राज्यातील समुद्र किनार्यांवर पर्यटकांच्या बुडण्याच्या घटनांची पोलीस खात्याने गंभीर दखल घेतली आहे. उत्तर गोव्यातील समुद्र किनार्यांवर पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना धोक्याबाबत सावध करण्यासाठी पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर गोव्यातील बागा, शिकेरी, कळंगुट या समुद्र किनार्यांवर पाच पर्यटकांचा बुडून नुकताच मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील मिरामार, बागा, शिकेरी, कळंगुट, कांदोळी, हरमल व इतर किनार्यावर गस्तीला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस स्टेशनच्या पथकाकडून मोटरसायकलवरून गस्त घालून समुद्र किनार्यावर येणार्यांना सावध केले जात आहे.
दरम्यान, दृष्टी मरीनने समुद्रकिनार्यावर पर्यटनासाठी जाणार्या पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या बुडण्याच्या घटनांमुळे दृष्टी मरीनने पर्यटकांना पावसाळ्यात ३० सप्टेंबरपर्यंत समुद्रात उतरू नये, असे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. पर्यटकांनी समुद्रातील खडक, भरती ओहोटी विभाग, लाटा उसळणार्या विभागापासून सावध रहावे, असे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला आहे. तसेच जोरदार वारे वाहत आहेत. पर्यटकांनी लाटा उसळणार्या भागापासून १०० मीटर दूर राहावे. जोरदार लाटेमुळे एखाद्यावेळी किनार्यावरील कोरडा भाग सुद्धा पाण्याखाली येऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.