उत्तर प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीखाली कागदात गुंडाळलेले स्फोटक द्रव्य आढळून आल्याने खळबळ माजली असून हा घातपाताचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा काल विधानसभेत केली. विधानसभेची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.
कागदात गुंडाळलेले ही पांढरी पावडर पेंटारिथ्रीटोल टेट्रानायट्रेट (पीईटीएन) नामक ज्वालाग्राही स्फोटकाची असल्याचे आढळून आले आहे असेही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी विधानसभेत जाहीर केले. विरोधी पक्षनेते राम कोबिंद चौधरी यांच्या खुर्चीखाली ही सुमारे दीडशे ग्रॅम पावडर ठेवण्यात आली होती.
विधानसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे यामुळे स्पष्ट झाल्याचे सांगत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सभापतींनी सुरक्षाविषयक नवे निर्देश जारी केले आहेत.
हे घातक स्फोटक श्वानपथकही हुडकून काढू शकत नाही. केवळ प्रत्यक्ष तपासणीतच ते आढळू शकते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधानसभेच्या कर्मचार्यांची पार्श्वभूमीही तपासण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.