उ.प्र., बिहारात पुराचा कहर
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर कालही चालूच राहिला. अतिवृष्टीमुळे पू आणि दरडी कोसळून मृत्युमुखी पडणार्यांची संख्या ५० झाली आहे. दरम्यान, हरिद्वार येथे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली असून सरकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसामुळे चारधाम यात्रा थांबवण्यात आली. दरडी कोसळल्यामुळे गंगोत्रीला गाणारा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
उत्तर प्रदेशात शेकडो बेपत्ता
दरम्यान, उत्तर प्रदेशाच्या बलरामपूर आणि बाराबंकी जिल्ह्यात राप्ती आणि घागरा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने लाखो लोकांना स्थलांतरित केले असून शेकडो बेपत्ता आहेत. बहरीचमध्ये ८५ गावांत तर श्रावस्थीत ७२ गावांत पाणी शिरले आहे. नेपाळमधील भालुबांग, भैरहवा आणि कुसूम बांधांतून पाणी सोडल्यामुळे राप्ती नदीचे तर चिसापानी बांधातून पाणी सोडल्यामुळे घागरा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान, बिहारमध्ये दरभंगा, पश्चिम चंपारण आणि नालंदा जिल्ह्यात पूरस्थिती आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून बचावकार्य चालू आहे.
नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे ८४ मृत्यूमुखी; १५६ बेपत्ता
काठमांडू ः नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे तसेच दरडी कोसळून मरणार्यांची संख्या ८४ झाली असून १५६ बेपत्ता आहेत. देशाच्या पश्चिमी भागातील दहा जिल्हे गंभीररित्या प्रभावीत झाले आहेत. पावसामुळे हजारो लोक बेघर बनले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरेही वाहून गेली आहे. बहुतेक रस्ते वाहून गेल्यामुळे मदत पोचवणेही कठीण बनले आहे.