– म. कृ. पाटील, साखळी
आपल्या देशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले राज्य म्हणजे राजस्थान. राजस्थान राज्याचे नंदनवन, पर्यटकांचा स्वर्ग, सरोवरे, तलावांची नगरी आणि पर्वतराजीने युक्त स्वर्गभूमी अशा विविध विशेषणांनी अलंकृत नगरी म्हणजे ‘उदयपूर’. एकेकाळी मेवाडची राजधानी असलेले हे शहर. ‘मेवाड’ हा शब्द उच्चारताच मनचक्षूंसमोर महाराणाप्रताप, त्यांचा अश्व चेतक आणि हळदीघाटीच्या रणसंग्रामाचे चित्र साकारते. ऐतिहासिक महान परंपरांची पार्श्वभूमी आणि प्राकृतिक सौंदर्याची किनार लाभलेल्या या शहरात १४ वे अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले. उदयपूर शहर स्वातंत्र्यानंतर राजस्थान राज्यातील प्रमुख शहर, पर्यटन केंद्र आणि जिल्ह्याचे स्थान बनले.महाराणा प्रताप वरिष्ठ नागरिक संघ उदयपूर, हेल्पेज इंडिया आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २० आणि २१ फेब्रुवारी २०१५ असा दोन दिवसांचा कालावधी होता. या अधिवेशनाकरिता महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, हरयाणा, गुजरात, दिल्ली, राजस्थानमधून आलेल्या ३००० प्रतिनिधीची उपस्थिती होती. गोव्यातून सर्वश्री एम. के. पाटील, राजाराम धावसकर, मनोहर कुंभारजुवेकर, कॅजिटन वाझ आणि रामनाथ देसाई अशा पाच सदस्यीय मंडळाने या अधिवेशनात उपस्थिती लावली.
१४ व्या अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी राजस्थान उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्ती न्यायाधीश सन्माननीय श्रीमान एन. के. जैन यांनी प्रतिपादन केले की, भारतीय दंड संहिता आणि पालक वरिष्ठ नागरिक संरक्षण आणि कल्याण कायदा – २००६ नुसार अपत्याकडून मातापित्यांना उदरनिर्वाहाकरिता पोटगी म्हणून दरमहा आर्थिक सहाय्य देण्याचे प्रावधान आणि तरतूद आहे. परंतु ज्यांना मुलेबाळे नाहीत, अपत्यहीन पालक आहेत, निराधार वरिष्ठ नागरिक आहेत, अशा ज्येष्ठ, श्रेष्ठ नागरिकांकरिता, त्यांच्या भरण-पोषण आणि मनोरंजनासंबंधी २००७ च्या पालक कल्याण अधिनियमात कोणतीही तरतूद अथवा प्रावधान, साधा उल्लेखही केलेला नाही. अशा वरिष्ठ नागरिकांनी कोणाकडे आणि कशाच्या आधारे भरण-पोषणा संबंधीची याचना करावी? अपत्यहीन, निःसंतान वरिष्ठ नागरिकांच्या मृत्यूपश्चात त्यांची स्थावर जंगम मालमत्ता, बँकेमध्ये-पोष्टामध्ये गुंतवणूक केली रक्कम, वारसदाराने कलमे केली नाहीत म्हणून बेवारस समजून सरकार आपल्या ताब्यात घेते. निराधार वरिष्ठ नागरिकांची सेवा सुश्रृषा आणि सांभाळ करण्याची नैतिक जबाबदारी सरकारची असायला हवी. मालमत्ता व आर्थिक गुंतवणूक सरकार, सरकारजमा करते. मात्र पालन-पोषण-मनोरंजन करत सांभाळ करण्याची जबाबदारी झिडकारते. निराधार वरिष्ठ नागरिकांची संख्या, एकूच वरिष्ठ नागरिकांच्या तुलनेत ३२% आहे. अशा वरिष्ठ नागरिक स्त्री-पुरुषांचा सांभाळ करण्याचे प्रावधान किंवा तरतूद २००७ च्या वरिष्ठ नागरिक कल्याण आणि संरक्षण अधिनियमात होणे गरजेचे आहे.
न्यायमूर्ती महोदयानी पुढे असेही प्रतिपादन केले की, वरिष्ठ नागरिकांना रेल्वे व बस प्रवास भाडे दरात २५ ते ५०% सवलत दिली जाते. बस प्रवास भाडे दरात संपूर्ण देशात एकवाक्यता नाही. प्रादेशिकतेला अतिमहत्त्व देत काही राज्यातील वरिष्ठ नागरिकांना ही सवलत नाकारली जाते. केंद्र शासन हा प्रश्न राज्य सरकारचा आहे, त्यांनी तसा निर्णय घ्यावा असे मानते. केंद्र आणि राज्य शासनात सुसंवादाचा अभाव दिसून येतो. बसभाडे प्रवासात सवलत द्यायची तर भारतभर समान सवलत मिळायला हवी. रेल्वे आणि बस भाडे दरात सवलत दिली म्हणजे वरिष्ठ नागरिकांच्या भरण-पोषणाचा प्रश्न सुटत नाही, तर त्याकरिता वरिष्ठांना मासिक भरण-पोषणासाठी अत्यावश्यक आर्थिक सहाय्याची तरतूद करणे गरजेचे आहे. २०१४-१५ च्या वार्षिक अंदाजपत्रकात वरिष्ठ नागरिकांना मिळणार्या सेवानिवृत्ती वेतनाची सूट आयकरातून मिळायला हवी. ज्येष्ठांना सल्ला देताना ते म्हणाले की, सेवानिवृत्त झाल्यावर आरामात फक्त घरात न बसता आपल्या प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग, सामाजिक आस्था आणि बांधिलकीच्या नात्यातून समाजहिताकरिता कार्य करण्याची जाज्ज्वल्य इच्छा आणि आंतरिक जाणीव असायला हवी. ‘मला काय त्याचे?’ अशा नाकारात्मक भावनांचा त्याग करून सकारात्मक इच्छाशक्तीने राष्ट्रप्रेम आणि बंधुभाव, तसेच नवयुवकांच्या आणि पिढीच्या शाश्वत विकासाकरिता त्यांचा राष्ट्राभिमान सजगतेने जागृत करण्याचे कार्यतत्पर असायला हवे. दोन पिढ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला वैचारिक व भावनिक दुरावा कमी करण्यासाठी ज्येष्ठांना स्वतः पुढाकार घेऊन नवयुवकाशी सुसंवाद साधत कौटुंबिक, सामाजिक आणि भावनिक नातेसंबंध दृढ करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी.
अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या १४ व्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महासंघाचे अध्यक्ष डी. एन. चाषकें, सचिव अनिल कासखेडीकर, हेल्पेज इंडियाचे निलेश नलवाया, पद्मश्री कैलास मानव, खासदार अर्जुन मीणा, मंत्रीमहोदय किरण माहेश्वरी, महाराजा राणाप्रताप वरिष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष भंवर शेट, मॅथ्यू चेरीयन, मांगीलाल आदी महनीय व्यक्ती विराजमान होत्या. राजस्थान शासनाच्या पी.एच.ई.डी. खात्याच्या मंत्री किरण माहेश्वरी यांनी वरिष्ठांच्या विविध समस्यांचे सूतोवाच करत या समस्या सरकार दरबारी मांडून-सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. मंत्रीमहोदयांनी असे प्रतिपादन ठामपणे केले की, वरिष्ठ नागरिक अनुभवाने, ज्ञानाने आणि कर्तृत्वाने समृद्ध आहेत. त्यांनी समाज आणि देशाकरिता दिलेले योगदान अनमोल आहे. म्हणूनच वरिष्ठ नागरिक दिशादर्शक दीपस्तंभ आणि समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या ज्ञानसंपन्न अनुभवाची आज समाजाला अत्यंत गरज आहे. ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या वरिष्ठांनी व नवयुवकांनी सभ्यता, संस्कृती, ऐतिहासिक व सामाजिक परंपरा जिवंत ठेवली आहे, असे ते म्हणाले.
दुपारच्या सत्रात ‘वरिष्ठ नागरिकांची राष्ट्रीय स्वास्थ्य नीती आणि कल्याण’ यावरील परिसंवादात आपले विचार मांडताना आर.एन.टी. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डी. पी. सिंह, डॉ. सगुण भाटिया, समाजसेवक रामा सिंग यांनी आपले विचार मांडले. दुसर्या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये पालक संरक्षण आणि कल्याण कायदा २००७ ची अंमलबजावणी कशी चालते या संदर्भांत विविध राज्यातील प्रतिनिधींनी राज्यनिहाय सविस्तर माहिती दिली. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने १२ करोड इतके ज्येष्ठ नागरीक आहेत. त्यापैकी ३७ टक्के ज्येष्ठ नागरिक मोलमजुरी आणि शेतीची कामे करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळत नाही. काही ज्येष्ठांना म्हणजे ९ टक्केंनाच राष्ट्रीय पेन्शन मिळते. ही आर्थिक मदत वेळेवर कधीच मिळत नाही. जितकी आर्थिक मदत मिळते, त्यामध्ये १० दिवसांचा खर्च सुद्धा भागत नाही. सर्व वक्त्यांनी गोवा राज्याचे गुणगान केले. गोव्यातील वृद्धजनांना मासिक रू.२०००/- पेन्शन मिळते आणि औषधोपचारासाठी रू. ५००/- अधिक मिळतात. देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना गोवा राज्य शासन ज्याप्रमाणे पेन्शन देते, तेवढी प्रत्येक राज्यातील ज्येष्ठांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आणि तसा ठरावही सातत्याने तीन वर्षे घेण्यात येत आहे.
दुपारच्या सत्रात संत कृष्णानंद, जे नारायण सेवा केंद्र उदयपूरला चालवतात, त्यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की मानव आपल्या वयाने श्रेष्ठ बनत नाही, तर आपल्या आचार, विचार आणि वर्तन यावर श्रेष्ठत्व अवलंबून असते. मानव सुखाच्या पाठीमागे धावतो आहे, परंतु त्याला हे ज्ञात नाही की, सुख देणे अथवा न देणे ईश्वरीय दान आहे. मानवाच्या हाती फक्त आलेल्या प्रत्येक क्षणात आनंद उपभोगणे आहे. ज्याकडे मानव दुर्लक्ष करून दुःखाला आमंत्रण देतो. दोन दिवसांच्या अधिवेशनाची सांगता खालील ठराव करून झाली- १) केंद्र आणि राज्यात वरिष्ठ नागरिक कल्याण स्वतंत्र मंत्रालय असावे. २) राष्ट्रीय वृद्ध नीतीमध्ये कालानुरूप बदल व्हावा ३) वरिष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा निर्मिती, ४) वरिष्ठ नागरिकांना औषधोपचार आणि सेवासुश्रूषा मोफत मिळावी, ५) राष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन करावी ६) आयकराची मर्यादा वाढवावी किंवा वरिष्ठ नागरिकांना आयकरातून सूट देण्यात यावी. उदयपूर येथील सुखाडिया विश्वविद्यालयाच्या सभागृहात हे अधिवेशन सुनियोजित पद्धतीने पार पडले.
उदयपूर-राजस्थान येथील १४ व्या अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या या दोन दिवशीय अधिवेशन आम्हा गोव्याच्या पाचही प्रतिनिधींना कायमची स्मरणात राहील अशी सुखद घटना घडून आली. कदाचित हा कपिलाषष्ठीचा सुयोग असावा असे आम्हाला वाटले. या अधिवेशनाला गोव्याहूनही वरिष्ठ नागरिक आले आहेत, याची माहिती संयोजकांकडून उदयपूरच्या जिल्हाधिकार्यांना समजली. तात्काळ जिल्हाधिकार्यांनी आमच्याशी संपर्क साधला. गोमन्तकीय भूमीपूत्र उदयपूर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत याची आम्हाला माहिती नव्हती.
दि. २२/२/२०१५ रोजी संध्याकाळी ६ वाजता आपली गाडी पाठवून त्यांनी आम्हाला आपल्या बंगल्यावर बोलावून घेतले. या उच्चपदस्थ भूमीपुत्राचे नाव आशुतोष आपा तेली आहे, हे त्यांच्या बंगल्यावर पोहोचल्यावर ज्ञात झाले. या उच्चपदस्थांशी ना आमचे नातेसंबंध, ना कार्यसंबंध. गोव्याहून आलेल्या व्यक्तींची म्हणून त्यांनी आपुलकीने, माया, ममता आणि प्रेमाने चौकशी केली. घरी गेल्यावर ज्येष्ठांप्रती असलेली आदरयुक्त स्नेहभावना, ऋजुता, निगर्वीपणा आणि भूमीपुत्रांविषयी असलेला जिव्हाळ्याचा उमाळा अनुभवायला मिळाला. सर्वांच्या अंतःकरणात माया, ममता, आपुलकीचा झरा झुळझुळ वाहू लागला. परिचयानंतर आणखीनच स्नेहसंबंध वृद्धींगत झाले. गोवा पोलीस प्रशासनात सरळमार्गी, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त अधिकारी श्रीमान आपा तेली यांचा हा सुपुत्र. आपल्या मातीशी असलेले नाते, सामाजिक बांधिलकीची जाण आणि भान असलेल्या या उत्साही, प्रामाणिक व्यक्तीशी आम्ही मनमोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या. उदयपूर येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी चालकासह संपूर्ण दिवस बोलेरो गाडी त्यांनी दिमतीला दिली. ही सेवासुश्रृषा करण्याची आगळी-वेगळी पद्धत पाहून आमचे अंतःकरण भरून आले. हे सर्व आपल्या वडिलांची पुण्याई आणि आशीर्वादाने मी करतो आहे, असे त्यांनी सांगितले आणि आम्ही सद्गदित झालो.