उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीसंबंधीच्या बंदोबस्ताचे काम पाहण्यासाठी गोव्यातून गेलेल्या आयआरबी जवानांना परत गोव्यात आणण्यासाठी गेलेल्या कदंब बसगाड्यातून राज्यात परतण्यास सुमारे १०० जवानांनी नकार दिला आहे. त्यांनी आपणाला स्वखर्चाने विमान अथवा रेल्वेगाडीने परतण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पोलीस खात्याकडे केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी गेलेल्या ४१३ आयआरबी पोलीस कर्मचार्यांनी अद्याप टपाल मतदान न केल्याचे समोर आल्यानंतर राज्य पोलीस खात्याने या ४१३ कर्मचार्यांना राज्यात आणून त्यांच्या बदली गोव्यातून दुसरी तुकडी उत्तर प्रदेशला पाठवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च रोजी कदंबच्या दहा बसमधून या तुकडीला उत्तर प्रदेशात पाठवण्यात आले होते.
या १० बसमधून मतदान न केलेल्यांना गोव्यात आणण्याचे नियोजन राज्य सरकारने केले होते. पण उत्तर प्रदेश ते गोवा हे अंतर २ हजार कि. मी. एवढे असल्याने सुमारे १०० शिपयांनी एवढ्या दुरून बसने येण्यास नकार दर्शविला आहे. त्यांनी स्वखर्चाने गोव्यात परतण्याची तयारी दाखवल्यानंतर खात्याने परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर २० ते २५ जण यापूर्वीच विमानाने गोव्यात दाखल झाले. तर ७५ जण रेल्वेने येत असून ते काल रविवारी संध्याकाळपर्यंत गोव्यात पोचले. तर इतर शिपाई बसमधून येत असून ते ९ मार्चपर्यंत गोव्यात पोचणार आहेत.