उत्तरेत श्रीपाद, दक्षिणेत विरियातो

0
22

उत्तर गोवा
श्रीपाद नाईक (भाजप) ः 2,53,812
रमाकांत खलप (काँग्रेस) ः 1,40,191
तुकाराम ऊर्फ मनोज परब (आरजीपी) ः 45,460
मीलन वायंगणकर (बहुजन समाज पक्ष) ः 1600
सखाराम नाईक (भारतीय परिवार पक्ष)ः 1404
शकील शेख (अपक्ष)ः 800
थॉमस फर्नांडिस (अपक्ष) ः 746
विशाल नाईक (अपक्ष) ः 744
नोटा ः 6297

दक्षिण गोवा
विरियातो फर्नांडिस (काँग्रेस) ः 2,17,836
सौ. पल्लवी धेंपो (भाजप) ः 2,04,301
रुबर्ट परेरा (आरजीपी) ः 18,885
डॉ. श्वेता गावकर (बहुजन पक्ष) ः 1581
दीपकुमार मापारी (अपक्ष) ः 1317
डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष) ः 720
आलेक्सी फर्नांडिस (अपक्ष) ः 542
हरिश्चंद नाईक (भष्टाचार निर्मूलन पक्ष) ः 501
नोटा ः 4837

लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या मतमोजणीत गोव्यातील दोन जागांपैकी उत्तर गोव्यातून भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवताना काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांचा 1 लाख 13 हजार मतांनी दणदणीत पराभव केला, तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भाजप उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांच्यावर 13 हजार 535 मतांनी विजय मिळवला.

श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा मतदारसंघात सलग सहाव्यांदा विजयी मिळवून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. त्यांना 2 लाख 53 हजार 812 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रमाकांत खलप यांना 1 लाख 40 हजार 191 मते मिळाली.
दक्षिण गोवा मतदारसंघ राखण्यात काँग्रेस पक्षाला यश आले असून काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस 13 हजार 535 मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांना 2 लाख 17 हजार 836 मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांना 2 लाख 4 हजार 301 मते मिळाली.
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी माजी खासदार एदुआर्द फालेरो यांचा सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम मोडला आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातून एदुआर्द फालेरो हे सलग पाचवेळा निवडून आले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक यांनी फालेरो यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.
ह्या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांच्या मताधिक्क्यात वाढ झाल्याचेही दिसून आले. उत्तर गोवा मतदारसंघात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 1999 पासून सातत्याने निवडून येत आहेत. उत्तर गोव्यात भाजपला वाळपई, पर्ये, प्रियोळ, साखळी, मये, कुंभारजुवे, पणजी, हळदोणे, पर्वरी, साळगाव, शिवोली, म्हापसा, थिवी, मांद्रे आणि पेडणे या विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली, तर, काँग्रेसला, कळंगुट, सांताक्रुझ, सांतआंद्रे या मतदारसंघांतून आघाडी मिळाली.
दक्षिण गोवा मतदारसंघात इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काँग्रेसचा गड राखला. विरियातो यांनी भाजप उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांचा 13535 मतांनी पराभव केला. विरियातो यांना 217836 तर पल्लवी धेंपो यांना 204301 मते मिळाली. आरजीचे रूबर्ट परेरा यांना 18885 मते मिळाली. पोस्टल बॅलटमध्येही बहुतांश मते विरियातो यांना मिळाली. सुरुवातीला विरियातो यांची 4 हजारांची असलेली आघाडी वाढत जाऊन शेवटी तेरा हजारांवर येऊन थांबली.

सासष्टीतील नुवे, कुडतरी, फातोर्डा, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी व वेळ्ळी या 8 मतदारसंघांत काँग्रेसला आघाडी मिळाली. नावेली येथे काँग्रेसला 5770 मतांची व मडगाव येथे भाजपला 1260 मतांची आघाडी मिळाली.
दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे व्हेंझी व क्रुझ सिल्वा यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या मतांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या आमदारांसह भाजपचे दक्षिण गोव्यात पंधरा आमदार होते, मात्र तरीही भाजप उमेदवाराला अपेक्षित मते मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.सासष्टीतील नुवे मतदारसंघातून भाजपला साथ मिळाली नाही. नुवे येथे भाजपला 2677, तर काँग्रेसला 16365 मते मिळाली. कुडतरी मतदारसंघात भाजपला 11300 तर काँग्रेसला 9603 मते मिळाली.
केपे मतदारसंघात विरियातो यांना 12721, तर सौ. धेंपो यांना 11937 मते मिळाली.