उगवे, पेडणे येथे अज्ञात चोरट्यांनी पाच बंद घरे फोडून सोन्याचे दागिने व रोख पैसे लंपास केले आहेत. सदर चोरीची घटना बुधवार 31 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडल्याचा संशय आहे. या प्रकरणी मोपा पालिसांत तक्रार दाखल करण्यात आली
आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उगवे येथील अशोक महाले, राजन महाले, वामन महाले, संतोष महाले, अरुण महाले व विजय महाले यांची घरे आहेत. या घरांतील मंडळी कामानिमित्त बाहेर असल्याने घरे बंद होती. त्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी घरांची कुलूपे तोडून चोरी केली. घरांतील सोन्याचे दागिने तसेच काही प्रमाणात रोख रक्कम रक्कम लंपास केल्याची माहिती सरपंच सुबोध महाले यांनी दिली.
मोपा पोलिसांत चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाचही घरांचा पंचनामा केला. चोरट्यांच्या शोधात मोपा पोलीस असून एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन युवक रात्रीचे फिरताना दिसले. मात्र, अजून त्यांचा काही सुगावा लागल्या नसल्याचे मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलाकर यांनी सांगितले.