‘उटा’च्या महामेळाव्यात राजकीय आरक्षणाचा ठराव मांडला जाणार

0
8

>> फर्मागुडी येथे रविवारी द्विदशकपूर्ती मेळाव्याचे आयोजन; एकूण 9 ठराव मांडणार; मंत्री गोविंद गावडेंची माहिती

युनायटेडट ट्रायबल असोसिएशन्स म्हणजेच ‘उटा’ या संघटनेच्या द्विदशकपूर्तीनिमित्त रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी फर्मागुडी येथे अनुसूचित जमातींच्या एका महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या महामेळाव्यात आदिवासींच्या कल्याणासाठीचे वेगवेगळे 9 ठराव मांडण्यात येणार असून, त्यात राजकीय आरक्षणासंबंधीचा ठरावही असेल, अशी माहिती उटाचे नेते व मंत्री गोविंद गावडे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या 20 वर्षांच्या काळात ‘उटा’ संघटनेने भरीव योगदान देताना अतिआवश्यक अशा खास 12 मागण्या धसास लावल्या. मात्र, आदिवासींच्या कल्यासासाठीच्या बऱ्याच मागण्या अजून धसास लावण्याची गरज असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. मागील 20 वर्षे ‘उटा’ संघटनेने अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी प्रखर लढा दिला. त्या दरम्यान दोघा बांधवांना आपल्या प्राणांची आहुतीही द्यावी लागल्याचे गावडे म्हणाले. उटाच्या अथक प्रयत्नांमुळे अनुसूचित जमाती कल्याण खात्याची स्थापना झाली. या खात्यामार्फत 25 विविध समाज कल्याणकारी योजना आता राबवण्यात येत असल्याचे गावडे यांनी नमूद केले.
गोव्याचे भूमिपुत्र असलेल्या अनुसूचित जमातींतील गरीब व मागास लोकांचा आवाज या मेळाव्यात उठवला जाणार असून, क्रांतीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे गावडे म्हणाले.

आदिवासींच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवण्याबरोबरच त्यांच्या नव्या पिढीला आदिवासी समाजाने केलेल्या संघर्षाची माहिती मिळावी हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.
एका प्रश्नाचे उत्तर देताना ‘उटा’ संघटनेत कोणतीही गटबाजी नसल्याची दावा गावडे यांनी केला. ‘उटा’ ही संघटना नेत्यांवर अवलंबून नसून, छोटे-मोठे कार्यकर्ते हीच उटाची खरी ताकद असल्याचे गावडे म्हणाले.
यावेळी बोलताना ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप हे म्हणाले की, दि. 10 रोजी उटाचा जो मेळावा होणार आहे, तो मेळावा म्हणजे एक महासंमेलनच असेल व तेथे हजारोंच्या संख्येने अनुसूचित जमातींतील बांधवांची उपस्थिती असेल. ‘उटा’ संघटनेच्या लढ्याचा इतिहास सांगतानाच या लढ्याचा आढावा घेणारा ‘आक्रोश’ हा माहितीपटही यावेळी दाखवण्यात येणार असल्याचे वेळीप म्हणाले. ‘उटा -उजवाडाची वाट’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन होणार आहे.
या पत्रकार परिषदेला उटाचे विशेष सचिव दुर्गादास गावडे व कार्यकारी अध्यक्ष विश्वास गावडे हे हजर होते.

प्रेरणा यात्रा अंतिम टप्प्यात
गेल्या 27 ऑक्टोबर रोजी काणकोण येथील मल्लिकार्जुन देवस्थानाकडून सुरू झालेली ‘उटा’ प्रेरणा यात्रा गोवाभराचा प्रवास करून आता तिसवाडी तालुक्यात पोचली असल्याचे गोविंद गावडे म्हणाले.

बिरसा मुंडा जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा
बिरसा मुंडा जयंती दिनी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी गोविंद गावडे व प्रकाश वेळीप यांनी यावेळी केली. तशी मागणी करणारा ठरावही संमत करण्यात येणार असल्याचे वरील द्वयींनी स्पष्ट केले.