उत्तर गोव्यासाठी भाजपकडून चार नावे

0
7

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती

>> भाजपच्या राज्य निवडणूक समितीची बैठक

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उत्तर गोवा मतदारसंघासाठी चारजणांची नावे काल निश्चित केली. ही नावे आता पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यानी दिली. मात्र, उत्तर गोवा मतदारसंघासाठी ज्या चारजणांची नावे वेचून काढण्यात आलेली आहेत ती नावे सांगण्यास मात्र त्यानी नकार दिला.

भाजपच्या उत्तर गोवा राज्य निवडणूक समितीची बैठक काल पणजीत संपन्न झाली. पक्षाचे गोव्यासाठीचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
बैठकीत उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी चार उमेदवारांची नावे निवडण्यात आली आहेत. ही नावे पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. ह्या चार उमेदवारांकडून एका उमेदवाराची निवडणूक लढवण्यासाठी निवड करण्यात येणार
आहे.

सध्या श्रीपाद नाईक हे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते केंद्रीय मंत्री आहेत. नाईक हे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून 2004 सालापासून सलग चारवेळा निवडून आलेले आहेत.
दरम्यान, अनधिकृतरित्या मिळालेल्या माहितीनुसार श्रीपाद नाईक यांच्यासह माजी आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार दिलीप परुळेकर व अन्य एक माजी आमदार दयानंद मांद्रेकर अशी चारजणांची नावे काढण्यात आली आहेत.

या बैठकीला पक्षाचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, खासदार श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, दामू नाईक, दिगंबर कामत, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर, संजीव देसाई, गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते.

‘इंडिया’चे गोव्यातील उमेदवार मार्चच्या आरंभी जाहीर ः खलप

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीच्या गोव्यातील उमेदवारांची नावे मार्च महिन्याच्या आरंभी जाहीर होण्याची शक्यता काल ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री व इंडिया आघाडीचे उत्तर गोव्यातील एक संभाव्य उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली.
आमच्या प्रतिनिधीने काल त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ‘इंडिया’ आघाडीच्या गोव्यातील उमेदवारांची नावे 1 मार्च ते 3 मार्चपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. या निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी व भाजप नेतृत्वाखालील एनडीए ह्या दोघांमध्येच खरी लढत होणार असल्याने गोव्यात अन्य पक्षांना तसे मोठे स्थान नसल्याचे ते म्हणाले.सगळे विरोधी पक्ष आता एकत्र आले असल्याने एनडीएला आता विरोधकांनी दुर्बळ समजता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.