सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे येत्या २७ ऑगस्ट रोजी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कायदा मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी न्या. उदय लळीत घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रमणा यांनी लळीत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करावी, यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम १२४ अंतर्गत उपकलम २ नुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दि. २७ ऑगस्टपासून ते देशाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असतील, असे कायदा मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे.