उत्तर गोव्यातील भाजपचा उमेदवार निश्चित

0
43

>> उमेदवाराच्या नावाची घोषणा केंद्रीय निवडणूक समितीकडून होणार

>> दिल्लीहून परतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> दक्षिण गोव्यातील उमेदवारांच्या नावांवर अजूनही विचारविनिमय

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या नावावर दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून, उमेदवाराच्या नावाची घोषणा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी कोणाला हे अद्याप निश्चित झालेले नसून, उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या निवडीसाठी गुरुवारी नवी दिल्ली येथे गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे काल रात्री गोव्यात आगमन झाले.
केंद्रीय निवडणूक समितीच्या नवी दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या बैठकीत उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे; मात्र आपण त्या नावाची घोषणा करू शकत नाही. केंद्रीय निवडणूक समितीकडून नावाची घोषणा केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईकांना उमेदवारी?
उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार म्हणून पुन्हा एकदा विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

उत्तर गोवा मतदारसंघासाठी श्रीपाद नाईक यांच्याबरोबरच माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे यांची नावेही पाठविली आहेत. उत्तर गोवा मतदारसंघातून श्रीपाद नाईक हे आत्तापर्यंत सलग पाच वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची दावेदारी भक्कम आहे.

दक्षिणेतील उमेदवारीचा तिढा कायम
भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू असून, उमेदवारांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवारीचा तिढा कायम आहे.

दक्षिण गोवा मतदारसंघासाठी माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. दक्षिणेतील उमेदवारीसाठी हे दोन प्रमुख दावेदार आहेत. या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
दक्षिण गोव्यासाठी मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक, सभापती रमेश तवडकर यांची नावे पाठविली आहेत.

भाजपकडून दक्षिण गोव्यासाठी विजयाची क्षमता असलेल्या उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दक्षिण गोवा मतदारसंघ सध्या कॉँग्रेस पक्षाकडे आहे.केंद्रीय नेतृत्वाकडून दक्षिण गोव्यावर वर्चस्वासाठी खास रणनीती आखली जात आहे.

नरेंद्र मोदी, शहांच्या उपस्थितीत पहाटे 3.30 वाजेपर्यंत नावांवर खल

लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्च महिन्यात जाहीर होऊ शकतात. त्यामुळे भाजप व काँग्रेससह सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास सुरू झालेली बैठक शुक्रवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत तब्बल साडेचार तास चालली. यामध्ये काही प्रमुख जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत विविध राज्यांतील लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात 150 उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित हेते.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने गोवा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आसाम, झारखंड, तामिळनाडू, ओडिशा, मणिपूर, दिल्ली, जम्मू-काश्मीर, पुद्दुचेरी आणि अंदमानच्या जागांवर चर्चा केली. मात्र ईशान्येकडील राज्याच्या जागांवर चर्चा झाली नाही. एकूण 14 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभेच्या जागांवर मंथन झाले.
भाजपकडून जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत पक्षातील दिग्गज नेत्यांचा समावेश असू शकतो. त्यात बहुतांश केंद्रीय मंत्र्यांची नावे असू शकतात. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दिसू शकतात. लखनऊमधून राजनाथ सिंह, गांधीनगरमधून अमित शहा, ग्वाल्हेरमधून ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.