बुधवारी संध्याकाळी गडगडाटासह कोसळलेल्या पावसात वीज कोसळून साईश तिळवे (14), अक्षिता तिळवे व अश्विका नाईक ही तिघेजण जखमी झाल्याची घटना उडीवाडा- उसगाव येथे घडली. जखमींपैकी अश्विका यांच्यावर पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांवर रात्री उशिरा उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. वीज कोसळल्याने नाईक व तिळवे यांच्या दोन्ही घरांतील विजेवर चालणारी यंत्रणा जळून खाक झाली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पाऊस पडत असतानाच वीज कोसळली. त्यावेळी घराच्या मागच्या बाजूने असलेली अश्विका नाईक ही जखमी झाली. तसेच साईश हा ज्यादा वर्गाला गेलेला आठवीतील मुलगा रस्त्यावरून येत असताना विजेच्या धक्क्याने रस्त्यावर कोसळला. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूला असलेली अक्षिता तीळवे हीसुद्धा जखमी झाली. जखमींना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमी साईश व अक्षिता यांना यांना उपचार केल्यानंतर रात्री 11.30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रातून घरी पाठविण्यात आले. तर अश्विका नाईक यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वीज कोसळल्याने नाईक व तिळवे यांच्या घरातील अनेक विजेवर चालणाऱ्या वस्तू जळून गेल्या.