उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम

0
4

गोवा, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर भारतात अद्याप उष्णतेची लाट कायम आहे. हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात या 6 राज्यांमध्ये 35 ठिकाणी तापमान 42 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे 45.2 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठरले. पुढील 4 दिवस उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या काही ठिकाणी उष्णतेची लाट अशीच राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये येत्या पाच दिवसांत तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होऊ शकते.
मान्सूनने शनिवारी (8 जून) छत्तीसगड आणि ओडिशामध्ये प्रवेश केला. राजस्थानच्या बाडमेर, जैसलमेर, चित्तोडगड आणि उदयपूरमध्ये जोरदार पाऊस झाला. जैसलमेरच्या रामगडमध्येही गारा पडल्या.

गुजरातमध्ये पावसाची शक्यता

हवामान खात्याने सांगितले की, 11 आणि 12 जून रोजी गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहील. गुजरातमध्ये मान्सूनची निश्चित तारीख 15 जून आहे. मात्र तो वेळेपूर्वी गुजरातमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.15 जूनपर्यंत मान्सून मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो. मान्सून 2 जूनला कर्नाटकात तर 6 जूनला महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

गोवा, महाराष्ट्रात मुसळधार
पावसाची शक्यता

केरळ, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथे काही ठिकाणी हलका ते मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे काल राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, रस्ते पाण्याखाली जाणे, घरांत पाणी शिरणे, कुंपणे मोडून पडणे आदी घटना विविध ठिकाणी घडल्या. समुद्र खवळलेला राहणार असल्याने समुद्रात पोहण्यासाठी न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असताना समुद्रात उतरलेल्या दोघा पर्यटकांना बुडताना जीवरक्षकांनी वाचवण्याच्या घटना कोलवा व बागा किनाऱ्यांजवळ समुद्रात घडल्या. कोलवा येथे जीवरक्षकांनी लखनौ येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या नेन्सी वर्मा (24) या युवतीला समुद्रात बुडताना वाचवले. तर बागा येथे समुद्रात बुडताना जीवरक्षकांनी हुबळी येथील सिध्दार्थ कमडोली ह्या 24 वर्षीय युवकाला वाचवले. जोरदार पावसामुळे सांगोल्डा येथे एका घराचे कुंपण मोडून चोगम रस्त्यावर पडल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. तसेच तेथील काही घरांत पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली.