उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता शिगेला पोचला असून मुख्यमंत्री अखिलेश यादव व सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांच्या गटा दरम्यानच्या कुरघोडी सुरूच आहेत.
सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांना निलंबित करून २४ तास उलटण्याआधीच मुलायमसिंह यांनी त्यांची हकालपट्टी केली.
अखिलेश गटाने काल घेतलेले राष्ट्रीय अधिवेशन घटनाविरोधी असल्याचे सांगून मुलायम सिंह यांनी रामगोपाल यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक नजीक असून उमेदवार निवडीवरून सपात वादंग निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या वादंगाने उग्र रूप धारन केले आहे. यातच काल अखिलेश गटाने पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले. या अधिवेशनात अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना या पदावरून हटविण्यात आले. तर अमरसिंह यांची पक्षातून उचलबांगडी करण्यात आली.