उत्तर गोव्यातील 105 कुविख्यात गुन्हेगारांची पोलिसांकडून चौकशी

0
2

पर्यटन मोसमात सुव्यवस्था राखण्यासाठी पावले

उत्तर गोव्यात वाढत्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने पाऊल उचलले आहे. उत्तर गोव्यातील सुमारे 105 कुविख्यात गुन्हेगाराची चौकशी करून त्यांना ताकीद देण्यात आली. पोलिसांनी त्या कुविख्यात गुन्हेगारांच्या कारवायांवर पाळत ठेवण्याचे काम सुरू केले आहे.
राज्यातील पर्यटन मोसमात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने विविध पद्धतीने प्रयत्न चालविले आहे. पोलिसांनी यापूर्वी उत्तर गोव्यातील 100 उपद्रवी व्यक्तींवर कारवाई केलेली आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्यांचे साहाय्य घेतले जात आहे.
उत्तर गोव्यातील पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठ दिवसांत 105 सराईत गुन्हेगारांची (‘हिस्ट्री शिटर्स) चौकशी करून त्यांना ताकीद देण्यात आली आहे.

अट्टल गुन्हेगारांना तडिपार करणार
पोलिसांना रात्रीच्या वेळेस या ‘हिस्ट्री शिटर्स’च्या घरी भेट देत तपासकाम करण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्व पोलीस स्थानकांना नवीन सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील अट्टल गुन्हेगारांना तडिपार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला असून, गरज भासल्यास या पर्यायाचाही अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

जुने गोव्यात 17 जणांची चौकशी
ओल्ड गोवा पोलिसांनी सर्वाधिक 17 सराईत गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना ताकीद दिली आहे. पणजी पोलिसांनी 8, म्हापसा पोलिसांनी 15, हणजूण पोलिसांनी 2, कोलवाळ पोलिसांनी 5, पर्वरी पोलिसांनी 7, कळंगुट पोलिसांनी 15, साळगाव पोलिसांनी 5, पेडणे पोलिसांनी 6, मोपा विमानतळ पोलिसांनी 3, मांद्रे पोलिसांनी 3, डिचोली पोलिसांनी 7 आणि वाळपई पोलिसांनी 12 सराईत गुन्हेगाराची चौकशी करून त्यांना ताकीद दिली आहे.