उच्च शिक्षणासाठी व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज योजना जाहीर

0
8

गोवा शिक्षण विकास महामंडळाने 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी भारतात, तसेच परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज योजना जाहीर केली आहे.

महामंडळाकडून 2005 सालापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जात असून, या योजनेखाली आत्तापर्यंत सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना अंदाजे 250 कोटी रुपये वितरित केले आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली.

येत्या 30 ऑक्टोबरपासून या योजनेचे अर्ज मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी वार्षिक 2 लाख रुपये आणि विदेशात शिक्षणासाठी वार्षिक 8 लाख रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भारत शिक्षण घेणाऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा 12 लाख आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा 20 लाख रुपये अशी आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंडळाच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून नंतर ते भरून मंडळाच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन पर्वतकर यांनी केले आहे.