ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची अण्वस्त्रे असलेल्या किराना हिल्सवर क्षेपणास्त्रे डागली होती हे काही उपग्रह छायाचित्रांमधून सध्या समोर आले असल्याने पाकिस्तानने युद्धविरामासाठी धावपळ करण्यामागचे कारण उलगडले आहे असे म्हणायला हरकत नाही. भारताने केलेला हल्ला हा केवळ इशाऱ्यादाखल होता असे दिसते आणि समझनेवालेको इशारा काफी है म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तानला भारताच्या क्षमतेची कल्पना आल्यानेच तो झट्दिशी युद्धविरामास राजी झाला असे अनुमान त्यामुळे काढता येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पुन्हा युद्धविरामाचे श्रेय स्वतःकडे घेत आहेत. आपण भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांशी चांगला व्यापारी करार करण्याचे आश्वासन दिले आणि त्यामुळेच त्यांनी युद्ध थांबवले असे ते वारंवार सांगत राहिले आहेत. खरे म्हणजे ट्रम्प यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने केवळ पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम केल्याचे स्पष्ट केले आहे असे आपल्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. मात्र, आजही ट्रम्प यांचा तोच दावा दिसतो. नुकताच आपल्या त्या विधानाचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आणि भारत पाकिस्तानमधील त्या संघर्षावेळी पाच विमाने पाडली गेल्याचेही ते म्हणाले. ही पाच विमाने नेमकी कोणाची होती हे मात्र ट्रम्प यांनी सांगितलेले नाही. आपण राफेलसह भारताची सहा विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान सुरवातीला आमच्याकडून रणनीतीबाबत काही चुका झाल्या, ज्या नंतर दुरुस्त केल्या गेल्या असे सिंगापूरमध्ये शांग्रिला डायलॉग्सदरम्यान सांगितले होते. त्यामुळे ही पाडली गेलेली काही विमाने कदाचित भारताचीही असू शकतात असे जरी सूचित होत असले, तरी ऑपरेशन सिंदूरसंबंधी माहिती देताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अवधेशकुमार भारती यांनी भारताचे सर्व वैमानिक सुखरूप परत आल्याचे म्हटले होते. भारताने पाकिस्तानच्या किराना हिल्स ह्या अण्वस्त्र तळावर हल्ला चढवला होता का असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यांनी नकारार्थी उत्तरही दिले होते. किराना हिल्सवर अण्वस्त्रे आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद असेही ते मिश्कीलपणे उद्गारले होते. मात्र, आता उपलब्ध झालेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये किराना हिल्सवर हानी झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने भारताने पाकिस्तानला नमते घेण्यास भाग पाडण्यासाठी किराना हिल्सला लक्ष्य केले होते, मात्र, त्यातून त्या अणुप्रकल्पाची हानी होऊ नये व किरणोत्सर्ग होऊन जगाचे लक्ष वेधले जाऊ नये ह्याचीही दक्षता घेतली गेली होती असे मानायला वाव आहे. भारताची विमाने सहा व सात मेच्या ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या रात्री कदाचित पाडली गेलीही असतील, परंतु पाकिस्तानला जो धडा ऑपरेशन सिंदूरच्या वेळी शिकवला गेला तो ऐतिहासिक स्वरूपाचा होता हे मान्य करणे गरजेचे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान संघर्षात पाच विमाने पाडली गेली असे म्हटल्याने लगेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या दिसतात. सरकारने ह्याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करीत ते पुढे सरसावले आहेत. परंतु युद्धामध्ये उभयपक्षी हानी ही अपेक्षितच असते. केवळ प्रतिपक्षाचीच हानी होईल असे गृहित धरता येत नाहीच. त्यामुळे यदाकदाचित भारताची काही विमाने पहिल्या रात्री पाडली गेली असतील असे जरी एकवेळ मानले, तरी त्यामुळे ऑपरेशन सिंदूर कारवाईचे महत्त्व आणि त्या अचाट पराक्रमाची महत्ता तीळमात्रही कमी होत नाही. भारतीय सैन्यदले खरोखरच कौतुकास पात्र आहेत. पाकिस्तान जो युद्धविरामासाठी पुढे आला, तो ट्रम्प यांच्या व्यापार कराराच्या आश्वासनामुळे की भारताने दहशतवादी अड्ड्यांना आणि अकरा हवाई तळांना आणि त्यातही मुख्यत्वे किराना हिल्सला दणका दिल्याने असा प्रश्नही आता उपस्थित होतो. ज्या पाकिस्ताने अत्यंत आवेशात बुनयान उन मरसूस ही लष्करी मोहीम भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उत्तर म्हणून सुरू केली होती आणि अठ्ठेचाळीस तासांत भारताला नमविण्याची जी भाषा पाकिस्तान करीत होता, तो आवेश अवघ्या आठ तासांत कसा उतरला त्याचे स्मरण आपले लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मागे करून दिले होते. दहा मे रोजी सकाळी हे बुनयान उन मरसूस पाकिस्तानने सुरू केले आणि आठ तासांत संध्याकाळी भारतापुढे त्याने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला. भारताने तोवर आपण समोर ठेवलेली उद्दिष्ट्ये यथास्थित साध्य केली होती. त्यामुळे विनाकारण युद्ध आणखी लांबवण्यात काही हशील नव्हते. भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीर परत घेऊनच थांबायला हवे होते वगैरे म्हणणे हे म्हणायला फार सोपे असले, तरी प्रत्यक्षात उतरवणे एवढे सोपे नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना धाक बसवण्याचे उद्दिष्ट ऑपरेशन सिंदूरने पूर्ण केले आणि पाकिस्तानच्या युद्धविरामाच्या प्रस्तावास सहमती दर्शवली, तर ते गैर म्हणता येत नाही.