उत्तर भारतात पावसामुळे आतापर्यंत 574 बळी

0
19

>> 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा

>> हिमाचलप्रदेशमध्ये 10 हजार पर्यटक अडकले

देशाच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठे नुकसान झाले आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बेपत्ता आहेत. तर 497 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे 8644 गुरेही दगावली आहेत. 8815 घरांचे नुकसान झाले आहे, तर 47,225 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये 95 मृत्यू
हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. पर्वतीय राज्यातील 12 जिल्हे पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले आहेत. हिमाचल प्रदेशात पावसामुळे आतापर्यंत एकूण 95 जणांचा मृत्यू झाला असून 2 लोक बेपत्ता आहेत, तर 99 जण जखमी आहेत. 76 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

पंजाब-हरियाणात 15 मृत्यू
पंजाब आणि हरियाणातील अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांतील एकूण मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. पंजाबमध्ये आठ, तर हरियाणामध्ये सात जणांचा मृत्यू झाला.

यमुना नदीच्या पातळीत वाढ
दिल्लीत यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता जुन्या रेल्वे पुलावर नदीच्या पाण्याची पातळी 207.25 मीटर नोंदवण्यात आली असून सर्वोच्च पूर पातळी 207.49 मीटरच्या जवळ आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक भागात घरांमध्ये पाणी तुंबले आहे.

पर्यटक अडकले
हिमाचल प्रदेशातील पावसामुळे 10,000 हून अधिक पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. दुर्गम भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने 6 हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. पूरग्रस्त भागात मोबाइल नेटवर्क पूर्ववत होताच अडकलेल्यांची संख्याही वाढत आहे. चंद्रतालच्या 25 किमी पर्यंत जिथे नवीन बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला चंद्रतालपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. चंद्रतालमध्ये तीन फुटांपेक्षा जास्त बर्फ पडला आहे. सायंकाळचे तापमान उणे 40 अंशांपर्यंत घसरत आहे. त्यामुळे चंद्रतालपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे.