उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्याला कोरोनाबाधित राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. अतिरिक्त आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी जारी केलेल्या एका आदेशामध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र आता या निर्णयामुळे आता काही आठवड्यांवर येऊ घातलेली राज्यातील विधानसभा निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
उत्तर प्रदेश सार्वजनिक आरोग्य आणि साथ नियंत्रण कायदा २०२० च्या कलम तीन अंतर्गत संपूर्ण राज्य कोरोनाबाधित म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हणण्यात आले आहे. राज्यापालांच्या नावाने हा आदेश जारी करण्यात आला असून हा आदेश ३१ मार्च २०२२ किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल असे यात नमूद केले आहे.
ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्यामध्ये यापूर्वीच २५ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी जारी आहे. राज्यात आढळलेले ओमिक्रॉनचे दोन्ही रुग्ण आता बरे झाले आहेत.