उघड्यावर कचरा फेकणार्‍यांवर कारवाईच्या पुस्तिका उपलब्ध

0
138

कचरा व्यवस्थापन मंडळाने उघड्यावर कचरा फेकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व पंचायतींना दंड (चलन) आकारणी पुस्तिका उपलब्ध केल्या आहेत. साळगाव कचरा प्रकल्प भागातील २३ पंचायत क्षेत्रात कचरा उघड्यावर टाकणार्‍यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याची सूचना करण्यात येणार आहे. कचरा विल्हेवाटीमध्ये शिस्त आणण्यासाठी दंडात्मक कारवाईची सूचना केली जात आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पंचायत क्षेत्रात स्वच्छता ठेवण्यासाठी पंचायतींनी दंडात्मक कारवाईसाठी पुढाकार घेतला पाहिजे. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात ज्या २३ पंचायत क्षेत्रातील कचरा स्वीकारला जातो. त्या पंचायत क्षेत्रात कचरा उघड्यावर टाकण्यावर दंडात्मक कारवाईसाठी पंचायतीवर दबाव आणला जाणार आहे. या पंचायतींनी कारवाईसाठी टार्गेट दिले जाणार आहे. पंचायतीकडून कचरा स्वीकारला जात असतानाही उघड्यावर कचरा फेकणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असेही लोबो यांनी सांगितले.

राज्यातील इतर भागात कचरा विल्हेवाटीसाठी साधन सुविधा उपलब्ध केल्यानंतर दंडात्मक कारवाई कडक करण्याची सूचना केली जाणार आहे. ज्या भागात कचरा विल्हेवाटीसाठी योग्य साधन सुविधा उपलब्ध नाही. त्या भागात दंडात्मक कारवाई कडक करण्याची सूचना केली जाणार नाही. प्रथम साधन सुविधा उपलब्ध केल्यानंतर आवश्यक कारवाई केली जाणार आहे. कचरा गोळा करण्याच्या कामात शिस्त आणण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पिसुर्लेत ई-कचरा
विल्हेवाट प्रकल्प उभारणार
पिसुर्ले येथे ई – कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री लोबो यांनी दिली. गावा गावातील भंगार अड्डे डोकेदुखी बनत चालले आहेत. भंगार अड्यांसाठी औद्योगिक वसाहतीमध्ये जागा उपलब्ध करण्याची गरज आहे. नव्याने स्थापन करण्यात येणार्‍या औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वांत प्रथम भंगार अड्डे सुरू करण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची गरज आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.