यूपीत इंडिया आघाडीचा करिश्मा, पंजाबमध्ये भाजपला शून्य जागा, बिहारात रालोआला 29 जागा
हरयाणात भाजपची पिछेहाट, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून विजयी, अमेठीतून स्मृती इराणी पराभूत
खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंग विजयी, ओडिशात भाजपची जोरदार मुसंडी
उत्तर प्रदेश
भाजपचा 33 जागांवर विजय
भारतीय जनता पक्षाचे भरवशाचे राज्य मानल्या जाणाऱ्या व लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशने ह्या निवडणुकीत धक्कादायक निकाल दिले. समाजवादी पक्ष व काँग्रेस यांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशमध्ये मोठे यश मिळवल्याचे कालच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातून साठहून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपला 33 जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाने 2 जागांवर विजय मिळविला.
सर्व मतदानोत्तर पाहण्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा मिळतील असे भाकीत केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीला पुन्हा उभे होते. मात्र, सकाळच्या फेरीत काही काळ मोदी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पिछाडीवर असल्याचे दिसून आले. मात्र, त्यांनी नंतर विजयी आघाडी घेतली.
अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येते, त्या फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार अवदेशी प्रसाद यांनी भाजप उमेदवार लालू सिंग यांचा 50 हजारांच्या वर मतांनी पराभव केला.
अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे दोन्ही पारंपरिक मतदारसंघ काँग्रेस पक्षाने ह्यावेळी पुन्हा जिंकून घेतले. रायबरेलीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी विजयी झाले, तर अमेठीमध्ये यापूर्वी रायबरेलीतून दोनवेळा निवडणूक लढवून पराभव पत्करणाऱ्या किशोरीलाल यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पराभवाची धूळ चारली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 76 जागांवर विजय संपादित केला होता. मात्र, ह्यावेळी भाजपला उत्तर प्रदेशात दारूण अपयशाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय लोकदलासमवेत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये यावेळची निवडणूक लढवली.
पंजाब
पंजाबमधील लोकसभेच्या 13 जागांपैकी सातवर काँग्रेस, तर 3 वर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले. शिरोमणी अकाली दल एका जागेवर, तर दोन अपक्षांनी बाजी मारली. खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंग हा तुरुंगातून निवडणूक लढवून निवडून आला आहे.
काँग्रेसचे उमेदवार अमृतसर, जालंधर, फतेहगढसाहिब, गुरदासपूर, पतियाळा, फिरोजपूर आणि लुधियानातून विजयी झाले, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाने होशियारपूर, संगरूर व आनंदपूरसाहिबमध्ये विजयी झाले.
काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी भाजपच्या सुशील रिंकू यांच्यावर जालंधर राखीव मतदारसंघात एक लाख 75 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. माजी उपमुख्यमंत्री काँग्रेसचे सुखजिंदर रंधावा हे गुरदासपूरमध्ये आघाडीवर होते. शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री हरसिम्रतकौर बादल बठिंडामध्ये 49656 मतांच्या आघाडीने विजयी झाल्या.
खलिस्तानी नेता अमृतपालसिंग हा खदूरसाहिब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुलबीरसिंग झिरा यांना 76 हजार मतांनी पराभूत करून निवडून आला. ‘वारिस पंजाब दी’ ह्या वादग्रस्त संघटनेचा हा नेता सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात आहे.
सरबजितसिंग खालसा ह्याने अपक्ष म्हणून फरिदकोटमधून निवडणूक लढवली व तोही निवडून आला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधई यांची हत्या करणाऱ्या दोन हल्लेखोरांपैकी एकाचा तो मुलगा आहे.
दिल्ली भाजपचीच; सर्व जागांवर विजय
चांदनी चौकमधून भाजपचे प्रवीण खंडेलवाल हे 5 लाख 16 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जयप्रकाश अगरवाल यांचा पराभव केला.
पूर्व दिल्लीमधून भाजपचे हर्ष मल्होत्रा यांनी 6 लाख 64 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी आपच्या कुलदीप कुमार यांना पराभूत केले.
नवी दिल्ली मतदारसंघातून माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज या विजयी झाल्या. त्यांनी 78 हजारांच्या मताधिक्क्याने आपच्या सोमनाथ भारती यांचा पराभव केला.
उत्तर पूर्व दिल्लीमधून भाजपचे मनोज तिवारी हे 1 लाख 38 हजारांच्या मताधिक्क्याने जिंकले. त्यांनी काँग्रेसच्या कन्हैया कुमार यांचा पराभव केला.
उत्तर पश्चिम दिल्लीमधून भाजपचे योगेंदर चंडोलिया हे 2 लाख 90 हजारांच्या मताधिक्क्याने जिंकले. त्यांनी काँग्रेसच्या उदित राज यांचा पराभव केला.
दक्षिण दिल्लीमधून भाजपचे रामवीर सिंग बिधुडी हे 6 लाख 92 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी आपच्या साही राम यांना पराभूत केले.
पश्चिम दिल्लीमधून भाजपच्या कमलजीत सेहरावत ह्या 8 लाख 42 हजार मतांनी विजयी झाल्या. त्यांनी आपच्या महाबळ मिश्रा यांचा पराभव केला.
ओडिशा
केंद्रीय मंत्री व भाजप नेते धर्मेंद्र प्रधान संबळपूरमधून 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले.
ओडिशातील लोकसभेच्या 21 जागांपैकी 19 जागांवर भाजपने जिंकत विरोधकांना भुईसपाट केले. एक जागा बीजू जनता दलाकडे व एक जागा काँग्रेसकडे गेली. केंद्रीय मंत्री व भाजप नेते धर्मेंद्र प्रधान संबळपूरमधून 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पुरी लोकसभा मतदारसंघात आपले प्रतिस्पर्धी अरूप पटनाईक (बीजेडी) यांच्यावर 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी बाजी मारली. भुवनेश्वरमध्ये भाजप उमेदवार अपराजित सारंगी यांनी बीजेडीच्या मन्मथ राऊतराय यांचा पराभव केला. केंद्रपाडा, बेरहमपूर, अक्सा, जगतसिंगपूर, कटक, धेनकनल, भद्रक, बालासोर, मयुरभंज, केंजहार, सुंदरगढ, बारगढ, बोलनगीर, नबरंगपूर आणि कालाहांडी लोकसभा मतदारसंघांत भाजप उमेदवार विजयी झाले. काँग्रेस उमेदवार सप्तगिरी यांनी उलका कोरापूटमध्ये विजय मिळवला.
जम्मू व काश्मीर
उमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती पराभूत
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या लोकसभा निवडणुकीत नवख्या उमेदवारांकडून पराभूत झाल्या आहेत. येथे भाजपने दोन जागा जिंकल्या. मेहबुबा मुफ्ती यांना गुज्जर नेते व नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मियाँ अल्ताफ अहमद यांनी अनंतनाग – राजौरीमध्ये धूळ चारली, तर उमर अब्दुल्ला यांना माजी आमदार शेख अब्दुल राशीद ऊर्फ इंजिनिअर राशीद याने बारामुल्लातून पराभूत केले. राशीदवर दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य केल्याचा आरोप असून तो तुरुंगात आहे. पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद गनी लोन हेही बारामुल्लामध्ये पराभूत झाले. श्रीनगर लोकसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आगा रूहुल्ला मेहदी यांनी वाहीद पारा ह्या पीडीपीच्या युवा नेत्यास पराभूत केले.
हरयाणा
हरियाणामध्ये काँग्रेस व भाजपने प्रत्येकी 5 जागा जिंकल्या. हरियाणात लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत. अंबाला, हिसार, रोहतक, सिरसा आणि सोनपतमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले, तर भाजप उमेदवारांनी भिवानी – महेंद्रगढ, फरिदाबाद, गुरगाव, कर्नाल व कुरूक्षेत्रमध्ये विजयी झेंडा फडकवला. काँग्रेसच्या नेत्या कुमारी सेलजा यांनी भाजपचे अशोक तंवर यांच्यावर सिरसामध्ये 268497 मतांनी विजय मिळवला. रोहतकमध्ये काँग्रेस नेते दीपेंदर हुडा विद्यमान खासदार अरविंद शर्मा यांच्यापेक्षा तीन लाख 42 हजार मतांनी पुढे होते. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री राव इंद्रजितसिंग यांनी गुरुग्राममध्ये काँग्रेसचे नेते व अभिनेते राज बब्बर यांच्यावर 73 हजार मतांची आघाडी मिळवली. कर्नालमध्ये माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आघाडीवर होते. केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर यांनीही फरिदाबादमध्ये आघाडी घेतली. कुरूक्षेत्रमध्ये भाजपचे उमेदवार उद्योगपती नवीन जिंदाल यांनी आपचे नेते सुशील गुप्ता यांच्यावर 20 हजार मतांची निसटती आघाडी मिळवली होती.
भाजप व काँग्रेसला प्रत्येकी 5
बिहार
बिहारात रालोआचे वर्चस्व!
आरामध्ये केंद्रीय मंत्री आर. के. सिंग पराभूत
बिहारमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभेच्या चाळीसपैकी 29 जागांवर आघाडी मिळवल्याचे कालच्या निकालांत स्पष्ट झाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाचे उमेदवार त्यांनी लढवलेल्या सोळापैकी 12 जागांवर आघाडीवर होते. भाजपने बिहारमध्ये जेडीयूसमवेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे 17 जागा लढवल्या होत्या, त्यांपैकी 12 जागांवर भाजपने आघाडी मिळवली होती. लोकजनशक्ती पक्ष (रामविलास पास्वान) ह्या मित्रपक्षाचे उमेदवार सर्व पाचही जागांवर आघाडीवर होते. हाजीपूरमध्ये त्या पक्षाचे अध्यक्ष चिराग पास्वान यांनी मोठी आघाडी मिळवली होती.
गेल्या निवडणुकीत सफाया झालेल्या राष्ट्रीय जनता दलाने ह्या लोकसभा निवडणुकीत आपण लढवलेल्या 23 जागांपैकी पाच जागांवर आघाडी मिळवून पुनरागमन केले. पाटलीपूत्रमधून लालूप्रसाद यादजव यांची ज्येष्ठ कन्या मिसा भारती 70 हजार मतांनी आघाडीवर होत्या, तर त्यांची छोटी बहीण रोहिणी आचार्य सारनमधून पराभूत झाल्या.
सीपीआय (एमएल) ने तीन जागा लढवल्या व त्यापैकी आरा व कराकत ह्या दोन जागांवर त्यांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. आरामध्ये केंद्रीय मंत्री आर के सिंग हे पराभूत झाले. सासाराम ह्या राखीव मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली, परंतु पाच वर्षांपूर्वी जिंकलेल्या किशनगंज ह्या एकमेव लोकसभा मतदारसंघात मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बिहारचे माजी मुख्यमंत्री व हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनी गयामध्ये चौसष्ट हजार मतांची आघाडी घेतली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बेगुसरायची एकच जागा लढवली व तेथे केंद्रीय मंत्री गिरीराजसिंग व पक्षाच्या उमेदवारात तुल्यबळ लढत झाली.
राजस्थान
राजस्थानात भाजपला फटका
तब्बल 11 जागा गमावण्याची पाळी
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी काँग्रेसने नऊ जागांवर विजय मिळविला.
भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्ये राजस्थानमध्ये यावेळी घट झाली. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थानात भाजपने 25 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या, परंतु यावेळी पक्षाच्या 11 जागा कमी झाल्या. काँग्रेसने नऊ जागांवर विजय मिळविला. राजस्थानमध्ये इंडिया आघाडीचा घटक असलेले माकप व काँग्रेस समर्थित आरएलपी आणि बीएपी यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, काल काँग्रेस पक्षाने दौसा, करौली धोलपूर, टोंक सवाईमाधोपूर, भरतपूर, गंगानगर, चुरू, झुनझुनू आणि बारमेरमध्ये बाजी मारली. दौसामध्ये काँग्रेस उमेदवार मुरारीलाल मीणा यांनी 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला. भाजपने बिकानेर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, अजमेर, पाली, जोधपूर, झालोर, उदयपूर, चित्तोडगड, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि झालावर बारन ह्या मतदारसंघांत विजय प्राप्त केला.
झारखंड
झारखंडमध्ये भाजपला 8 जागा
झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाने आठ, तर मित्रपक्ष एजेएसयूने एक जागा जिंकून एकूण नऊ जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पदरात टाकल्या. काँग्रेसने दोन जागांवर तर झारखंड मुक्ती मोर्चाला तीन जागा मिळाल्या.
केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार अर्जुन मुंडा यांचा खुंटी मतदारसंघात काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी 1 लाख 49 हजार मतांनी पराभव केला. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांची पत्नी गीता कोरा यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा झारखंड मुक्ती मोर्चाच्या जोबा मांझी यांनी 1 लाख 68 हजार मतांनी पराभव केला. भाजप खासदार निशिकांत दुबे हे गोड्डामध्ये विजयी झाले. केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोडेर्मामध्ेय सीपीआय (एमएल) च्या विनोदकुमार सिंग यांचा दारुण पराभव केला. नऊ विद्यमान खासदार व बारा आमदार ह्या निवडणुकीत उभे होते.
2019 च्या निवडणुकीत झारखंडच्या एकूण 14 जागांपैकी भाजपने 11, तर एजेएसयू, काँग्रेस व झारखंड मुक्तीमोर्चाने प्रत्येकी एक जागा जिंकली होती.
उत्तराखंड
भाजपला 5 पैकी 5 जागा
उत्तराखंडमधील लोकसभेच्या सर्वच्या सर्व पाचही जागांवर प्रचंड मतांनी विजय मिळविला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी नैनिताल उधमसिंगनगर मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारावर तीन लाख चौतीस हजार मतांची विजय मिळविला. भाजपचे अजय टामटा, अनिल बालुनी, माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, महाराणी मालाराज्यलक्ष्मी शाह यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला. मागील दोन्ही निवडणुकांत उत्तराखंडमधील सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या.
हिमाचल प्रदेश
हिमाचल भाजपमय
हिमाचल प्रदेशमधील सर्व चारही जागांवर भाजपने बाजी मारली. मंडी मतदारसंघातून अभिनेत्री व भाजप उमेदवार कंगना रनौत यांनी 74755 मतांनी विजय मिळविला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूरमधून पाचव्यांदा निवडून आले. त्यांना 1 लाख 82 हजार मतांची आघाडी मिळाली. कांगडामधून काँग्रेस उमेदवार आनंद शर्मा हे अडीच लाख मतांनी पराभूत झाले. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने चार जागांवर विजय मिळविला. सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.