उच्च न्यायालयाच्या आवारात पोलिसाच्या गोळीबारात वकील ठार

0
98

एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात काल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात एक वकील ठार व एक जखमी झाला. त्यानंतर तेथील वकिलांनी पोलीस व प्रशासकीय अधिकार्‍यांवर तुफान दगडफेक तसेच नासधूस केली.
गोळीबार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव शैलेशकुमार सिंग असे असल्याचे वकिलांतर्फे सांगण्यात आले. मात्र पोलीस खात्याचे प्रवक्ते मृत्यूंजय मिश्रा यांनी या नावाला दुजोरा दिला नाही. या गोळीबारात ठार झालेल्या वकिलाचे नाव रोशन अहमद असे असून फिरोज नबी हा वकील जखमी झाला.घटनास्थळी उपस्थित असलेल्या वकिलांच्या म्हणण्यानुसार काही वकिलांनी संशयित पोलीस उपनिरीक्षकाला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याने गोळीबार केला. या घटनेनंतर वकिलांनी अलाहाबाद-कानपूर महामार्ग अडवला. तसेच काही वाहने पेटवून दिली. त्यानंतर काही ज्येष्ठ न्यायाधिशांनी घटनास्थळी जाऊन शांततेचे आवाहन केल्यानंतरच परिस्थिती निवळली.