच्या वेळेला एकटी बिंधास्तपणे गावात किंवा शहरात जात नाही किंवा तिला एकटीला मुक्तपणे फिरायला मिळत नाही तोपर्यंत स्त्रीशक्ती मुक्त झाली असे म्हणता येणार नाही. स्त्रीवर होणार्‍या सगळ्या अत्याचारांचे मुख्य कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. संपूर्ण मानवजातीचा विकास व्हायला हवा तर मुलींना शिक्षणाइतके परिणामकारक दुसरे साधन नाही. कुटुंबातील एक मुलगी शिकली तर ती सर्वांना शिकवेल. जोपर्यंत मुलगी शिकत नाही तोपर्यंत आपली प्रगती झाली असं म्हणता येणार नाही. आणि हो, समाजाने स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला तरच जग बदलू शकते. जेव्हा एखाद्या घरात मुलगा जन्माला येतो तेव्हा तो जन्माला येणारा मुलगादेखील एका स्त्रीच्याच उदरातून जन्माला येतो याचे भान समाजाला असणे गरजेचे आहे.
स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा मागे नाही. आज पुरुषांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे महिलांनी काबिज केलेली आहेत. तसं पाहता समाजातील स्वत:चे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरुषाप्रमाणे उक्ते मिळालेले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीच्या थोडक्यात प्रवासावर ओझरती नजर टाकल्यास त्यांच्या संघर्षमय यशस्वीतेची ओळख होते. १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायिक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिपिंक स्पर्धांमध्ये पुरुष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड, पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटिल या महिलेची निवड प्रतिभाताई पाटिल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब. खरंच स्त्रीशक्तीचा हा प्रवास प्रेरणादायी असा निश्‍चित आहे.
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबिज करत आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, मेरी कोम, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कतृत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल, याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बस कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रेसुद्धा महिलांनी काबिज केली आहेत. सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत. सध्या राष्ट्रीय राजकारणात महिलांची संख्या नगण्य आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहे. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे. विविध क्षेत्रात मुली ठामपणे पाय रोवून उभ्या असल्याचे चित्र आज आहे.
स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे. आधुनिक जगातील या व असंख्य हिरकणींनी आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षमय लढा देऊन चढला आहे. त्यांच्या संघर्षामुळेच कित्येक आयुष्य उभी राहिली आहेत. त्यांच्या या संघर्षातूनच त्यांच्या उद्याच्या आयुष्याची पहाट उगवणार आहे.
शेवटी तमाम स्त्री जातीला एवढंच सांगायचं आहे, हे शतक तुमचे आहे. संधी गमावू नका. पुढे या आणि तुमची सकारात्मकता, मौलिकता जगाला दाखवा. तुम्ही कुठेच कमी नाही आहात. तुमचं स्त्रीत्व दाखवून देण्याची हीच खरी संधी समजा. तुम्हांला आवड असणार्‍या क्षेत्रात उच्च स्थान पादाक्रांत करून ‘हम भी किसीसे कम नही है’ हे सार्‍या जगाला दाखवून द्या. पुरुषप्रधान संस्कृतीला हाणून पाडा आणि स्त्री – पुरुष समानतेचा एक नवा पाठ स्वत:ला सिद्ध करून जगाला पटवून द्या!
‘‘हमसे है जमाना सारा
हम जमाने से कम नही,
बेटी सबसे अच्छी जानलो
बात ये मानलो’’
…………