>> शिवतीर्थावर रंगला शपथविधी सोहळा
शिवाजी पार्क मुंबई येथील शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी बरोबर ६ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई-वडिलांचं स्मरण करून आणि संविधानला स्मरून त्यांनी शपथ घेतली. यावेळी उपस्थितांनी जल्लोष केला. महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या ३६ दिवसानंतर मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरे शपथविधीनंतर जनतेसमोर नतमस्तक झाले. उद्धव यांच्यानंतर शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीवर औक्षण करण्यात आले. त्यानंतर सौ. रश्मी ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले. उद्धव यांनी कपाळाला टिळा लावलेला होता आणि भगवा कुर्ता परिधान केला होता. या सोहळ्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, पीआरपीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते मनोहर जोशी, शिवसेना नेते संजय राऊत, सपा नेते अबु असीम आझमी, राजू शेट्टी यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व आमदार, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य आणि वारकरीही उपस्थित होते.
सहा कॅबिनेट मंत्री
शपथविधी सोहळ्यात उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, कॉंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
अजित पवारनी
टाळला शपथविधी
मी आज शपथ घेणार नाही. राष्ट्रवादीकडून छगन भुजभल व जयंत पाटील हेच शपथ घेतील असे सांगत अजित पवार यांनी कालचा शपथविधी टाळला. त्यामुळे अजित पवार अजून नाराज असल्याचे दिसून आले. नव्या सरकारात राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे हा त्यांचा आग्रह अद्यापही कायम आहे.